इतिहास

बुद्धप्रेमी महाराजा सयाजीराव गायकवाड

महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराजा सयाजीराव हे जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत आठव्या क्रमांकावर होते. स्वतःवर आणि कुटुंबावर कमीत कमी खर्च करून देशभरातल्या संस्थांना आणि व्यक्तींना मदत करून त्यांनी आधुनिक भारताचा पाया रचला.

उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना महाराजा सयाजीरावांनी शिष्यवृत्ती दिली. एका विद्यार्थ्याला एकदाच मदत करण्याचा नियम बाजूला ठेवून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चार वर्ष पदवी शिक्षण, दोन वर्षं अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ, एक वर्ष पुन्हा शिष्यवृत्ती आणि चौथ्यांदा पुन्हा एका वर्षाची शिष्यवृत्ती दिली. ते बाबासाहेबांना बडोद्याचे अर्थमंत्री बनवू इच्छित होते. पण अस्पृश्यतेमुळे होणार्‍या त्रासामुळे बाबासाहेब मुंबईला परतावे लागले. हा इतिहास सर्वांना परिचित आहेच पण महाराजा सयाजीरावांचे बुद्ध प्रेम कमी लोकांना ज्ञात आहे.

महाराजा सयाजीरावांचे बुद्धप्रेम :

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बालपणात भगवान बुद्धांविषयी श्रद्धा निर्माण करणारे ”गौतम बुद्धाचे चरित्र” हे कृष्णराव केळूस्कर गुरुजींनी लिहिलेले होते. केळूस्कर गुरुजींना मराठीतले पाहिजे भगवान बुद्धाचे चरित्र प्रकाशन करण्यास महाराजा सयाजीरावांनी अर्थसहाय्य केले होते.

महाराजा सयाजीरावांनी १९१० साली ”भगवान बुद्ध आणि बौद्धधर्म” या विषयावर बडोद्याला व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. धर्मानंद कोसंबी यांनी त्यावेळी बुद्ध, धम्म आणि संघ या विषयावर मराठी भाषेतून पाच व्याख्याने दिली होती.

डॉ.आनंद एल.नायर १९२२ साली बौद्ध सोसायटीची स्थापना केली होती. त्यांनी १९३१ साली मुंबईला आनंद बुद्ध विहार बांधले आणि या बुद्धविहारचे उदघाटन बुद्धप्रेमी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले होते.

महाराजांनी बडोद्याच्या कॉलेजमध्ये, त्याचप्रमाणे हायस्कुलच्या अभ्यासक्रमात पाली भाषेचा अभ्यास ठेवला होता. या कार्यासाठी त्यांनी प्राध्यापक राजवाडे यांची नियुक्ती केली होती. महाराजांच्या आज्ञेवरून प्राध्यापक राजवाडे यांनी बौद्ध ग्रंथ ‘दीघ निकाय’ याचे मराठीत भाषांतर करून ते तीन भागात प्रसिद्ध केले.

पाली भाषेच्या अभ्यासाच्या उत्तेजनार्थ सयाजीराव महाराजांनी बडोद्याच्या कॉलेजमध्ये आणि मुंबईच्या फर्ग्यूसन कॉलेजमध्ये शिष्यवृत्या ठेवल्या. पालि भाषेतील समग्र बौद्ध ग्रंथांचे देवनागरी लिपीत आणि मराठी भाषेत भाषांतर करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. ह्या कार्याला अग्रक्रम देऊन ते प्रथम हाती घेण्यासंबंधी त्यांनी श्री. यन्दे यांना इ.स.१९३१ साली सूचना दिली होती.

12 डिसेंबर 1912 रोजी बडोद्याच्या ज्युबिली बागेत जपान येथील कामाकुराच्या भगवान बुद्धाच्या विश्वविख्यात पुतळ्याची ब्राँझच्या धातूची भव्य प्रतिकृती स्थापन केली. ह्यावरून सयाजीराव महाराजांची भगवान बुद्धावरील आणि बुद्धधम्मावराल अपार श्रध्दा आणि प्रेम दिसून येते.

– जयपाल गायकवाड, नांदेड

.

One Reply to “बुद्धप्रेमी महाराजा सयाजीराव गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *