इतिहास

स्वतःला प्रजेचा सेवक मानणारा राजा – प्रियदर्शी राजा सम्राट अशोक

अशोकाची राजसत्तेविषयीची दृष्टीही अशीच विलोभनीय आणि असामान्य आहे. काळाची चौकट भेदून जाणारी अशी आहे. प्राचीन काळातले जगातले सारेच राजे स्वतःला प्रजेचे मालक समजत. तारणहार मानीत. राजसत्ता हे उपभोगाचं साधन मानलं जाई. राजसत्ता भोगण्यासाठीच असते. असाच जगातल्या साऱ्या राजाचा समज असे. सम्राट अशोक हा एकमेव अपवाद होता. तो स्वतःला प्रजेचा सेवक मानीत असे. राजसत्ता हे सेवेचं पद मानणाऱ्या या वृत्तीत अशोकाचे असामान्यत्व सामावलेले आहे. त्यातूनच त्याची लोककल्याणकारी वृत्ती आली.

अशोकाचे अलौकिकत्व त्याच्या धर्मप्रसारात नव्हे, तर ज्या पद्धतीने त्याने धर्मप्रसार केला, त्या पद्धतीत सामावलेले आढळेल. सामान्यपणे जगातल्या प्रत्येक राजानेच आपल्या कोणत्या ना कोणत्या धर्माचा प्रसार केला. त्या किंवा या धर्माला राजाश्रय दिला. आपलाच धर्म श्रेष्ठ मानला व आग्रहाने स्वतःचीच मते लोकांवर कित्येकदा लादलीही. आपल्या धर्ममतांचा दुराग्रह धरणारे राजे आपल्याला इतिहासात पावलोपावली आढळतील. स्वतःच्या मताचे आग्रही प्रतिपादन करीत इतरांचा अनादर करणे प्राचीन काळातही सामान्यपणे घडत असे. नव्हे, आजही घडतेच आहे. अशा वातावरणात इतरांच्या मताबद्दल सहिष्णुता बाळगणारा, इतर धर्मीयाबद्दल आदर व्यक्त करणारा, आपली धर्ममतं लोकांना समजून सांगणारा, इतर धर्मीयांना शब्दानेही न दुखवणारा असा असामान्य राजा केवळ अशोकच!

अशोकाच्या व्यक्तिमत्त्व अधिकच प्रभावी आहे. कारण शासक हे प्रजाजनासाठी कायदे करतात. किंबहुना कायदे करणे हे त्यांचे कर्तव्यच असते, परंतु केलेले कायदे हे प्रजाजनांसाठी आहेत. आपण कायदे करणारे त्या कायद्यांच्या बाहेर आहोत असाच सामान्यपणे जगातल्या सर्वच शासकांचा आग्रह असतो. आजही यात विशेष फरक पडलेला नाही. अशोकाचे असामान्यत्व यात सामावलेले आहे की, त्याने, ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे तो वागला. स्वतः आधी मांसाहार बंद केला. मग लोकांना मांसाहार करू नका असे सांगितले. शिकारीवर बंदी घातली; पण स्वतःही शिकार करणे बंद केले. पराकोटीची अहिंसा त्यांनी स्वतः पाळली मग इतरांनाही अहिंसेचे पालन करायला लावले.

तात्पर्य, ‘देवानाम प्रियः प्रियदर्शी राजा अशोक’ हा खरोखरंच भारताच्या इतिहासातलाच नव्हे, तर जगातल्या इतिहासातला एक अलौकिक राजा होय. त्याच्या आयुष्यातले अनेक प्रसंग एवढे विलोभनीय आहेत की, एखाद्या समर्थ अभिव्यक्तीच्या साहित्यिकाला ते खिळवूनच ठेवतील आणि त्यातून कदाचित आकाराला येईल एखादी समर्थ वाङ्मयीन निर्मिती. आपण वाट पाहू या अशा वाङ्मयीन निर्मितीची !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *