ब्लॉग

आंतरिक शांततेत कार्यरत रहा

शांत मनातच महान सृजनशील गोष्टींचा उदय होत असतो. कारण असे मन प्रयत्नातून वा नियंत्रणातून अस्तित्त्वात येत नसते. जे हवे ते, जे इच्छित आहे ते न मिळाल्यामुळे, काही जण सतत तक्रारीचा सूर लावतात. कारण ते इतरांपेक्षा स्वत:ला पूर्णपणे वेगळे व उच्च मानत असतात. अर्थात ध्येय वा साध्य नेहमीच पुढे धावत असते. नाहीतरी धावायचे ते स्वत: मागेच असते. आपण जे काही करतो त्यावर आपल्याला प्रेम करता आले पाहिजे. आपली प्रत्येक कृती ही मोठ्या जिव्हाळ्यातून उद्भवायला हवी. प्रेमातून आकाराला आलेल्या कृतीला निवड करावी लागत नाही. मग एका निर्मितीक्षम प्रेमाने आपण काम करू लागतो.

तुम्हाला किना-यापर्यंत जाताना तुमची प्रत्येक हालचाल, लाटा निर्माण करीत असते. त्या लाटा या एक प्रकारे प्रतिक्रिया वा तक्रारीसारख्याच असतात. मुख्य म्हणजे तुम्हाला त्या सतत मागे खेचत राहतात. पण तुम्ही जर जीवनाचा व या प्रवासाचा बिनशर्त स्वीकार केलात, आणि एका प्रवाहीवृत्तीने परिवर्तनशीलपणे जगत राहिलात, तर तुम्हाला निश्चित साफल्यमयता मिळेल आणि परमानंदही. बक्षीस, यश वा फळ मिळावे या हेतूने प्ररित झालेली कोणतीही गोष्ट आध्यात्मिक असू शकेल का? तुमचे मन प्रेमाने व करुणेने बहरू द्या. शुद्ध मन व मुक्त अंत:करण यांनी जगायला शिका !

जीवन जगणे आणि त्याचा प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. संकट टाळण्यापेक्षा संघर्ष निर्माण करणाच्या कारणांचा नाश करा. जे आहे त्याकडे पूर्ण अवधान द्या. तुम्हाला वाटेतले अडथळे दिसले पाहिजेत, जाणवले पाहिजेत. मुख्य म्हणजे तुम्ही त्यावर मात करायला शिकले पाहिजे. तुमचा प्रत्येक हेतू वा ध्येय तुमच्या कृतीला एक आवेग आणते. तुम्हाला प्रवासातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. त्यासाठी संपूर्ण चैतन्यानिशी व मोठ्या सक्षमतेने पुढे जात रहा. अखेरीस या प्रवासातच या प्रवासाची सांगत आहे. या प्रवासाला विश्रांतीस्थल असे नाहीये. त्यामुळे सतत पुढे जात रहा! मुख्य म्हणजे पुढे जात असताना सत्याचे आकलन करून घ्या! तुमचा प्रत्येक प्रयत्न – प्रयास हा तुमच्या हृदयातून उमलायला हवा! प्रवासात वादळवारे – लाटांचा डोंगर तुम्हाला भेटणारच आहे, कधी कधी समुद्राच्या लाटा तुमच्यावर स्वार होतील, पण तुम्ही डगमगू नका. आपला प्रवास अर्धवट सोडू नका ! पुढल्या संकटांना व वादळी वान्यांना घाबरून तुम्ही जर सुरक्षित बंदर सोडले नाही तर तुम्हाला यश मिळेल ? अनेक लोकांना काम केल्यानंतर लगेचच यश हवे असते. अशा यशातून आपल्याला कधीच समाधान मिळणार नाही. तुमच्या घामातून-अश्रूतून येणारा पैसा व यश यासाठी तुम्ही बांधिल आहात. यश-प्रतिष्ठा हे तुम्हाला मिळणारच आहे.

अखेरीस फळापेक्षा प्रवासातील, प्रत्येक क्षणातील आनंद लुटा. कारण मिळण्याची प्रक्रिया ही संपुष्टात आणण्याचीच प्रक्रिया असते. कुठे तरी पोहचून यशबिंदूपाशी स्थिर होणे, हा मृत्यूच असतो. साक्षात अनुभवणे हे मात्र अक्षय, अनंत असते. आता पर्यंत आपण क्रोधीष्ट, दुष्टता असणारी किंवा वारंवार तक्रारी करणारी, स्वत:चे समर्थन करणारी आत्मकेंद्रित मूर्ख लोकं या विषयी बोललो. हा मूर्खपणा तुम्हाला टाळायचा आहे. स्वत:चे अंतरंग मोठ्या अंतर्मुखतेने पहा आणि मनातील क्रोधाला, द्वेषाला तसेच दुष्टतेला साठवू देऊ नका! घटना विसरा पण घटनेतील बोध व अर्थ ध्यानात ठेवा. धर्मशील माणूस या तीन गोष्टींपासून सदैव दूर राहतो. आपल्या आत व बाहेर जे काही घडते आहे ते सरळ व स्पष्ट पहा.