बुद्ध तत्वज्ञान

किसा गौतमी : सर्व अनित्य आहे. हाच सृष्टीचा नियम आहे

किसा गौतमीचा विवाह एका व्यापारी पुत्राशी झाला होता. विवाहानंतर ती पुत्रवती झाली. हिंड फिरू लागण्यापूर्वीच दुर्भाग्याने तिचा पुत्र सर्पदंशाने मृत्यू पावला. तिने पूर्वी कधीही मृत्यू पाहिला नव्हता., त्यामुळे आपला पुत्र मृत्यूस प्राप्त झाला यावर तिचा विश्वासच बसत नव्हता.

सर्पदंश झाल्यास्थानी दिसणारा लहानसा लाल डाग हा तिच्या पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला म्हणून आपल्या पुत्राचे मृत कलेवर घेऊन विमनस्क अवस्थेत घरोघरी फिरत असताना पाहून, ती वेडी झाली असावी असे लोक म्हणू लागले.

शेवटी एका वृद्ध गृहस्थाने तिने गौतमाकडे जावे असे सुचविले. गौतम त्यावेळी श्रावस्ती येथेच वास्तव्याला होत. त्यानुसार ती तथागतांकडे गेली आणि आपल्या मृतपुत्रासाठी औषध योजनेची प्रार्थना केली. तथागताने तिची कष्टगाथा श्रवण केली. तिचा विलाप पाहिला.

त्यानंतर तथागत तिला वदले, “तू नगरात जावे आणि जेथे कोणाचाही मृत्यू झाला नाही त्या घरून मूठभर मोहरी बीज घेऊन यावे. त्यानेच मी तुझा पुत्र पुन्हा जिवंत करीन.” तिला वाटले हे काम तर सोपे आहे. म्हणून पुत्राचे कलेवर घेऊन ती नगरात गेली. पण ती किती भ्रमात होती हे लवकरच तिला जाणवले. कारण तिने भेट दिलेल्या प्रत्येक घरी कोणाचा ना कोणाचा मृत्यू झाला होता.

तेव्हा एक गृहस्थ तिला म्हणाला, “जे जिवंत आहेत ते थोडे आहेत. जे मृत्यू पावले ते बहुत आहेत.”
तेव्हा ती निराश होऊन रिक्त हस्ताने तथागताकडे परत आली. तेव्हा तथागतांनी तिला विचारले की, मृत्यू हा सर्वांसाठी अपरिहार्य आहे हे तुला उमजले नाही काय?

तिच्या बाबतीतच ही अप्रिय घटना घडली असे समजून तिने शोक करावा काय?” ती परत गेली. तिने आपल्या पुत्राचा अंतिम संस्कार केला. त्यावेळी ती म्हणाली, “सर्व अनित्य आहे. हाच सृष्टीचा नियम आहे.”

संदर्भ: बुद्ध आणि त्याचा धम्म
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

One Reply to “किसा गौतमी : सर्व अनित्य आहे. हाच सृष्टीचा नियम आहे

Comments are closed.