इतिहास

भगवान बुद्धांचा पाचवा वर्षावास – कुटागारशाला, वैशाली, भाग ८

चवथा वर्षावास संपवून भ. बुद्ध राजगृह वरून वैशाली येथील महावन कुटागारशाला येथे विहार करू लागले. वैशाली बद्दल लिहिताना आचार्य बुद्धघोष लिहितात, “विसालीभूतत्ता वेसालीति वूच्चति” म्हणजे सतत वाढत, विशाल होत जाणारी. याचे कारण म्हणजे बुद्धकाळातच वैशालीचे तीनवेळेस सीमा वाढवाव्या लागल्या. येथे असताना भ. बुद्धांना निरोप मिळाला कि राजा शुद्धोधन (बुद्धांचे वडील) यांचे निधन झाले आहे.

बुद्धांच्या महापरिनिर्वाण नंतर त्यांच्या अस्थींवर लिच्छवियांनी उभारलेला स्तूप, वैशाली

याच काळात शाक्य आणि कोलियांमध्ये रोहिणी नदीच्या पाणी वापरावरून भांडण झाले होते. भ. बुद्ध कपिलवस्तुस निघाले. ही त्यांची दुसरी भेट होती. तेथे पोहचल्यानंतर भ. बुद्ध न्यग्रोधाराम वनात थांबले. दुःखी नातेवाईकांचे सांत्वन करून महापजापति गोतमी कडे गेले असता, तिने गृहत्याग करून भिक्खुणी म्हणून जीवन व्यतीत करण्याची विनंती केली. बुद्धांनी हे मान्य केले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शाक्य कुळात तिच्या एवढी जेष्ठ व्यक्ती नव्हती. राजा शुद्धोधनाच्या निधनानंतर जो वाद कोलियांशी उद्भवला होता, त्याला महापजापति रोखू शकत होती. आनंद आणि राहुलची दीक्षा आधीच झाल्यामुळे, राज्य सांभाळायला महापजापति सक्षम होती. भ. बुद्ध पुन्हा वैशाली कडे निघाले.

राजा शुद्धोधनाच्या महालाचे पूर्व दरवाजाचे अवशेष

वैशाली ही लिच्छवियांची राजधानी होती. संपूर्ण लोकशाही तेथे होती आणि त्यांचा प्रत्येक निर्णय हा लोकशाही मार्गाने, एकत्रितपणे घेतला जायचा. त्यांचे एकीचे बुद्धांनी अनेकवेळा प्रशंसा केली आहे असे अनेक सुत्तात दिसते. बुद्धांची ही एक आवडती नगरी होय. गृहत्यागानंतर सिद्धार्थ काही काळ येथे थांबले होते. संयुत्त निकायातून कळते कि बुद्धांनी याच वैशालीमध्ये अर्धा महिना एकांतवास केला होता. वैशाली मध्ये बुद्धांनी अनेक सुत्तांची देशना दिली होती. आम्रपाली मुळे देखील वैशाली नगरी प्रसिद्ध होती. तिने आपले आम्रवन – अम्बपालि वन हे भिक्खू संघाला दान दिले होते.

कपिलवस्तू येथील राजवाड्यातील उत्खनन

कुन्दपूर ही वैशालीची उपनगरी. येथेच निगण्ठ नाथपुत्त म्हणजेच भ. महावीरांच्या जन्म झाला होता. जैन सूत्रांनुसार महावीरांनी येथे बारा वर्षावास केले होते.

महाराणी महामायाचा महाल (आता तेथे महामाया चे मंदिर असे संबोधले जाते)

शाक्य कोलियांचा वाद मिटवत, सगळा राज्यकारभार शक्यसंघाकडे सुपूर्द करत, महापजापति गोतमी राजवाड्यातील व कपिलवस्तू येथील स्त्रियांना घेऊन वैशाली येथे आली. यावेळेस तिने भन्ते आनंद यांना बुद्धांकडे सर्व महिलांना दीक्षा देण्याची विनंती करण्यास सांगितले. याच वनात बुद्धांनी महापजापति गोतमी आणि अन्य स्त्रियांना दीक्षा दिली आणि भिक्खुणी संघाची स्थापना करण्यात आली.

कपिलवस्तू येथील उत्खनन सुरु असताना

येथील महावन कुटागारशाला अतिशय मोठे वन होते. बुद्ध ज्या ठिकाणी वर्षावास करीत होते, त्या ठिकाणी सम्राट अशोकाने एक स्तूप आणि स्तंभ उभारला. हे महावन कुटागारशाला आत्ताचे कोलहुआ’ हे ठिकाण होय. वैशाली नगरी ही आत्ताचे ‘बसाढ’ गाव होय. दोन्हीही ठिकाणे बिहार येथील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील आहेत.

लुम्बिनी(रुम्मानदेयी) येथे सम्राट अशोकाने उभारलेला स्तूप, राजा शुद्धोधनाचे निधन झाल्याचे कळल्यानंतर बुद्धांनी वैशाली ते कपिलवस्तू असा प्रवास केला

अतुल भोसेकर

संदर्भ:
Travels of Fa – Hein
On Travels of Huan Tsang
संयुत्त निकाय
महापरिनिब्बाण सुत्त
The Life of the Buddha
महापरिनिर्वाण यात्री
बुद्धचर्या
Dictionary of Pali Proper Names

4 Replies to “भगवान बुद्धांचा पाचवा वर्षावास – कुटागारशाला, वैशाली, भाग ८

  1. It is very nice and usefull activity whuch is run by dhamachakra team.. thank you so much for given us true and historical information about Bhagwan Samyak sambhuddha..

Comments are closed.