इतिहास

अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह कसे बनले, हे चार सिंह त्यावर काय चित्रित करतात ते जाणून घ्या

भारताच्या नवीन संसदेच्या इमारतीवर काल आपल्या राष्ट्राची (राष्ट्रीय चिन्ह) राजमुद्रा म्हणून मान्यता असेलेल्या अशोक स्तंभाच्या चार सिंहांचे भव्य आकाराचे स्तंभशिर्ष शिल्पाच्या प्रतिकृतीचे अनावरण झाले. त्यानंतर मूळ चार सिंहाचे स्तंभशिर्ष आणि नवीन उभारण्यात आलेल्या सिहांची तुलना सोशल मीडियावर सुरु झाली आहे. नवीन अशोक स्तंभशिर्ष शिल्पावरील चार सिंह हे आक्रमक दिसतात. तर मूळ स्तंभशिर्ष शिल्पावरील चार सिंह हे शांत, संयमी आणि डौलदार दिसतात. नेमका या चार सिंह असलेल्या शिल्पाचा इतिहास आणि अर्थ काय आहे?

सर्वश्रेष्ठ असामान्य आणि अलौकिक सम्राट अशोक :

अशोक स्तंभाच्या चार सिंहाच्या इतिहासापूर्वी सम्राट अशोकाबद्दल संक्षिप्त माहिती असणे गरजेचं आहे. सामान्य माणसाला सम्राट अशोकाचे नाव ज्ञात असते ते एक बौद्ध धर्म प्रसारक राजा म्हणून! बौद्ध धर्माला राजाश्रय देणारा, परंतु सम्राट अशोक खरोखरच एक सर्वश्रेष्ठ असामान्य आणि अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वाचा नृपती होता.

लढाईतल्या शौर्याने, मिळालेल्या विजयाने अशा राजांची महत्त्वाकांक्षा वाढलेली इतिहासात आपल्याला दिसते. रणमैदानावरच्या मृत्यूने त्यांना स्फुरण चढते. शत्रूपक्षातील सैन्याची प्राणहानी, वित्तहानी पाहून सामान्य राजांना, सेनापतींना दुःख नाही तर त्यांचा अभिमान फुलून उठतो. म्हणूनच त्यांच्यातून सर्व जग जिंकण्याची ईर्षा बाळगणारा सिंकदर जन्माला येतो. सम्राट अशोकाच्या आयुष्यातही हेच घडले असते तर जगाच्या इतिहासात आणखी एका पराक्रमी जगज्जेत्या नृपतीच्या नावाची भर पडली असती; पण अशोक हा जगाच्या इतिहासातील एक अलौकिक आणि असामान्य नृपती ठरला. तो कलींगच्या यशानंतर कसा वागला यावरून.

कलिंगच्या लढाईतून आपण कलिंग देश जिंकला. प्रचंड साधनसंपत्ती हाती आली; पण त्या जमिनीवर राहणारी चालतीबोलती माणसं मात्र आपण गमावलीत. देश निर्जीव संपत्तीने समृद्ध असतो की त्यावर राहणाऱ्या जिवंत माणसामुळे? लढाईतील विध्वंस बघून अशोकाचे मन द्रवले होते. शस्त्राच्या मर्यादा लक्षात आल्या, शस्त्राने, पराक्रमाने निर्जीव जमीन, जुमला, इमारती, डोंगर, दऱ्या, धन, धान्य, संपत्ती जिंकता येते; पण जिवंत माणसांच्या शरीरातली मनं जिंकायला शस्त्रं निरुपयोगी ठरतात. हे त्याला प्रकर्षान जाणवले. हिंसेने हिंसा वाढते. शस्त्राने शस्त्राला पराभूत करताच येत नाही , याची त्याला प्रचिती आली. या विचाराने अशोक अहिंसेकडे आकर्षित झाला. त्याने प्रेम, दया, क्षमा या भावनेने लोकांना जिंकायचे ठरवले. जगातल्या प्रत्येक राजानेच आपल्या कोणत्या ना कोणत्या धर्माचा प्रसार केला. त्या किंवा या धर्माला राजाश्रय दिला. सम्राट अशोकाने उर्वरित आयुष्य बौद्ध धर्म प्रसारात घालविले. अनेक विहार बांधले. स्तूप उभारले. तिसरी बौद्ध धर्म परिषद भरवली. देशोदेशी धर्मप्रसारक पाठविले. बौद्ध धर्माला त्याने राजाश्रय दिला.

सम्राट अशोकाने आपल्या कार्यकाळात देशभरात ८४ हजार बौद्ध स्तूप बांधले त्यासोबतच लेणी, विहारे स्तंभ उभारले, त्यासोबतच प्रजेसाठी देशातील विविध भागात शिलालेख कोरून आपले आदेश पाळण्याचा संदेश दिला. त्याचा पुरावा म्हणजे आजही अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.

सारनाथ येथील अशोक स्तंभ

उत्तर प्रदेशातील बनारस (वाराणसी) जवळ सारनाथ (धामेका) आहे. सारनाथ येथेही अशोकाचा एक लेखस्तंभ आहे. या स्तंभाचा शोध इसवी सन १९०४-५ साली लागला. सारनाथ स्तंभ हा तुर्की-इस्लामी आक्रमणाचे वेळी तुटला. सध्या तो जमिनीपासून ३७ फूट भग्न अवस्थेत आहे. यावरील लेखाच्या चार ओळी नष्ट झाल्या आहेत. त्यावरील अत्यंत दर्शनीय सिंहचतुर्मुख स्तंभशिर्षही तुटून खाली पडले होते.

एफ. सी. ओरटेल यांनी पुरातत्व खात्यामार्फत उत्खनन करीत असता तुटलेला स्तंभ प्रथम पाहिला व त्यांनी तुटलेला भाग शोधून काढण्यात यश मिळविले. सारनाथ येथील स्तंभशिर्ष कलादृष्टया सर्वोत्कृष्ट आहे. सारनाथ येथील स्तंभशिर्षाच्या वरच्या बाजूला उलटया कमळाचा आकार दिलेला आहे. खांबावर एक वर्तुळाकार चिरेबंदी असून तिच्या चार बाजूस सिंह, हत्ती, घोडा व बैल यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. दोन प्राण्यांच्या मध्ये चारही दिशांना चार धर्मचक्रे कोरलेली आहेत.

या चिरेबंदीवर दोन मीटरहून जास्त उंचीचे चार सिंहांचे भव्य आकाराचे स्तंभशिर्षशिल्प आहे. हे स्तंभशिर्षशिल्प अत्यंत सुंदर आहे. या शिल्पात एकमेकांना पाठमोरे परंतु चिकटून असलेले चार सिंह चार दिशांना पाहत आहेत. हे चारही सिंह एकाच अखंड पाषाणातून कोरलेले आहेत. सिंहांचा चेहरा व पंजे यावरील शरीरशास्त्रातील बारकाव्यांनुसार केलेले कोरीवकाम ते शिल्प सजीव वाटावे इतकी अप्रतिम आहे.

सारनाथ येथील अशोक स्तंभ सिंहचतुर्मुख स्तंभशिर्ष

चार सिंहाचे स्तंभशिर्ष शिल्पाचा अर्थ :

प्राचीन भारतातील शिल्पकलेवर नंतरच्या काळात ग्रीक व पर्शिअन शैलीचा प्रभाव पडल्याचे दिसून येतो. युरोप, आशिया या भागात या प्रकारची प्राचीन सिंहशिल्पे आढळतात. सिंह हा प्राण्यांचा राजा समजला जातो. तो राजाचे प्रतिक म्हणूनही वापरण्यात येतो. आक्रमकता, शौर्य, धीरोदात्तता या गुणांसोबतच विचारीपणा, संयम व दयाळूपणा या गुणांचे तो प्रतिक मानला जातो. त्यामुळे लेखस्तंभावर सिंहशिल्पास शिर्षशिल्प म्हणून योजलेले असावे. हत्ती हा बौध्दांना पवित्र आहे. श्वेत हत्ती हा बुध्दाचे प्रतिक समजण्यात येतो. घोडा हा शक्ती, वेग, भारदस्तपणा, कुलीनता, ताकद व स्वातंत्र्य या गुणांचे प्रतिक आहे. तर बैल प्रामाणिकपणा व कठीण परीश्रमांचे प्रतिक आहे. अशोकाच्या शिल्पात जे चक्र आढळते यास अशोकाने ‘धर्मचक्र’/धम्मचक्र म्हटले आहे. सारनाथच्या या अशोकचक्रात चोवीस आरे आहेत.

सारनाथचे कमळाच्या सुबक पाकळयांच्या आसनावरआरूढ झालेले हे स्तंभशिर्षशिल्प पाहून कोणीही माणूस विस्मयाने थक्क होऊन जातो. हे शिल्प इतके अप्रतिम आहे की, व्हिन्सेंट ऑर्थर स्मिथ म्हणतो, (‘Art of India’ By Vincent आर्थर Smith, pg. २९ )

“It would be difficult to find in any country an example of ancient animal sculpture superior or even equal to this beautiful work of art which successfully combines realistic modelling with ideal dignity and in finished in every detail with perfect accuracy.”

(मतितार्थ- इतर कोणत्याही देशात या प्राचीन कालीन प्राणीशिल्पाच्या तोडीचा अथवा त्याहून सरस असा हुबेहुब ऐटबाजपणा आणि सफाईदारपणे कोरलेले प्रत्येक बारकावे यांचा योग्य मेळ असलेला कलेचा असा देखणा नमुना सापडणे कठीण आहे.)

सातव्या शतकात आलेला चिनी प्रवासी यु एन त्सांग यानेही मृगदाय (सारनाथ) जवळ एका स्तूपासमोर ७० फूट उंच स्तंभ पाहिल्याचे म्हटले आहे. “सारनाथ येथील अशोकस्तंभ जगातील सर्वोत्तम शिल्पकलाकृतीपैकी एक आहे.” असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इसवी सन १९५० मध्ये भारत सरकारने आपल्या सहिष्णू व शांततावादी ध्येयधोरणाचे व समृध्दीपूर्ण सहजीवनाचे प्रतिक म्हणून राजमुद्रेच्या स्वरूपात अशोकाच्या सारनाथ स्तंभशिर्षावरील हे अप्रतिम शिल्प आपले मानचिन्ह म्हणून ‘अशोकचिन्ह’ म्हणतो.

जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव दिला होता

भारताच्या स्वातंत्र्याच्या अवघ्या २४ दिवस अगोदर म्हणजेच २२ जुलै १९४७ रोजी जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या नवीन ध्वज आणि राष्ट्रीय चिन्हासाठी नवीन रचना तयार करावी असा प्रस्ताव संविधान सभेसमोर मांडला होता. याशिवाय मौर्य सम्राट अशोकाच्या सुवर्णकाळातील गोष्टींची रचना करताना समाविष्ट केल्यास बरे होईल, असेही नेहरूंनी सुचवले. ते म्हणाले होते की आधुनिक भारताने या समृद्ध आणि चमकदार भूतकाळाचे आदर्श आणि मूल्ये समोर आणली पाहिजेत.

जवाहरलाल नेहरू संविधान सभेत याविषयी पुढे म्हणाले की, “मी सम्राट अशोकाचा उल्लेख का केला तर, सम्राट अशोकाचा कालखंड हा भारतीय इतिहासातील एक असा काळ होता, जो प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. त्याकाळी आपण भारतीयांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला होता. त्याकाळात राष्ट्र नावाची संकल्पना नसतानाही आपण भारतीय राजदूतांना दूरवरच्या देशांमध्ये पाठवले होते आणि ते साम्राज्य विस्तारासाठी नाही तर शांतता, संस्कृती आणि सौहार्दाचे प्रतीक म्हणून पाठवले होते.

– जयपाल गायकवाड