श्रावस्तीला असताना भ.बुद्धांना कोसंबीचे तीन श्रेष्ठ व्यापारी – घोसित, कुक्कुट आणि पावारीक हे भेटायला आले होते. बुद्धांची देशना झाल्यानंतर या तिघांनी बुद्धांना कोसंबी येथे वर्षावास करण्याची विनंती केली जी बुद्धांनी मान्य केली. संसुमारगिरी येथील वर्षावास संपल्यानंतर बुद्ध चारिका करत कोसंबी नगरीत पोहचले.

कोसंबी ही बुद्धांच्या काळी प्रमुख सहा महानगरांपैकी एक होती. कोसंबी पासून राजगृह, श्रावस्ती, तसेच वाराणसी आणि उज्जयिनी साठी महामार्ग होते. बावरी ब्राह्मणाचे शिष्य बुद्धांना भेटण्यासाठी श्रावस्तीला जात असताना कोसंबी मधे थांबले होते असा उल्लेख आहे. वर नमूद केलेल्या सर्व श्रेष्ठींनी बौद्ध भिक्खू संघासाठी तीन स्वतंत्र मोठे विहार बांधले व दान दिले. या विहारांची नावे – घोसिताराम , कुक्कुटराम आणि पावारीकम्ब वन. आजही येथे घोसिताराम विहाराचे अवशेष पाहायला मिळतात, इतर दोन विहाराचे नष्ट झाले आहेत.

कोसंबीचा राजा उदयन याचे यमुना नदीच्या तीरावर उदयन वन होते. त्याच्या किल्ल्याचे भग्न अवशेष आजही पाहायला मिळतात. (अनेकांची २-३ मजली घरे याच्या विटातून झाली आहेत!) चवथ्या शतकात युआन त्सांग ने घोसिताराम, कुक्कुटराम विहार आणि पावारीकम्ब वनाचे अवशेष पहिले होते. तसेच येथे असलेले बुद्धांचे स्नानघरही पहिले होते. येथे सम्राट अशोकाने उभारलेला २०० फूट उंचीचा स्तूप देखील पहिला होता. बुद्धांचा प्रमुख भिक्खू स्थविर वक्कलि आणि तिस्स यांचा जन्म कोसंबीचा होता. भिक्खुनी खज्जुतारा, सामा या कोसंबीच्या होत्या.

येथे वर्षावास करताना बुद्ध एकदा कम्मासदम्मा नगरीत गेले असता, तेथे मागन्दिय ब्राह्मणाने त्याची अतिशय सुंदर कन्या मागन्दिया हिला बुद्धांना अर्पण करण्याची तयारी केली व तशी विनंती देखील केली होती. बुद्धांनी त्याला शरीर तसेच शरीर सौंदर्येच्या अनित्यतेचा उपदेश दिला जो ‘सुत्त निपात’ मधे ‘मागन्दिय सुत्त” नावाने प्रसिद्ध आहे. याच काळात घोसिताराम जवळ असलेल्या डोंगरावरील “पिलक्ख गुहा” मध्ये बुद्धांनी ध्यान केल्याचा उल्लेख आहे. सध्याचे पभोसा किंवा प्रभास गुहा म्हणून ही गुहा प्रसिद्ध आहे मात्र तेथे आता मकर संक्रातीची जत्रा भरत असते.

बुद्धांनी ज्या ठिकाणी वर्षावास केला तेथे सम्राट अशोकाने स्तंभ उभारला व त्यावर धम्मलिपीत शिलालेख लिहिला. साधारणतः ४ थ्या शतकात अशोकाच्या शिलालेखाखाली समुद्रगुप्ताने स्वतःचे गौरवगान असलेला शिलालेख लिहिला. पुढे हा स्तंभ मोगलांच्या काळात अलाहाबाद (सध्याचे प्रयागराज) येथे हलविण्यात आला. त्यावर नंतर जहांगीरने पर्शियन भाषेत शिलालेख लिहिला.
बुद्धांच्या काळी प्रसिद्ध असलेली कोसंबी नगरीं आत्ताचे “कोसम खिराज” नावाचे गाव असून ते उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात आहे. येथेच उत्खननात घोसिताराम विहाराचे अवशेष सापडले आहेत.
दुर्दैवाने उत्तर प्रदेश सरकार कोसंबी येथील पुरातत्त्वीय अवशेषांना जास्त महत्त्व किंवा त्याचे संवर्धन करताना दिसत नाही.
अतुल भोसेकर
संदर्भ:
On Yuan Tsang Travels
सुत्त निपात
Ancient Geography of India
विनय पिटक
बुद्धचर्या