ब्लॉग

कृष्णाजी केळुसकर गुरुजी : तथागत बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रकार

कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा जन्म २० ऑगस्ट १८६० रोजी कोकणातील वेंगुर्ला येथे झाला.तर त्यांना मृत्यू ४ ऑक्टोबर १९३४ रोज झाला. कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे मराठीतील महत्वाचे लेखक होत. त्यांना मराठीतील आद्य शिवचरित्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे.

केळुसकर गुरुजींनी १९०३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. त्याची पहिली आवृत्ती १९०७ मध्ये मराठा प्राविडंड फंडातर्फे प्रसिद्ध करण्यात आली. तत्कालीन उपलब्ध असलेली अनेक कागदपत्रे, बखरी, पत्रव्यवहार याचा अभ्यास करून त्यांनी ते ६०० पानी शिवचरित्र लिहिले. या आवृत्तीला शाहू महाराज यांनी मदत केली होती.

कागल आणि बडोदा संस्थानांनी यासाठी त्यांना पारितोषिकेही दिले होते. हे चरित्र हिंदी आणि गुजराती भाषेत अनुवादित करून प्रसिद्ध करण्यात आले होते. शिवाजी महाराजांची नवी उपलब्ध माहिती घेऊन मूळ ग्रंथात सुधारणा करून नवी आवृत्तीही प्रसिद्ध करायला घेतली होती.

मनोरंजनकार का.र. मित्र यांच्या छापखान्यात दोन्ही ग्रंथांची छपाईही करण्यात आली. पण यात त्यांना प्रचंड कर्ज झाले. इंदोर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी तत्कालीन २४००० रुपये देवून केळूसकर गुरुजींना कर्जमुक्त तर केलेच पण इंग्रजी आव्रुत्तीच्या ४००० प्रती घेवून जगभरच्या मुख्य इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या. या ग्रंथाच्या आजवर सात आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. एक आवृत्ती बामसेफनेही संपादित करून प्रसिद्ध केली आहे.

वरदा प्रकाशनाने १९९१ ते २०१० या काळात शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा चार आवृत्त्या प्रसिद्ध केल्या आहेत. आणि या ग्रंथाचे मूळ स्वरुप जपले आहे. केळुस्कर गुरुजींनी स्वतः लिहिलेले बुद्धचरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कौतुक संभारभात भेट म्हणून दिले होते. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भीमराव आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करण्याची शिफारशी केळुसकर गुरुजींनी केली होती. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस जाऊ शकले. बुद्धाच्या या चरित्राचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आणि विचारावर खोलवर परिणाम झाला. दीर्घ चिंतन आणि वाचनातून त्यांनी बुद्ध नि त्यांच्या धम्माचा समजून घेत स्वीकार केला.

केळुसकर गुरुजींनी आध्यात्मिक ज्ञानरत्नावली, गौतम बुद्ध यांचे चरित्र, तुकाराम महाराजांचे चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, फ्रांसचा जुना इतिहास, सेनेका आणि एपिक्टेटस यांची बोधवचने आदी ग्रंथ लिहिले.

-यशवंत भंडारे, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *