जगभरातील बुद्ध धम्म

लिओ टॉलस्टॉय – बुद्ध तत्वज्ञानाकडे झुकलेला विचारवंत

लिओ टॉलस्टॉय हे तरुणपणी जेंव्हा १९ वर्षाचे होते, तेव्हा काही आजारामुळे एकदा कझान इस्पितळात उपचार घेत होते. त्यावेळी तेथे चोरांनी मारहाण केल्यामुळे एका बौद्ध भिक्खूनां इस्पितळात दाखल करण्यात आले. चोराने चोरी केली आणि मारहाण केली पण भिक्खूंना चोराबद्दल दया वाटत होती. त्यांनी त्याला माफ केले होते. त्यामुळे लिओ टॉलस्टॉय यांना आश्चर्य वाटले. आणि तेव्हापासून लिओ टॉलस्टॉय यांना बौद्ध तत्वज्ञानाबद्दल आवड निर्माण झाली. आणि ती त्यांनी आयुष्यभर जोपासली.

लेव्ह निकोलायव्हीच टॉलस्टॉय ( ९ सप्टेंबर १८२८ ते २० नोव्हेंबर १९१०) यांचा रशियन ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये बाप्तिस्मा झाला होता. महाविद्यालयीन काळ संपल्यावर त्यांना जीवन, मानवप्राणी आणि सर्व जग हे अर्थहीन आणि निरस वाटू लागले. त्यांच्या ‘कन्फेशन’ या आत्मचरित्रात त्यांनी हा भावनिक खेळ मांडला आहे. १८६९ ते ८० दरम्यान लिहिलेल्या या चरित्रात त्यांच्या बालपण आणि तारुण्यात झालेली धार्मिक स्थित्यंतरे त्यांनी ठळकपणे मांडली.

सुरुवातीला ऑर्थोडॉक्स चर्च बद्दल त्यांना जिव्हाळा वाटत होता. परंतु लवकरच ते निराश झाले. तेथील भ्रष्टाचार आणि दोषपूर्ण शिकवणूक यांचा त्यांना वीट आला. पूर्वेकडील देशातील धर्म व त्यांचे तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करताकरता ते बौद्ध तत्त्वज्ञानाकडे वळले. टॉलस्टॉय यांनी त्यांच्या What I Believe (१८८३), A Confession (१८८४) आणि What Then Should We Do (१८८६) या ग्रंथात बौद्ध तत्वज्ञान हे आत्मिक उन्नतीसाठी मोझेस, मोहम्मद, सॉक्रेटिस आणि ख्रिस्त यांच्यापेक्षा अधिक योग्य आणि उच्चतम आहे असे म्हटले आहे.

१८८९ मध्ये त्यांनी ‘सिद्धार्थ’ नावाचा मोठा निबंध लिहिला. बुद्धांची मूळ शिकवणूक त्यांच्या अनुयायांनी विविध पंथ तयार करून कशी भरकटून टाकली याचाही त्यांनी निर्देश केला आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते बौद्ध तत्त्वज्ञानाकडे झुकलेले होते.The Buddha, The Circle of Reading, Anna Karenina आणि Karma ही साहित्य रचना त्यांनी त्यांच्या आयुष्यात पूर्ण केली.

ते स्वतः शाकाहारी होते. हिंसाचाराच्या विरुद्ध होते. अत्यंत साधी राहणी त्यांना पसंत होती. बहुसंख्य बौद्ध तत्वे हिंदू धर्मात झिरपली असल्याने त्यांनी हिंदुशास्त्राचा सुद्धा अभ्यास केला होता. भाषांतरित केलेली काही वैदिक मासिके ते वाचत होते. स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख केलेल्या पत्रात ते म्हणतात “भारतात स्वातंत्र्य चळवळीपेक्षा बौद्ध तत्त्वज्ञान अंगीकार करण्याची चळवळ अधिक परिणामकारक व्हायला हवी. कारण बुद्धांची मार्गदर्शक तत्त्वे ही आखिल मानव जातीतील एकमेकांतील संबंध सुधारणे, एकोप्याने राहणे आणि नैसर्गिक तसेच वैज्ञानिक बाबींशी सुसंगत, पूरक आहेत”. त्यांचे हे जाहीर पत्र गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत असताना वाचले होते. परंतु कर्मठ गांधींनी फक्त टॉलस्टॉय यांची साधी राहणी आणि अहिंसावाद तत्व उचलले.

चीनमध्ये ताओईझम रुजविणारे ‘लिओ त्सु’ यांच्या विचाराने सुद्धा लिओ टॉलस्टॉय प्रभावित झाले होते. त्यांच्या War and Peace (१८६९) या प्रसिद्ध कादंबरीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आढळतो. ‘मनाला ताब्यात ठेवणे’ हेच ताओइझमचे तत्व होते. अशा तऱ्हेने टॉलस्टॉय यांच्यावरती बुद्धीझम, हिंदू आणि ताओइझम या त्रितत्त्वांचा परिणाम झालेला दिसून येतो. पण त्यांची मुख्य धारणा हीच होती की, मानव जातीने शांततापूर्वक जीवन जगावे, एकत्रित राहून भेदभाव न बाळगता आनंदाने कालक्रमण करावे. ही बुद्धसदृष्य तत्त्वप्रणाली त्यांनी आयुष्यभर जोपासली आणि मुख्यत्वेकरून आपल्या साहित्यात मांडली.

लिओ टॉलस्टॉय हे धनिक वर्गातले होते. तरी शेतकऱ्यांशी साध्या भाषेत बोलत असत. ते म्हणत “भाषा साधी असावी. लोक साधी भाषा बोलतात. पुस्तकी भाषा बोलू नये”. ‘वॉर अँड पीस’ या त्यांच्या स्वतःच्या कादंबरीबाबत ते म्हणत की “हे एक इलियड सारखे महाकाव्य आहे”. डस्टोव्हस्कीच्या साहित्याबद्दल ते बोलत की “डस्टोव्हस्कीने विकृत माणसे रंगवली. ती खरी नव्हती. त्याने बौद्ध तत्वज्ञान वाचावयास हवे होते”. तर असे हे लिओ टॉलस्टॉय नुसतेच रशियन लेखक नव्हते तर नैतिक तत्वज्ञानी ( Moral Philosopher ) सुद्धा होते. त्यांच्या साहित्याचा प्रभाव जनमानसावर अजून टिकून आहे हे मान्य करावे लागते.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *