चेतिय राष्ट्रातील वर्षावास संपवून भ. बुद्ध आलेल्या रस्त्याने पुन्हा श्रावस्तीस निघाले. त्यांचा चौदावा वर्षावास श्रावस्ती येथील विशाखाने बांधलेल्या ‘पूर्वाराम’ विहारात व्यतीत केला. या वर्षी राहुल (भ.बुद्धांचा मुलगा) वीस वर्षाचा झाला होता आणि भिक्खू संघाच्या नियमानुसार त्याची ‘उपसम्पदा’ याच विहारात पार पडली. येथून जवळच असलेल्या अंधवन मधे बुद्धांनी राहुलला ज्या सुत्ताची देशना दिली होती त्याला ‘राहुलोवाद सुत्त’ म्हटले आहे ज्याचा समावेश मज्झीम निकाय मधे केला आहे. आपले शरीर ज्या पंच धातूंनी बनलेले आहे त्यांची अनित्यता आणि अनात्म यावर ही देशना आधारित होती आणि याची जाणीव होण्यासाठी या पंच धातूंवर ध्यान कसे करावे हे बुद्धांनी सांगितले.

याच वर्षावासात श्रावस्तीच्या पूर्वे कडे रम्मक नावाच्या ब्राह्मणाचा ‘रम्मकाराम’ नावाचा आश्रम होता. बुद्ध तेथे गेले आणि ‘अरिय मार्ग’ कसा सापडला याचे विवेचन केले. हेच सुत्त मज्झीम निकाय मधे ‘अरिय परियेसन सुत्त’ म्हणून प्रसिद्ध आहे.

मृगारमाता विशाखा हिने दान दिलेला पूर्वाराम विहार स्थविर महामौदगल्यायन यांच्या देखरेखी खाली तयार करण्यात आला होता. हा विहार जेतवन विहाराच्या जवळ, पूर्व दिशेला होता. ‘बुद्धचर्या’ आणि विनय पिटक वरून कळते कि श्रावस्ती मधे राहत असताना, जर बुद्ध दिवसा जेतवन मधे असले कि रात्र पूर्वाराम विहारात अराम करत आणि जर दिवसा पूर्वाराम विहारात असले कि रात्र जेतवन विहारात अराम करत. धम्मपद अट्ठकथा नुसार पूर्वाराम विहारात ताल मजल्यावर ५०० खोल्या आणि पहिल्या मजल्यावर ५०० खोल्या अशा एकूण १००० खोल्या होत्या. उत्तर प्रदेश मधील सहेत महेत ही दोन गावे म्हणजेच प्राचीन श्रावस्ती नगरीतील जेतवन आणि पूर्वाराम विहारांचा परिसर होय. सहेत हे गोंडा जिल्ह्या आहे तर महेत हे बहराईच जिल्ह्यात येते. मात्र ही दोन्ही गावे अगदी जवळ आहेत.

१८७६ साली कन्नीन्घम यांनी केलेल्या उत्खननात त्यांना येथे साडेसात फूट उंचीची बोधिसत्त्वाची मूर्ती सापडली होती व त्यावर धम्मलिपीत लिहिलेल्या शिलालेखा वरून ही मूर्ती बल नावाच्या भिक्खूने ती दान दिल्याचे समजते. त्याच बरोबर येथे अनेक नाणी, मणी, माला व मूर्ती सापडल्या आहेत.
अतुल भोसेकर, नाशिक (लेखक – बौद्ध लेणी आणि इतिहास अभ्यासक)
Boudh dhamm