इतिहास

भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण आणि देहाचा अग्निसंस्कार

भगवान बुद्ध आपली अंतिम चारिका करताना वैशालीतून पुढे जात जात पावा येथे पोहोचले. तेथे चुन्द नावाच्या लोहाराच्या आम्रवनांत थांबले. तेव्हा चुन्दाने त्यांना भिक्खूसंघासहित दुस-या दिवशीच्या भोजनाचे आमंत्रण दिले आणि स्वादिष्ट खीर वगैरे मिष्टान्नाबरोबरच सूकरमद्दवाचीही सिद्धता केली. भगवंतांनी चुन्दाच्या घरचे भोजन ग्रहण केले व चुन्दास धर्मोपदेश करून ते निघाले. परंतु चुन्दाने दिलेले भोजन भगवंतांच्या प्रकृतीस मानवले नाही. घोर आजार झाला व अतिसारामुळे मरणप्राय वेदना होऊ लागल्या . परंतु त्यांनी ‘स्मृती-सम्प्रजन्यच्या ‘नियोगाने त्या सर्व सहन केल्या. थोडे बरे वाटल्यावर सर्वजण पावाहून कुशिनाराला निघाले. त्यावेळी त्यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाली होती. (इ.स.पूर्वी ५४३) व तो दिवस पौर्णिमेचा होता. आपला अंतकाळ समीप आला आहे, हे जाणून वाराणसीपासून सुमारे एकशे वीस मैलावर असलेल्या कुशिनगरास ते सायंकाळच्या वेळी येऊन पोहोचले. कुशिनगराच्या उपवर्तनात मल्लांच्या शालवनांमध्ये, दोन शाल-वृक्षांच्या मध्यभागी, त्यांनी प्राचीन रूढीप्रमाणे उत्तरेला डोक्याचा भाग करून अंथरूण घालावयास लावले व त्यावर ते आडवे झाले आणि निर्मळ मनाने आपल्या शिष्यसमुदायास अंतिम सूचना देऊन त्यांनी त्यांचा शेवटचा निरोप घेतला. परंतु त्यांनी निक्षून सांगितले की, चुन्दास कसलेही लांछन लावू नये.

तथागतांची उत्तरक्रिया कशी झाली?

कुशिनाराच्या मल्लांनी आनंद स्थविरांना विचारले, “आता तथागतांच्या देहाची व्यवस्था कशी करावी?’ आनंद स्थविर म्हणाले, लोक राजा-महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात, तशीच तथागतांची उत्तरक्रिया व्हायला पाहिजे. महाराजाचा देह प्रथम नव्या कोन्या वस्त्रांत गुंडाळतात; नंतर कापूस-लोकरीने गुंडाळून पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक, दोन्ही प्रकारचे पाचशे फेरे होईपर्यंत करतात. नंतर देहाला एका तेलाने भरलेल्या मोठ्या कढईत ठेवतात आणि तिच्यावर तसेच दुसरे लोखंडी झांकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रचतात. अशा प्रकारे लोक राजामहाराजांची उत्तरक्रिया करतात, तशीच तथागतांची करावी.”

असा झाला भगवंतांच्या देहाचा अग्निसंस्कार

भगवंतांचे महापरिनिर्वाण लवकरच होणार आहे, अशी बातमी आ.आनंदांनी कुशिनगराच्या मल्लांना कळविली. सर्वच मल्ल परिवारांना अतिशय दुःख झाले. लोक आपले केस पसरवून, छाती बडवून, मोठा विलाप करू लागले. आपल्या मुलाबाळांसहित ते भगवंतांच्या अंतिम दर्शनाकरिता निघाले.

त्या मल्लांनी भगवंतांच्या देहाचा अग्निसंस्कार एखाद्या चक्रवर्ती राजाच्या अग्निसंस्काराप्रमाणे करावयाची व्यवस्था केली. त्यांच्या शरीरास एका नवीन कपड्यामध्ये लपेटून त्यानंतर रुई-ऊण याने लपेटून तो क्रम पाचशे वेळपर्यंत सुरू ठेवला असे म्हणतात. नंतर एका मोठ्या लोखंडाच्या तेलाने भरलेल्या कढईमध्ये ठेवून त्यावर तेवढेच मोठे झांकण ठेवले आणि सुगंधी द्रव्ये व फूलमाला इत्यादींची व्यवस्था करून गाजेवाजंत्री लावून नृत्य, गीत इ.द्वारे सहा दिवस भगवंतांविषयी आदर, सत्कार आणि गौरव दाखविण्यात निघून गेले. सातव्या दिवशी त्यांनी अंत्येष्टी केली. त्यासाठी तथागतांच्या शरीरास ते मुकुटबंधन मल्लांच्या चैत्यस्थानी घेऊन गेले व अग्निस्पर्श केला.

भगवंतांच्या पवित्र अस्थी कोणाकोणाला मिळाल्या?

भगवंतांच्या देहाचा अग्निसंस्कार होऊन त्याची ‘फुले’ झाल्यावर मल्लांनी सर्व राख आणि अस्थी गोळा केल्या व त्यावर मोठा कडक पहारा बसविला. सात दिवसपर्यंत मल्लांनी नृत्य, गीत, वाद्य, माला आणि सुगंधित द्रव्ये यांनी भगवंतांच्या अस्र्थीचा मोठा गौरव आणि आदर-सत्कार केला व पूजा केली. अजातशत्रू राजाने आपले दूत पाठवून अस्थींपैकी एक हिस्सा मागितला. त्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवींनी, कपिलवस्तूच्या शाक्यांनी, अल्लकप्पाच्या वल्ली लोकांनी, रामग्रामाच्या कोलीयांनी आणि पावाच्या मल्लांनी देखील हिस्सा मागितला. परंतु कुशिनगराच्या मल्लानी साफ इन्कार केला. तेव्हा द्रोण नावाच्या एका ब्राह्मणाने मध्यस्थी केली व आठ हिस्से करून जनपदांमध्ये वाटावयाची सूचना केली आणि त्यानेच सारखे आठ हिस्से केले. शेवटी ज्या भांड्यात मूळ अस्थी ठेवलेल्या होत्या ते रिकामे भांडे द्रोणाने मागितले व त्यावर नंतर स्तूप उभारला. अशा प्रकारे मगधचा राजा अजातशत्रु, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अल्लकप्पांचे वल्ली, रामग्रामचे कोलीय, वेठ-दीपचे ब्राह्मण, पावाचे मल्ल ह्यांना भगवंतांच्या अस्थी मिळाल्या. तसेच कुशिनगरामधील मल्ल ह्यांनाही अस्थी मिळाल्या. सर्वांनी आपल्या श्रद्धेनुसार त्यांच्यावर स्तूप बनविले.

संदर्भ : बौद्धधम्म जिज्ञासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *