विनय पिटकात लिहिल्याप्रमाणे, श्रावस्तीचा श्रेष्ठी सुदत्त याने बुद्धांना वर्षावास साठी विनंती केल्यानंतर, बुद्धांनी त्याला सांगितले की वर्षावाशा शून्यागार मध्ये अथवा एखाद्या वनात जिथे भिक्खूसंघासाठी सोय होत असेल अशा ठिकाणी वर्षावास केला जातो. बुद्धांचा हा होकार समजून, सुदत्तने श्रावस्ती मधील जेत राजकुमारकडून त्यांचे वन हवे त्या किमतीला विकत घेतले. याचे खूप सुंदर वर्णन विनय पिटक आणि सुमंगलविलासिनी या ग्रंथात केले आहे.

जितक्या सुवर्ण कर्षापान (सोन्याचे नाणी) जमिनीवर अंथरशील तितकी तुझी जमीन या जेत राजकुमारांचे आव्हान स्वीकारत, सुदत्तने आपल्या भांडारगृहातून गाड्या भरून सुवर्ण नाण्यांची पोती मागीवली आणि जेत वनात अंथरली. दिवसभर हे चालू होते. शेवटी जेत राजकुमारांनी त्याला थांबायला विनंती केली आणि स्वतःसाठी पूर्वेतीलक कोपरा राखून ठेवत संपूर्ण वन सुदत्तला दिले.

एका अंदाजानुसार सुदत्तने बुद्धांसाठी विहार बांधण्यासाठी 64 कोटी रुपये देऊन जमीन विकत घेतली आणि तेवढेच रुपये जेतवनराम विहार उभारण्यात लावले. आज त्या स्थानाचे पुरातत्त्वीय अवशेष पाहिले की सुदत्तने बांधलेल्या या भव्य विहाराची कल्पना करता येते. सुदत्तने वेळोवेळी भिक्खू संघाला केली मदत पाहूनच बुद्धांनी त्याला “अनाथपिंडक” हे नाव दिले व त्याच्या दानाचे अनुमोदन केले.

जो पूर्वेच्या भाग जेत राजकुमारांनी राखून ठेवला तिथे त्यांनी एक प्रवेशदार बांधले. याच ठिकाणी, आनंदाने मूळ बोधिवृक्षाच्या फांदीपासून एक रोपटे येथे लावले व त्याचे संगोपन केले. भ.बुद्धांनी येथे एक रात्र ध्यान केले होते . भन्ते आनंदाने लावलेल्या या वृक्षाला “आनंदबोधी” वृक्ष असे संबोधण्यात आले. आजही त्या वृक्षाचे “वारसदार” त्याच ठिकाणे उभे आहे. अनेकजण या आनंदबोधी वृक्षाच्या छायेत ध्यान करताना दिसतात. राजगृहातून बुद्ध येथे आले आणि त्यांनी अनाथपिंडाकाचे हे दान स्वीकारले. तेथे एक रात्र बुद्धांनी मुक्काम केला.

1862 आणि 1876 मध्ये कांनींघमने येथे उत्खनन केले व बुद्धकालीन श्रावस्ती व जेतवन म्हणजेच आजचे बहराईच जिल्ह्यातील महेट आणि गोंडा जिल्ह्यातील सहेट होय. दोन्हीही जिल्हे हे शेजार असून सहेट महेट ही गावे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. तेथील उत्खननात संपूर्ण श्रावस्ती परिसराचे तत्कालीन अवशेष आजही पाहायला मिळतात.
श्रावस्ती मधून बुद्ध आलवी (आत्ताचे अरवल) आणि किटागिरी (आत्ताचे केराकट, जौनपूर, उत्तर प्रदेश) या मार्गे राजगृहाला (राजगीर) पोहचले. हे अंतर 681 किमी होते. नकाशात A म्हणजे अरवल आणि B म्हणजे केराकट होय. राजगृह येथे बुद्धांनक तिसरा वर्षावास व्यतीत केला.
अतुल भोसेकर
संदर्भ:
The Life of Buddha
विनय पिटक
मजझीम निकाय
उत्तर प्रदेश में बौद्ध धर्म का विकास
बुद्धचर्या
Travels of Fa Hein
Political History of Ancient India
संयुत्त निकाय
On Travels of Huan Tsang