जगभरातील बुद्ध धम्म

थाई देशातील वर्षावास

यावर्षी वर्षावास दिनांक १६ जुलै (आषाढ पौर्णिमा ) रोजी चालू होईल व १३ ऑक्टोबर (आश्विन पौर्णिमा)ला समाप्त होईल. थायलंड येथेही याच कालावधीत वर्षावासाचा कार्यक्रम असून त्याला ‘खाओ फांसा’ म्हणतात. व तो तेथील अनेक विहारात संपन्न होणार आहे. याकाळात भिक्खू पावसाळा सुरू झाल्यामुळे विहारात राहून धम्माचा व साधनेचा अभ्यास करतात. हा वर्षावास सुरू होताना पाहिले तीन दिवस ‘फुले समर्पण सोहळा’ साजरा होतो त्यास ‘टक बट डॉकमाई’ म्हणतात. यामध्ये फुले आणि फळे भिक्खुंना देण्यात येतात.

ही प्रथा बुद्धांच्या काळापासून चालत आलेली असून त्यासंबंधीची कथा अशी आहे की बिंबीसार राजाचा सेवक मलकारा दररोज उद्यानांमध्ये जाईची (जास्मिन) फुले गोळा करण्यासाठी जात असे. एकेदिवशी तेथून भगवान बुद्ध जात असताना बिंबिसार राजाने बघितले की सेवक मलकाराने जास्मिन फुलांचा गुच्छ भगवान बुद्ध यांना अर्पण केला. हे पाहून राजाला खुप आनंद झाला व त्याने मलकारा याला बक्षीस दिले. तेव्हापासून ही प्रथा पडली की या दिवसात फळे आणि फुले भिक्खुंना अर्पण करावीत. आपल्या ही देशात बौद्ध बांधव वर्षावासात भिक्खुंना फळे व इतर वस्तूंचे दान देतात. या दानामुळे मनुष्यास खालील गोष्टी प्राप्त होतात असे थायी देशात मानले जाते.

१) आयुष्यमान वाढते व त्वचा सुंदर होऊन आयुष्य निरोगी व आनंदी व्यतीत होते. २) आर्थिक संकटातून बाहेर पडून उत्तरोत्तर वैभवाकडे प्रगती होते. ३) समाजात मानमरातब प्राप्त होतो. ४) पुर्नजन्म हा बहरलेल्या बुद्ध शासन प्रदेशात होतो. ५) पुढील जन्मात धम्म लवकर प्राप्त होतो. यासाठी वर्षांवासाच्या काळात विहारात पांढरीशुभ्र कपडे घालून जावे. तांदूळ व फळांचे दान भिक्खुंना अर्पण करावे. दान देताना चित्तवृत्ती आनंदीत असाव्यात. विहारात येणाऱ्या जेष्ठांना वंदन करावे.

संजय सावंत, नवी मुंबई