दक्षिण कोरियाचा Lotus Lantern Festival म्हणजेच “कमलपुष्प कंदील सण” याला त्यांच्या भाषेत “योओन ड्युगं हो” असे म्हणतात. हा प्राचीन उत्सव मोठा लोकप्रिय असून हजारो वर्षापासून तो साजरा केला जातो. दक्षिण कोरियातील शिला राजवटीपासून ( इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ ) बुद्धांचा जन्मोत्सव रंगीबेरंगी कंदील लावून साजरा करण्याची पध्दत सुरू झाली.
मे महिन्यातील बुद्धपौर्णिमेच्या अगोदर सेऊलच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी आकर्षक कागदी कंदीलांची आरास जनता करू लागली. हळूहळू ही प्रथा सगळीकडे पसरली. गेल्या काही वर्षात बुद्धांच्या कागदी प्रतिमांचे कंदील बनवून त्यांची परेड होऊ लागली व सर्व कोरियात ती अतिशय लोकप्रिय झाली. आणि मग बुद्धांचा हा पारंपरिक जन्मोत्सव पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येऊ लागले.

मात्र या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे हा उत्सव रद्द करण्यात आला. एरवी साडेतीन लाखाच्यावर पर्यटक हा उत्सव दरवर्षी बघण्यास येतात. या उत्सवात एक लाखापेक्षा जास्त कंदील असतात. वास्तविक द.कोरियात ५६% लोक निधर्मी आहेत. २८% ख्रिश्चन आहेत व बौद्ध फक्त १६% आहेत. तरीही सर्व धर्मीय या बुद्ध जन्मोत्सवाच्या सोहळ्यात आनंदाने भाग घेतात. आपल्या भारतात देखील बुद्धपोर्णिमा सर्व थरावर साजरी होऊन समाजाच्या एकोप्याचे दर्शन जगाला घडेल काय ?

कोरियाच्या या पारंपरिक ‘लोटस लँटर्न फेस्टिवलची’ दखल UNESCO ने सुद्धा घेतली असून लवकरच जागतिक सणांच्या यादीत त्याला स्थान मिळेल असे संकेत आहेत. यासाठी १४ ते १९ डिसेंबर २०२० रोजी युनेस्कोच्या पॅरिस येथील मुख्यालयात बैठक होणार आहे. तरी कोरोना नष्ट झाला तर पुढील वर्षी २६ मे २०२१ रोजी येणाऱ्या बुद्धपोर्णिमे अगोदर हा महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होईल असे वाटते.
संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)