“भारहूत, जि. सतना, मध्यप्रदेश. येथील अप्रतिम अशा शिल्पांनी समृद्ध असलेल्या इ. स.पूर्व २ऱ्या शतकातील , मौर्यकालीन स्तुपावरील हे एक शिल्प….या शिल्पात एका भव्य व सुंदर अशा, सुशोभित केलेल्या सौधावर (महालाची गच्ची ) बरोबर मध्यभागी धम्मचक्र उभे केलेले असून,त्यास सुगंधी पुष्पांनी युक्त अशी गंधमाला अर्पण केलेली आहे. तसेच त्यावर छत्रछाया असून, छत्राच्या दोन बाजूस मौक्तीक झालरी लोंबत्या दिसत आहेत.
धम्मचक्राच्या दोन बाजूंस रुबाबदार फेटा परिधान केलेले दोन उपासक उभे असलेले दिसत असून, ते धम्मचक्रास मनोभावे वंदन करत आहेत.त्याचप्रमाणे सौधाच्या दोन बाजूंना कर्दली वृक्ष (केळीचे खुंट) ही दिसत आहेत. सौधाच्या चारही बाजूंनी आवाराची संरक्षक भिंत असून, त्यास एक प्रवेशद्वार देखील आहे. या प्रवेशद्वाराची कमान चैत्यगृहाच्या तोरणासारखी, पिंपळपानाकृती आहे. सौधासमोर आवाराच्या भिंतीलगत कदलीवृक्ष (केळीचे खुंट) ही दिसत आहेत. प्रवेशद्वारातून प्रवेश करुन काही उपासक सौधावरील त्या सुशोभित धम्मचक्रास हात जोडून ऊजवीकडून डावीकडे, अशी प्रदक्षिणा घालत आहेत.
यांपैकी काही उपासक पायी, काही घोड्यावर तर काही हत्तीवरही आरुढ झालेले आहेत. तर चार अश्वांच्या रथामध्ये आरुढ झालेला एक राजा आपल्या राणीसह धम्मचक्रास प्रदक्षिणा घालून, त्यास वंदन करण्यासाठी लगबगीने जात आहे. रथात त्याच्या उजवीकडे चवरीधारी सेवक असून, पाठीमागे सावलीसाठी छत्र हाती धरलेला सेवक आहे. तसेच, प्रवेशद्वारातून धम्मचक्राचे दर्शन घेऊन, त्यास प्रदक्षिणा घालून डाव्या बाजूने बाहेर पडत असलेले उपासक दिसत आहेत.
आता, धम्मचक्रास चार अश्वांच्या रथांतून आपली राणी व सेवकांसह प्रदक्षिणा घालत असलेला हा राजा आहे तरी कोण, असा प्रश्न आपणांस न पडला, तर ते नवलच….हा राजा आहे – ‘कोशलनरेश प्रसेनजित’. आश्चर्यचकितच झालात ना….? अहो, पण हे खरेच आहे. कारण, त्या प्रवेशद्वाराच्या चैत्यकमानीसारख्या तोरणद्वारावर धम्मलिपीतील नऊ अक्षरांचा व दोन ओळींचा, प्राकृत भाषेतील जो मजकूर लिहिला आहे, त्यातच तसे स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. ‘राजा पसेनजि कोसलो’ अर्थात, ‘ कोशलराज प्रसेनजित’, तर धम्मचक्र स्थापित सौधाच्या वरच्या बाजूस असलेल्या दोन्ही कमानींच्या मधोमध धम्मलिपीतील आठ अक्षरांचा एक लेख कोरलेला दिसून येतो. ‘भगवतो धंमचकं’ म्हणजेच ‘भगवंताचे धम्मचक्र’ असे ते प्राकृतात लिहिलेले आहे.
कोशलनरेश राजा प्रसेनजित आपल्या राणीसह मोठ्या भक्तीभावाने तथागतांच्या धम्मचक्राचे दर्शन घेऊन, त्यास मनोभावे प्रदक्षिणा करत आहे, असे हे अप्रतिम शिल्प भारहूत च्या स्तुपावर धम्मभावनेने प्रेरित होऊन कोरणाऱ्या व या प्रसंगाची स्मृती चिरंतन ठेवणाऱ्या त्या अनामिक शिल्पकारांना माझा मनोमन त्रिवार पंचांग प्रणिपात…..!!!
( टीपः भारहूत स्तुपावरील हे शिल्प व इतरही अनेक अप्रतिम शिल्पे सध्या कोलकाता येथील ‘राष्ट्रीय संग्रहालय’ येथे सुरक्षित जतन करुन ठेवलेली आहेत.)
-अशोक नगरे, पारनेर (अहमदनगर), लेखक – मोडी लिपी तज्ञ आणि बौद्ध लेणी आणि शिल्पकला अभ्यासक