ब्लॉग

आज केरळमधे घडलेल्या प्रसंगाने तथागत बुद्धाला रडू कोसळलं असतं

नालागिरि गजवरं अतिमत्तभूतं,दावग्गिचक्कमसनीव सुदारूणन्तं। मेत्तम्बुसेक विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतू ते जयमंगलानि…

लहानपणी देवदत्तानं बाणाने मारलेला राजहंस बुद्धाने राजनिवाड्याने जिंकला होता. सिद्धार्थाच्या भूतदयेचा तो पहिला आविष्कार होता.सिद्धार्थ बुद्ध झाला आणि देवदत्ताने देखील बुद्धाच्या संघात प्रवेश केला, पण हरप्रकारे बुद्धाला नामोहरम करण्याचा प्रयत्न त्याने सुरूच ठेवला. संघात राहून तथागतांच्या विरोधात कारस्थानं रचली.

एकदा नालागिरी नावाच्या मदमस्त हत्तीला देवदत्ताने दारू पाजली आणि चिंचोळ्या वाटेवरून बुद्ध जात असताना नालागिरी हत्तीला देखील त्याच वाटेवर धाडलं. आक्राळ विक्राळ हत्ती येईल त्याला चिरडत पुढे निघाला. बुद्धाच्या समोर उभा राहताच तो शांत झाला. बुद्धाने त्याच्या सोंडेवरून हात फिरवला आणि आतापर्यंत नशेत मदमस्त असलेला नालागिरी हत्ती बुद्धाच्या करुणेत आकंठ बुडाला. देवदत्त हे चित्र पाहतच राहिला. मंगलमैत्रीत काय ताकद असते हे तो प्रथमच पहात होता.घडल्या प्रसंगाने देवदत्ताला रडू कोसळलं होतं.

आज केरळमधे घडलेल्या प्रसंगाने बुद्धाला रडू कोसळलं असतं. दोन जीवांच्या हत्तीणीला घेऊन कुठंकुठं फिरला असता तथागत? कुठल्या न्यायालयात तो निवाडा मागायला गेला असता? कुणी ऐकून घेतलं असतं त्याचं म्हणणं? ज्याने आयुष्यभर करुणेचा संस्कार केला, नालागिरीवर विजय मिळवला त्याला हा अमानुषपणा बघून किती दुःख वाटलं असतं.आज बुद्ध रडतोय, उद्या आपल्यावर रडण्याची पाळी येईल.

मुक्या जनावरांचा तळतळाट घेऊ नये हे मूल्यशिक्षणाच्या तासाला नाही तर आजीआजोबांच्या संस्कारातून शिकलोय आम्ही. आज याचीच उणीव आहे. असे देवदत्त आपल्या समाजात आहेत, त्याच्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी ही संयुक्तिक जबाबदारी घ्यायला हवी की आपली मुलं बुद्धाच्या वाटेनं जातायेत की देवदत्ताच्या?

सागर शैला रघुनाथ यांच्या फेसबुक वॉलवरून…