इतिहास

ज्ञानी कौण्डिन्य – भगवान बुद्धांचे पहिले शिष्य

बौद्ध साहित्यामध्ये बुद्धांचे शिष्य आनंद, सारिपुत्त आणि महामोग्गलांन प्रसिद्ध आहेत. पण याव्यतिरिक्त भगवान बुद्धांनी ज्या पंचवर्गिय भिक्खूंना प्रथम उपदेश केला त्यातील कौण्डिन्य यांचे स्थान सुध्दा अद्वितीय आहे असे दिसून येते. हे भगवान बुद्ध यांचे प्रथम शिष्य होते.

यांना मध्यममार्गाचे प्रथम आकलन झाले. त्यांचा जन्म कपिलवस्तू जवळील द्रोणवस्तू या गावात झाला. कौण्डिन्य हे त्यांचे गोत्र व सुदत्त हे त्यांचे नाव होते असे जातक अठ्ठकथाकारांनी म्हटले आहे. त्या वेळच्या शिक्षण पद्धतीनूसार ते वेद आणि सामुद्रिक विद्या शास्त्रात पारंगत होते. सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला तेव्हा ज्या आठ ब्राह्मणांना निमंत्रित केले होते त्यात कौण्डिन्य हे सुद्धा होते. त्यावेळेस ते तरुण होते. सातही ब्राह्मणांनी भविष्य वर्तविले की जर हे बालक गृहस्थआश्रमात राहिले तर चक्रवर्ती होईल व संन्यासी झाले तर मात्र बुद्ध होईल. परंतु कौण्डिन्य यांनी बालकाची शारीरिक लक्षणे पाहून खात्रीने सांगितले होते की हे बालक गृहस्थ होणार नाही. मात्र हे बालक नक्कीच बुद्ध होईल.

पुढे बरीच वर्षे गेल्यावर सिद्धार्थ गौतम यांनी जेव्हा गृहत्याग केला तेव्हा कौण्डिन्य यांनी पुढचे भविष्य जाणले. ते सातही ब्राह्मणांच्या घरी गेले, ज्यांनी भविष्य वर्तविले होते. परंतु ते केव्हाच निवर्तले होते. तेव्हा त्यांच्या मुलांना कौण्डिन्य म्हणाले की “सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्याग केला आहे व ते खात्रीने बुद्ध होणार आहेत. तर चला आपण प्रव्रज्या घेऊ आणि त्यांच्या धर्म अमृताचा लाभ घेऊ.” परंतु त्या सात ब्राह्मणांच्या मुलांपैकी फक्त चारच तयार झाले. त्यांना घेऊन कौण्डिन्य यांनी प्रव्रज्या घेतली. तेच हे पंचवर्गिय भिक्खू म्हणून बौद्ध साहित्यात अमर झाले. पुढे ते सिद्धार्थ यांचे बरोबर देहदंड साधनेत सामील झाले.

उरुवेला प्रदेशात सिद्धार्थ देहदंड साधना करीत असताना त्यातील निष्फलता त्यांनी जाणली आणि आहार ग्रहण केला. तेव्हा ते पतित झाले असे वाटून पंचवर्गिय भिक्खू त्यांना सोडून वाराणसीला गेले. पुढे सिद्धार्थ गौतम यांना बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. ते बुद्ध झाले. तेव्हा त्यांनी प्रथम आपले गुरू आलारकालाम व उदक रामपुत्र यांना धर्म उपदेश करण्याचा विचार मनात आणला. पण ते दोघेही निवर्तले होते. तेव्हा पंचवर्गिय भिक्खूनां प्रथम उपदेश करावा म्हणून ते उरुवेलावरून प्रवास करीत आषाढ पौर्णिमेच्या सुमारास वाराणसी जवळील ऋषीपत्तनात आले. तेथे बुद्धांनी ज्ञानप्राप्तीचा साक्षात्कार झाल्याचे त्यांना सांगितले. परंतु त्यांचा विश्वास बसला नाही.

तेव्हा दुसऱ्या दिवशी आषाढ पौर्णिमेला त्यांनी पहिला धर्मोपदेश त्यांना केला ( हीच जगातील पहिली गुरुपौर्णिमा )आणि त्याचे प्रथम कौण्डिन्य यांना आकलन झाले. त्यांना धर्मदृष्टी प्राप्त झाली की, ‘या सृष्टीत जे जे निर्माण झाले आहे ते सर्व नष्ट होणार आहे’ तेव्हा बुद्ध उद्गारले ‘कौन्डिन्याने जाणले…, कौण्डिन्याने जाणले…..’ तेव्हापासून त्यांना ‘ज्ञानी कौण्डिन्य’ असे सर्व म्हणू लागले. धर्मदृष्टी प्राप्त झाल्यावर भगवान बुद्धांनी त्यांना उपसंपदा दिली. अशा तऱ्हेने कौण्डिन्य बुद्धांचे पहिले शिष्य झाले. पुढे जेतवन येथील भिक्खूंच्या भरलेल्या सभेत बुद्ध कौण्डिन्य संबंधी म्हणाले की ‘धम्माचे आकलन होऊन अर्हत होणारे माझे पहिले शिष्य हे ज्ञानी कौण्डिन्य आहेत’.

द्रोणवस्तू गावाजवळ कौण्डिन्य यांची बहीण मान्तनी राहत होती. तिला पूर्ण नावाचा पुत्र होता. त्याला सुद्धा कौण्डिन्य यांनी प्रव्रज्या दिली. कौंडिण्य यांना एकांतवास जास्त प्रिय होता. बुद्धांची अनुमती घेऊन त्यांनी उर्वरित आयुष्य मंदाकिनी नदीकिनारी असलेल्या एका दाट वनात घालविले. तेथे ते बारा वर्षे राहिले. अंतिम घटिका जवळ आल्यावर ते पुन्हा भगवान बुद्ध यांना भेटण्यास गेले. तेव्हा त्यांच्या पदकमलावर माथा टेकवून दर्शन घेतले व कायमचा निरोप घेऊन ते पुन्हा वनात परतले. नंतर दोनच दिवसांनी त्यांचे परिनिर्वाण झाले. त्यांचे पार्थिवाचे दहनाचे वेळी पाचशे भिक्खू उपस्थित होते. त्यांच्या अस्थी भगवान बुद्धांनी स्वतःच्या हाताने स्तूपात ठेवल्या.

बुद्धघोष आचार्य यांनी म्हटले आहे की हा स्तूप कौण्डिन्य यांच्या नावाने प्रसिद्ध होता. थेरीगाथेत कौण्डिन्य यांच्या अनेक गाथा आहेत. जे वाचून सामान्यजनात आदर्श श्रमणीय जीवन कसे व्यतीत करावे हे कळते. चीनच्या प्राचीन बौद्ध साहित्यात आदर्श भिक्खू म्हणून कौण्डिन्य यांचा उल्लेख आहे. मात्र कौण्डिन्य यांचा स्तूप भारतवर्षात कुठेच आढळलेला नाही. काळाच्या ओघात कदाचित नष्ट झाला असावा. मात्र कर्जत जवळील असलेली कोंडाणे लेणी आणि तेथील कोंढाणे गाव यांची नावे या कौण्डिन्य भिक्खू यांच्यावरून तर पडली नसावीत ? सिंहगड किल्ला येथे सुद्धा लेणी आहेत. आणि त्याचे मूळ पाली भाषेतील नाव ‘कोंडानां’ होते.

(संदर्भ : डॉ. भदंत सावंगी मेघंकर यांचे ‘बुद्ध और उनके समकालीन भिक्षु’)

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *