इतिहास

भगवान बुद्धांचा तेरावा वर्षावास – चालिक पर्वत, भाग १५

भ. बुद्धांनी तेरावा वर्षावास ‘चेति’ अथवा ‘चेतिय’ या राष्ट्रातील “चालीय” अथवा “चालीक” पर्वतावर व्यतीत केला. चेतिय राष्ट्र हे यमुनेच्या तीरावर वसले होते. आधुनिक “बुंदेलखंड” प्रांत हे प्राचीन चेतिय राष्ट्र होय. बुंदेलखंड मधे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही जिल्हे येतात. त्यातील “बांदा” जिल्हा हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे म्हणजेच बुंदेलखंड प्रांतात आहे. याच जिल्ह्यात “खत्री पहाड” नावाचा डोंगर आहे. हाच तो प्राचीन काळातील चालीय पर्वत होय.

बौद्ध काळातील चालीय पर्वत (खत्री पहाड, उत्तर प्रदेश

‘मनोरथपुरणी’ या ग्रंथात म्हटले आहे कि हा पर्वत पांढरा रंगाच्या मातीचा आहे. आज या पर्वतावर विंध्यवासिनी मंदिर आहे. चालीय पर्वताच्या जवळून “किमिकाला” नदी वाहत होती असे “उदान” या प्राचीन बौद्ध ग्रंथात म्हटले आहे व त्याच्या दुसऱ्या तीरावर “जन्तुगाम” नावाच्या गावात आम्रवन होते.

याच आम्रवनात बुद्धांचा शिष्य मेधीय तेथे जाऊन ध्यान करण्याचा आग्रह बुद्धांकडे धरला होता. मात्र ती जागा ध्यानास योग्य नाही हे बुद्धांनी सांगून देखील त्याला जावेसे वाटले. त्याचा आग्रह पाहून बुद्धांनी त्याला परवानगी दिली मात्र थोड्याच वेळात मेधावी परत आला कारण त्याला ध्यान करताना  खूप वाईट विचार मनात यायला लागले होते. सध्याच्या बांदा जिल्ह्यातून वाहणारी “केन” नदी हीच प्राचीन किमिकाला नदी होय आणि त्याच्या किनारी असलेले “गोयरा” हे गाव प्राचीन जन्तुगाम होय.

श्रावस्ती वरून भ. बुद्ध चालीय पर्वतावर वर्षावासासाठी आले तो मार्ग

चेतिय राष्ट्र बुद्धांच्या काळात बौद्ध जनपद म्हणून प्रसिद्ध होते. बुद्धांनी अठरावा आणि एकोणिसावा वर्षावास देखील याच जनपदात व्यतीत केला होता. याच जनपदात भ. बुद्धांनी अनेक सुत्तांची देशना दिली होती जी प्रामुख्याने “दिग्घ निकाय” या ग्रंथात समाविष्ट केली आहेत. त्याच बरोबर चेतिय जातक व वेस्संन्तर जातक देखील इथलीच उदाहरणे आहेत.

अतुल भोसेकर (लेखक- लेणी आणि इतिहास अभ्यासक)

One Reply to “भगवान बुद्धांचा तेरावा वर्षावास – चालिक पर्वत, भाग १५

  1. Khroखर फार महत्वाची आणि सध्या भाषेत सुटसुटीत माहिती देत आहात आपण आपल्या सर्व टीम चे मनःपूर्वक धन्यवाद….

Comments are closed.