इतिहास

भगवान बुद्धांचा बारावा वर्षावास – वेरंजा, भाग – १४

वेरंजक अथवा वेरंजा या गावातील उदय नावाच्या ब्राह्मणाने भ. बुद्धांना वर्षावासासाठी आमंत्रण दिले. बुद्ध श्रावस्ती वरून आपल्या भिक्खू संघासह ‘वेरंजा’ या ठिकाणी पोहोचले मात्र उदयने त्यांची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. त्यावेळी तेथे प्रचंड दुष्काळ पडला होता. बुद्धकाळात वेरंजा हे उत्तरापथ या मार्गावरचे एक महत्त्वाचे ठिकाण होते.

अनेक व्यापारी या ठिकाणी प्रवासादरम्यान विश्राम करत. उदय ब्राह्मणाने कुठलीच व्यवस्था न केल्याने भ. बुद्ध संघासह जवळच असलेल्या नलेरूपचिमन्द चैत्यात मुक्कामास राहिले. त्यावेळेस या नगरीत काही घोडे व्यापारी आले होते. या व्यापाऱ्यांनी भ.बुद्ध आणि त्यांच्या भिक्खूसंघाला रोज पसाभर ज्वारी भिक्षे मध्ये देत असत असा उल्लेख विनय पिटकात सापडतो.

संपूर्ण वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांच्या संघाने कुटलेली ज्वारी खाऊन काढला. आजही या भागात ज्वारीची पिके घेतली जातात. बुद्धांनी उदय ब्राह्मणाला दोष न देता बारावा वर्षावास वेरंजा गावात व्यतीत केला. या काळात बुद्ध अनेक वेळा मथुरा या नगरीत जाऊन आल्याचा उल्लेख सापडतो. वर्षावास समाप्ती नंतर भ. बुद्ध उदय ब्राह्मणाच्या घरी गेले व त्याला उपदेश दिला जो अंगुत्तर निकाय मधील ‘वेरंजक ब्राह्मण सुत्त” म्हणून प्रसिद्ध आहे.

वर्षावास संपल्यानंतर बुद्ध पुन्हा श्रावस्तीस येण्यास निघाले. त्यांच्या प्रवासाचे वर्णन आपल्याला अंगुत्तर निकाय, जातक अट्ठाकथा आणि विनय पिटकात सापडते. भ. बुद्ध भिक्खू संघासह वेरंजा येथून सोरेय्या (आत्ताचे सोरों गाव) या मार्गे संकश्या या ठिकाणी आले. (आत्ताचे संकीसा बसंतपूर ज्या ठिकाणी बुद्धांनी सातवा वर्षावास व्यतीत केला होता). येथे काही दिवस मुक्काम करून नंतर बुद्ध कन्नाकुज्ज या ठिकाणी आले. हे आत्ताचे कन्नौज होय.

फा-हियान आणि हुयान त्सांग यांनी या नगरीचे सुंदर वर्णन केले आहे. हुयान त्सांग ने वर्णन केल्याप्रमाणे या ठिकाणी त्याकाळी शंभर बुद्ध विहाराने होते व त्यात १०,००० भिक्खू राहत होते. मौर्य काळापासून हे एक महत्त्वाचे नगर होते व त्याचा समावेश भारतातील सोळा महाजनपदात होत असे. नंतर बुद्ध भिक्खूसंघासह अलाहाबाद (आत्ताचे प्रयागराज) पोहचले. काही दिवस थांबून, नंतर गंगा नदी ओलांडून ते वाराणसीला पोहचले.

काही दिवस तेथील मृगदाव वनात व्यतीत करून तेथील भिक्खुसंघ आणि उपासकांना देशना दिली. या नंतर ते वैशाली येथील महावन कुटागारशालास पोहचले. तेथून श्रावस्ती पोहचले. बुद्धांचा हा सगळा प्रवास अंदाजे २००० किमी पायी झाला होता. श्रावस्ती ते मथुरा या महामार्गावरील कासगंज आणि सोरों या गावाच्या जवळ असलेले “बहेडिया” हे गाव बुद्धकालीन वेरंजा हे स्थान होते. येथील उत्खननात गुप्तकालीन मूर्ती देखील सापडल्या होत्या.

अतुल भोसेकर (लेखक- लेणी आणि इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *