इतिहास

केसरियाचा सहा मजली स्तुप

बिहारमध्ये पाटण्यापासून ११० कि.मी.अंतरावर चंपारण जिल्ह्यामध्ये केसरिया नावाचा एक मोठा स्तूप आहे. या जंगलामधील स्तुपाचा शोध अगदी अलीकडे म्हणजे १९५८ साली लागला. प्रत्यक्षात त्याची साफसफाई व खोदकाम १९९८ साली सुरू झाले आणि भारतीय पुरातत्त्व खाते स्तूपाची उंची पाहून अचंबित झाले. तिसऱ्या शतकात बांधलेल्या या स्तुपाचा घेर १३० मी.आहे आणि त्याची उंची जवळजवळ ३२ मी. आहे. जगातील सर्वात हा उंच स्तुप असून जावा येथील बोरोबुद्दूर स्तुपापेक्षा एक फूट उंच आहे. १९३४ च्या बिहारमधील भूकंपा पूर्वी टेकडीची उंची ३८ मीटर होती अशी नोंद आहे. चिनी प्रवासी भिक्खू फियान आणि हुएनत्संग यांनी सुद्धा त्यांच्या प्रवास वर्णनात हा स्तुप पाचव्या व सातव्या शतकात पाहिल्याचे लिहून ठेवले आहे.

या स्तूपाचे संदर्भात महत्त्वाची माहीती अशी की जीवनाच्या शेवटच्या कालखंडात भगवान बुद्ध वैशाली वरून कुशीनगरला जात होते, तेव्हा केसपूत्ता नगराजवळ वैशालीचे लिच्छवी रहिवासी दर्शनार्थ आले. बुद्धांबद्दल अतिव आदर असल्याने स्नेहापोटी त्यांनी त्यांना तिथे राहण्याबाबत आग्रह केला. पण बुद्धांनी पुढचा अंतिम प्रवास जाणून त्यांची विनंती मान्य केली नाही. पण त्यांच्या प्रेमास्तव त्यांनी लिच्छवींना आपले भिक्षापात्र दिले. पूर्वी याच जागी त्यांनी केसपुत्त नगरातील कलमा लोकांना कलमासुत्ताचा उपदेश केला होता. भगवान बुद्ध कुशीनारा येथे निघून गेल्यावर लिच्छवींनी त्या भिक्षापात्रावर मातीचा स्तुप बांधला. पुढे तीनशे वर्षांनीं या पवित्र जागेवर अशोक राजाच्या काळात येथे मोठा विटांचा स्तूप बांधण्यात आला. तोच हा आताचा केसरिया स्तुप.

केसरिया स्तूपावरील क्षतीग्रस्त झालेली बुद्धमूर्ती

बाराव्या शतकानंतर मुस्लिम आक्रमकांच्या हल्ल्यात या स्तुपावरील सहा प्रदक्षिणा मार्गावरील बऱ्याच बुद्धमूर्तीं क्षतीग्रस्त झाल्या. त्यानंतर देखभालीसाठी कुणीच न उरल्याने स्तुप वाढलेल्या जंगलात नाहीसा झाला. अलीकडे १९९८ मध्ये स्तूपाच्या आजूबाजूस जेव्हा उत्खनन केले गेले तेव्हा काही तांब्याची आणि चिनी मातीची भांडी, मातीचे दिवे आणि नक्षीकाम केलेल्या विटा आणि काही मूर्ती आढळल्या. अशा या पवित्र स्तुपावरील अर्ध्याभागात अद्याप झाडीझुडपे असून पुरातत्व विभागाने अद्याप ती काढली नाहीत. तरी बिहारमध्ये जेव्हा पर्यटनास जाल, तेव्हा जगामध्ये उंच असलेल्या या महत्वाच्या स्तुपाचे दर्शन अजिबात चुकवू नका. कारण भगवान बुद्धांचे पदकमल, त्यांचे भिक्षापात्र आणि त्यांच्या कलमासुत्ताच्या उपदेशाने पुलकित झालेली येथील धम्मतरंगे अजूनही आपल्या चित्तास शांतता प्रदान करतील.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

6 Replies to “केसरियाचा सहा मजली स्तुप

  1. ही साईट आजच माझ्या पाहण्यात आली , खूप छान आहे . माहिती सर्वांपर्यंत पोहचायला हवी . माझे काही सहकार्य हवे असल्यास अवश्य करेन , माझा , मो . नं . ९६६५९५४९८९ ( गणेश निकुंभ , ठाणे )

  2. खुप छान माहिती प्रसारित करता आपण. आपल्या कार्यास शुभेच्छा

  3. बहोत बढिया, ऐसी जानकारी बहुत कम लोग देते है, मै आपको धन्यवाद देता हूँ, आगे भी आप ऐसी जानकारी देते रहें।

  4. केसरीया स्तुपाची माहीती थोडक्यात परंतू सोप्या भाषेत दिलेली खुप आवडली पल्याळीक लेखन जाणिवपुर्वक टाळलेत त्याबद्दल धन्यवाद
    जयभिम नमोबुद्धाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *