बुद्ध तत्वज्ञान

भगवान बुद्धांनी प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे धम्म शिकविला

भगवान बुद्धांनी माणसा माणसांतील असा फरक जाणून प्रत्येक माणसाला धम्म शिकविण्याची वेगवेगळी पद्धत ठेवली होती. उदारणार्थ एखाद्या भुकेलेल्या, थकलेल्या पण धम्म शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या माणसाला, त्याला पोट भरून जेवण देऊन पुरेशी विश्रांती दिल्याशिवाय ते शिकवित नसत.

एकदा एका शेतकऱ्याचा बैल हरवला होता. त्या बैलाला शोधत तो दिवसभर रानावनात न खाता-पिता फिरत होता. सायंकाळी तो परत चालला असता एके ठिकाणी भगवान बुद्ध धम्म शिकवित असल्याचे त्याने पाहिले. धम्म शिकण्यासाठी तो तेथे थांबला.

भगवान बुद्धांनी थकलेल्या, भुकेलेल्या त्या माणसाकडे पाहिले. तिथे जमलेल्या लोकांना प्रथम त्याला जेवण देण्याचे सांगितले. जेवून तृप्त झाल्यावर धम्म शिकण्यासाठी पुन्हा तो भगवान बुद्धांच्याकडे आला. तेव्हाच भगवान बुद्धांनी त्याला धम्म शिकविला.

हे पण वाचा : किसा गौतमी : सर्व अनित्य आहे. हाच सृष्टीचा नियम आहे

आपल्याला माहिती असेल किसा गौतमीची अशीच एक गोष्ट आहे. मुलाच्या मृत्युमुळे जिचे मन विचलित झाले आहे तिला शब्दांनी अनित्यतेबद्दल किंवा मृत्यु अटळ आहे या बद्दल कोरडा उपदेश करण्यात अर्थ नव्हता. म्हणून भगवान बुद्धांनी ज्या घरात एकही मृत्यु झाला नाही अशा घरातून तिला मुठभर मोहऱ्या आणण्यास सागितले. अशा त-हेने शब्दांनी न शिकविता प्रत्यक्ष अनुभूतीतून तिला धम्म शिकविला. भगवान बुद्ध प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे धम्म शिकवित असत.