इतिहास

भगवान बुद्धांचा सतरावा वर्षावास, राजगृह – भाग – १९

आलवी (आलवी हे आत्ताचे कानपूर जिल्ह्यातील, बिलहौर शहरा जवळील अरौल किंवा अरुल गांव) येथील सोळावा वर्षावास संपल्या नंतर भ. बुद्ध राजगृहाला पोहचले. तेथे सतराव्या वर्षावास वेळुवनात आणि गृध्रकूट पर्वतावर व्यतीत करण्यासाठी बुद्ध पोहचले होते. त्यांच्या मागच्या वर्षावासाच्या काळात एक गरीब शेतकरी त्यांची देशना ऐकू शकला नव्हता कारण तो दुसऱ्या गावी गेला होता. तो स्वतःला कमनशिबी समजत होता व बुद्धांना परत भेटता येणार नाही याबद्दल खंत करीत होता.

हे पण वाचा : भगवान बुद्धांचा सोळावा वर्षावास, आलवी – भाग – १८

भगवान बुद्ध राजगृहाला आल्यानंतर त्यांच्या कानावर ही गोष्ट आली. या शेतकऱ्या बद्दल बुद्धांच्या मनात अनुकंपना निर्माण झाली. ते पुन्हा श्रावस्तीला पोहचले आणि तेथून आलवीला त्या शेतकऱ्याला भेटण्यासाठी आले. भोजनानंतर त्यांची देशना ऐकण्यासाठी सर्वजण जमले मात्र तो शेतकरी न दिसल्यामुळे बुद्ध त्याची येण्याची वाट पाहत थांबले. त्याच दिवशी त्या शेतकऱ्याचा बैल हरवला होता आणि त्याच्या शोधार्थ शेतकऱ्याला उशीर झाला. दमून भागून उपाशीच तो बुद्धांची देशना ऐकण्यास आला. दिवसभर तो उपाशीच, विमन्सक स्थितीत फिरत असल्याचे बुद्धांच्या लक्षात आले. त्याला आधी बुद्धांनी जेवण घेण्यास सांगितले. शेतकरी जेवून ताजातवाना झाल्यानंतर बुद्धांनी देशनेस प्रारंभ केला. बुद्धांनी चार अरिय सत्यांचा उपदेश केला जो ऐकून शेतकरी तेथेच स्रोतापन्न झाला. त्यानंतर बुद्ध पुन्हा राजगृहाला आले. एका शेतकऱ्याला धम्मज्ञान देण्यासाठी बुद्धांनी जवळपास १४०० किमी पायी प्रवास केला होता!

राजगृह भोवतालची मौर्य कालीन भिंत

राजगृहाला आल्यानंतर बुद्ध काही काळ वेळुवनात थांबले, मात्र नंतर ते गृध्रकूट पर्वतावर ध्यानासाठी गेले. राजगृहाचे बुद्धकालीन नाव “गिरिव्रज” होते. पालि साहित्यात याचा उल्लेख “मगधानं पुरुत्तमं” म्हणजेच ‘मगधाचे उत्तम नगर’ असा केला आहे. बिम्बिसार याने वसवलेल्या या नगराला चोहोबाजूने एक भक्कम तटबंदी होती. उत्खननात दिसल्या नुसार ही भिंत काही ठिकाणी १४ फूट तर काही ठिकाणी १८ फूट रुंद होती व काही ठिकाणी ११ फूट उंच होती. ही भिंत ४० किमी लांबीची आहे. आज ही त्याचे अवशेष संपूर्ण राजगीर नगरीत दिसून येतात. मोठे दगड आणि त्यात चुनखडीचे बारीक तुकडे यांनी बनलेली ही भिंत आजही अनेक ठिकाणी शाबूत आहे. मात्र राजगीर गावातील बराच मोठा भाग येथील लोकांनी उकरून या भिंतीतले दगड व मौर्यकालीन विटा नेवून आपली घरे बांधल्याचे दिसते. त्याच्या खुणा या घरांच्या प्लास्टरच्या थरा खाली दिसतात. या भिंतीला “Cyclopean wall” म्हटले आहे. १९८७ साली या भिंतीला युनेस्को ने “जागतिक वारसा स्थळ” म्हणून घोषित केले आहे.

गृध्रकूट पर्वताचे एक टोक जेथे भ. बुद्ध ध्यानाला बसत. हीच ती गंधकुटी

गृध्रकूट पर्वतावर बुद्धांनी या वर्षावासात काही काळ व्यतीत केला. सारीपुत्त, महाकात्यायन देखील या काळात बुद्धांसोबत होते. येथेच बुद्धांनी वक्कलि ला उपदेश केला होता जो संयुत्त निकाय मधे “वक्कलि सुत्त” म्हणून नोंद आहे. याच पर्वतावर बुद्धांनी या वर्षावासात “देवदत्त सुत्त, यजमान सुत्त, पुग्गल सुत्त, सक्क सुत्त, वेपुल्ल पब्बत सुत्त आणि पक्कन्त सुत्त यांची देशना दिली होती. ही सर्व सुत्त ‘संयुत्त निकाय’ मधे दिली गेली आहेत. गृध्रकूट पर्वतावर ज्या ठिकाणी बुद्ध ध्यानासाठी बसत, तेथे सम्राट अशोकाने ‘गंधकुटी’ बांधली जी आजही पाहायला मिळते. याच पार्वतीच्या खाली, दक्षिणेकडे एक गुहा आहे जेथे सारीपुत्त आणि आनंद ध्यान करत असत असा उल्लेख युआन त्सांग याने आपल्या प्रवास वर्णनात केला आहे.

हे पण वाचा : भगवान बुद्धांचा पंधरावा वर्षावास, कपिलवस्तू – भाग – १७

या नंतर भ. बुद्धांनी आपला अठरावा आणि एकुणिसावा वर्षावास चालीय पर्वतावर व्यतीत केला ज्याचे उल्लेख तेराव्या वर्षावासा मधे आले आहे.

अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – बौद्ध लेणी आणि इतिहास अभ्यासक)

One Reply to “भगवान बुद्धांचा सतरावा वर्षावास, राजगृह – भाग – १९

  1. साधु ! साधु !! साधु !!!
    सबका मंगल हो ! All Being Be Happy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *