इतिहास

भगवान बुद्धांचा पंधरावा वर्षावास – कपिलवस्तू, भाग – १७

श्रावस्ती वरून बुद्ध कपिलवस्तूला पंधराव्या वर्षावासाठी आले. कपिलवस्तू ही शाक्यांची राजधानी होती. सध्याचे नेपाळ चा डोंगराळ प्रदेश व उत्तर प्रदेश मधील बहराईच आणि गोरखपूर दरम्यानचा प्रदेश म्हणजे त्याकाळचे शाक्य राज्य होते. कपिलवस्तू म्हणजे आत्ताचे नेपाळ मधील ‘तिलौरकोट’ होय. (काहींच्या मते बिहार मधील बस्ती जिल्ह्यातील पिपरहवा हे गाव आहे मात्र ते चुकीचे आहे) या नगरीच्या पूर्वेला रोहिणी नदी वाहते जिच्या तीरावर कोलीय राज्य होते.

कपिलवस्तू येथील उत्खननातील प्राचीन अवशेष

नेपाळ येथील सध्याचे लुम्बिनी नगरपालिका मधील रामग्राम गाव पूर्वीचे कोलीय राज्य होते. येथील ‘रामग्राम स्तूप’ हे भ. बुद्धांच्या अस्थी असलेले एकमेव उध्वस्त न झालेले स्तूप होय. प्राचीन देवदह हे खरं तर शाक्यांच्या प्रदेशमधील एक पुष्करिणी होती. ती आजही सुरक्षित आहे आणि त्याच नावाने आजही विख्यात आहे. येथील देवदह नगरीत केलेल्या उत्खननात भवानीपूर येथे महामायाचे मंदिर सापडले आहे. तसेच तेथे प्राचीन विहीर देखील सापडली आहे. याच गावात एक ‘पाकरी वृक्ष’ पाहायला मिळतो.

भवानीपूर, देवदह येथील उत्खननात काही प्राचीन अवशेष

आशिया खंडातील हा सर्वात प्राचीन आणि मोठा पिंपळ वृक्ष असून त्याचा घेर ८२ फूट आहे तर त्याच्या फांद्या ५०० फुटांचा घेर व्याप्त केला आहे. जेव्हा सिद्धार्थ देवदहला येत असे त्यावेळेस या वृक्षाखाली ध्यान करत असे अशी येथील मान्यता आहे. विशेष म्हणजे या झाडावर एकही पक्षी बसत नाही किंवा घरटे घालीत नाही किंवा हत्ती धडक देत नाही. सध्याचे ‘रुम्मनदेई’ हेच प्राचीन लुम्बिनी आहे.

हे पण वाचा : भगवान बुद्धांचा चौदावा वर्षावास – श्रावस्ती, भाग १६

रोहिणी नदी, पाकरी पिंपळ वृक्ष, देवदह

चिनी बौद्ध भिक्खू फा हियान याने लुम्बिनी शेजारी एक नदी वाहते जिला तेलासारखा वास येतो आणि म्हणून लोक तिला ‘तेल नदी’ म्हणून संबोधतात असे लिहिले आहे. आजही रुम्मनदेई येथून एक नदी वाहते जिला “तेलार” नावाने ओळखतात. कपिलवस्तू जवळील न्यग्रोधाराम विहारात बुद्ध अनेक वेळा वर्षावासाच्या काळात राहिले आहे. हे स्थळ आत्ताचे ‘कुडण’ गाव होय. येथेच उत्खननात न्यग्रोधाराम स्तूप व इतर दोन स्तूप सापडले आहेत.

हे पण वाचा : भगवान बुद्धांचा तेरावा वर्षावास – चालिक पर्वत, भाग १५

देवदह येथील प्राचीन विहीर

पंधराव्या वर्षावासात बुद्ध जेव्हा कपिलवस्तुस आले, तेव्हा त्यांचे सासरे सुप्रबुद्ध यांनी त्यांच्याप्रति आपला राग जाहीर केला. प्रत्येक वडील आपल्या मुलीबद्दल खूप हलवा असतो आणि त्याला आपल्या जावयाकडून अपेक्षा असतात. मात्र जेव्हा सिद्धार्थाने गृहत्याग व आपल्या मुलीला – भद्द कात्यायनी (हेच नाव योग्य आहे. यशोधरा हे नंतरचे दिलेले नाव आहे) देखील भिक्खुणी संघात सामील करून घेतले तेव्हा सुप्रबुद्धाला राग आला. या वर्षावासात तो बुद्धांच्या रस्त्यात उभा राहिला आणि बुद्धांना जाब विचारू लागला. नंतर बुद्धांनी कपिलवस्तुस न जाता काही काळ आलार कालामच्या आश्रमात मुक्काम केला. याचे वर्णन आपल्याला अंगुत्तर निकाय मधील ‘भरन्दू सुत्तात’ पाहायला मिळते. नंतर बुद्ध न्यग्रोधाराम विहारात वर्षावासासाठी गेले.

हे पण वाचा : भगवान बुद्धांचा बारावा वर्षावास – वेरंजा, भाग – १४

कपिलवस्तू येथील अवशेष

याच काळात बुद्धांनी चुल्लदुक्खाखंद सुत्त, माचुपिण्डक सुत्त, सेख सुत्त, महासुञता सुत्त यांची देशना दिली होती. ही सर्व सुत्त मझ्जिम निकायात समाविष्ट केली आहेत. तसेच संयुत्त निकाय मधील पिंडिल सुत्त, महानाम सुत्त आणि गिलान सुत्त हे देखील येथे दिली होती. याच वर्षी बुद्धांचे सासरे सुप्रबुद्ध यांचे निधन झाले होते.

अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – बौद्ध लेणी आणि इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *