इतिहास

सुजाताची खीर आणि बुद्धांची ज्ञानप्राप्ती

सिद्धार्थ गौतम यांनी गयेच्या उरुवेला क्षेत्रातील धर्मारण्य या वनात सहा वर्षे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. शेवटी शरीर कृश झाले. उभारी राहिली नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे, त्यासाठी शरीर प्रकृती चांगली हवी. भूक-तहान-थकवा यांनी जो गळून गेला आहे त्याला नवा प्रकाश कसा प्राप्त होईल ? असे विचार मनात येऊन सिद्धार्थ गौतमांनी वैराग्य मार्गाचा त्याग केला. व सुप्पतीठ्ठ या घाटावर स्नान करून ते मातंगवापी या स्थळाकडे निघाले. त्याच वेळी सेनानीग्राम या गावातील सेनानी या गावप्रमुखाची मुलगी सुजाता खीर घेऊन नवस फेडण्यास आली होती. तिने कृश झालेल्या सिद्धार्थ गौतमांना पाहिले व वृक्ष देव समजून त्यांनाच खीरीचे पात्र दिले.

सुजाता खिरदानाचे अजंठा येथील शिल्प

वरवर पाहता हा एक निव्वळ योगायोग वाटेल. पण खरेतर त्यास निसर्गाचा चमत्कार किंवा धम्माचा आशीर्वाद म्हणणे जास्त योग्य राहील. कारण ज्याक्षणी त्यांना अन्नाची अत्यंत आवश्यकता होती त्याच वेळी सुजाताने पौष्टिक खीर करून आणावी हा निसर्गाचा आधार खूप महत्वाचा होता. मौल्यवान होता. खीर ग्रहणाने त्यांना नवीन उभारी आली. व एकाग्रता साधली जाऊन त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यामुळे ते अन्न हे निश्चितच अतिशय श्रेष्ठ दर्जाचे असावे असे अनुमान काढता येते.गूळ, दूध, तूप आणि उच्च प्रतीचा तांदूळ असे सर्वोत्तम घटक त्यात आल्यामुळे ती खीर पौष्टिक आणि चविष्ट झाली असावी. शिवाय सुजाताने अत्यंत श्रद्धेने आणि तन्मयतेने ती तयार केलेली असल्यामुळे सर्व घटकांचे त्यात योग्य प्रमाणात मिश्रण झाले. यात ज्या गाईचे दूध मिसळले असेल ती गाय देखील उरुवेलाच्या परिसरातील हिरवागार चारा खाऊन निसर्गाशी एकरूप झालेली असावी. म्हणून त्या रम्य परिसरातील चवदार पाण्याचा गूण दुधात उतरला असावा.

केलनिया राजा महाविहार, सिरीलंका येथील सुजाता खिरदानाचे चित्र

निसर्ग सानिध्यात शिळेवर बसुन जेव्हा त्यांनी ही खीर ग्रहण केली तेव्हा निश्चितच त्यांना उभारी आली. पुरेसे बळ प्राप्त झाले. त्यामुळे त्यांनी निरंजना नदी पार करून गयेच्या अरण्यात गेल्यावर दृढ निश्चय करून समाधिस्त झाले. एकाग्रता साधता आली. त्याच वैशाख पौर्णिमेच्या उत्तर रात्री त्यांना ज्ञानप्रकाश प्राप्त झाला. बुद्धत्व प्राप्त झाले. चराचर सृष्टीतील दुःखाचे मूळ कारण सापडले व त्यावरील उपाय देखील प्राप्त झाला. सारे भूत-भविष्य जाणले. म्हणूनच ज्या अन्न सेवनाने त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या सुजाताच्या खीरीचा वाटा निश्चितच मोलाचा मानला पाहिजे. यास्तव साधकाने – उपासकाने आपला आहार हा अत्यंत कमी घेऊ नये तसाच जास्त ही घेऊ नये. जो काही मोजका वा मध्यम आहार घेण्यात येईल तो मात्र पौष्टिक असावा.

सुजाता स्तुप – येथे सुजाताचे घर होते. ९ व्या शतकात पाल राजवटीत येथे शेवटचे बांधकाम झालेले आढळले.

अनेक बौद्ध देशांत सुजाता सिद्धार्थ गौतमांना खीर दान करीत आहे असे शिल्प आढळून येते. तसेच या प्रसंगाची भित्तिचित्रे सुद्धा रेखाटलेली आढळतात. खिरदान म्हणजेच अन्नदान करणे हे एक मोठे पुण्यकर्म भारतीय इतिहासात व परंपरेत आढळते. हा एक महत्वाचा क्षण आहे. म्हणूनच भाताचा गोड पदार्थ करणे हे भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. इतर धान्यापेक्षा तांदळाची प्रतिष्ठा भारतीय भोजनामध्ये किंवा आशिया खंडात खूप आहे. ती इतर युरोपीय देशात बिलकूल दिसून येत नाही. अनेक धर्मांच्या अनेक सामाजिक प्रथांमध्ये तांदळाचा वापर जास्त करण्यात येतो. उदाहरणार्थ ओवाळणे, ओटी भरणे, अक्षता टाकणे, भिक्षा देणे, लोम्ब्या लावून तोरण तयार करणे, पिंडपात करणे इत्यादी.

थायलंड देशातील सुजाता खीरदानाचे चित्र.

शिवाय जी स्त्री रुचकर अन्नपदार्थ तत्परतेने व तन्मयतेने तयार करते ते निश्चितच सर्व कुटुंबासाठी प्रेरणादायी, पालन-पोषण करणारे असतात. या जगात बल्लवाचार्य लाखो आहेत. परंतु त्यांच्यापेक्षा जेंव्हा घरातील स्त्री पौष्टिक अन्न शिजवून त्याच्या चवीने कुटुंबातील सदस्यांना तृप्त करते तीच खरी सुजाता होय. म्हणूनच आजही सुजाताचा स्तूप बकरौर गावात उभा असून त्याला सुजातागढी असे देखील म्हणतात. एकेकाळी त्याच्या समोर अशोक स्तंभ देखील उभा होता. पण सन १८०० मध्ये त्याला गयेमध्ये इतरत्र हलविण्यात आले. अशा या सुजाता मातेस माझा प्रणाम…!

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *