इतिहास

कमलपुष्प – बौद्ध संस्कृतीचे एक अविभाज्य चिन्ह

कमलपुष्प हे बौद्ध संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचे अविभाज्य चिन्ह आहे. जिथे जिथे बौद्ध लेण्या खोदल्या गेल्या, स्तूप उभारले गेले आणि विहार बांधले गेले त्या त्या ठिकाणी बुद्धप्रतिमे सोबत कमलपुष्प कोरले गेले आहे. उत्खननात सापडलेल्या बुद्धमूर्ती, बौद्धकालीन पुरातन अवशेष (धातूच्या मूर्ती, पात्रे, रांजण, पाटे, विटा, खापराची भांडी व शिल्पे) यांवर कमलपुष्प चिन्ह कोरलेले आढळते. कमलपुष्पाला बौद्ध संस्कृतीत एवढे महत्त्व दिले कारण कमलपुष्पाच्या जागी आत्यंतिक शुद्धता आहे, पवित्रता आहे.

चिखलात, दलदलीत व पाण्यात उमलूनसुद्धा ते त्यापासून अलिप्त आहे. स्वच्छ आहे. सुंदर आहे. कोमल आहे. त्याच प्रमाणे या संसाररूपी जंजाळात व विकारयुक्त जगात जन्म घेऊन सुद्धा सर्वांपासून अलिप्त, शुद्ध व निर्वाण प्राप्त केलेले बुद्ध आहेत. म्हणून कमलपुष्पाचे चिन्ह बौद्ध संस्कृतीत आत्यंतिक महत्त्वाचे मानले गेले आहे. जगातील इतर काही संप्रदायात कमळ दाखविले गेले असले तरी बौद्ध संस्कृतीतील पवित्र कमलपुष्प याला जास्त महत्त्व आहे व हे अनेक पुरातन बौद्ध अवशेषांवरून दिसून येते.

कमलपुष्पावरील बुद्धशिल्प

कमलपुष्पाचे हे बौद्ध संस्कृतीतील चिन्ह एका महान व्यक्तिमत्वाची शुद्धता दर्शविते. त्या पुष्पाच्या केलेल्या विविध नक्षीकामावरून त्यांची पवित्रता व धम्मोपदेश देखील त्यातून व्यक्त होते. The lotus flower rises from ‘impure muddy waters’, it characterizes purity and perfection and provides the Buddhist an ideal, who aims to live a life of honesty and purity. कमळ हे सूर्योदयाच्या वेळी खुलून येते आणि सुर्यास्तास मिटते.

कमलपुष्प नक्षीकाम आणि लेण्यांमधील कमलपुष्प

भारतीय साहित्य संस्कृतीत कमलपुष्प याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. स्त्रियांच्या डोळ्यांना ‘कमलनयन’ अशी उपमा दिलेली आढळते. भारतात त्याला पुष्कर, पुंडरिक, पद्म आणि कमळ अशी नावे आहेत. सिद्धार्थ यांची माता महामाया देवी ( म्हणजेच लक्ष्मीदेवी- पहा सांचीचा स्तूप) यांच्या हातात सुद्धा कमलपुष्प आहे. काही ठिकाणी ती कमलपुष्पावर उभी आहे व कमलपुष्प धरलेले गजराज दोन्ही बाजूस उभे आहेत असे दर्शविले आढळते. बुद्धांचे कमल आसन, कमल सिंहासन व पदकमल अशी घडविलेली सर्व शिल्पे बौद्ध संस्कृतीच्या कमलपुष्पाची गाथा गातात.

त्रिरत्नाखालील कमलपुष्प आणि दोन हजार वर्षांपूर्वीचे धातूचे कमळ बुद्धशिल्प

२३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर प्रथम हे कमळपुष्प अंकित केल्याचे आढळते. तेव्हापासून सर्व पुरातन स्तंभावर, पाषाणावर, लेण्यांच्या छतावर आणि दगडी रेलींगवर ( बोधगयेची पुरातन कुंपण भिंत) कमलपुष्पे कोरली जाऊ लागली. सांची, भारहूत, अमरावती, बोधगया येथील स्तुपांवर आणि पश्चिम भारतातील लेण्यांमध्ये कमलपुष्प कोरलेले आढळते.

सन्नाती स्तुपातील रिक्त सिंहासनावरील कोरलेले कमल नक्षिकाम आणि बोधगयेचे पुरातन कुंपण (आता कलकत्ता म्युझिअम)

धम्मचक्र देखील कमलपुष्प रचनेत अनेक ठिकाणी कोरले गेलेले आहे. त्यातील कमळाच्या आठ पाकळ्या अष्टांगिक मार्गाचा संदेश देतात. पुढे बुद्धांचे पद शिल्पही कमलपुष्प रचनेत कोरले गेले व त्याला बुद्ध पदकमल म्हटले केले. गांधार कलेमध्ये अनेक ठिकाणी कमलपुष्प नक्षीकाम पाहण्यात येते. सिद्धार्थ गौतम यांच्या जन्मानंतर जेव्हा ते सात पावले चालले तेव्हा त्यांच्या प्रत्येक पावलाखाली कमलपुष्पे प्रकटली अशी एक आख्यायिका आहे.

हिलरी क्लिंटन यांनी कमलपुष्प अर्पित करून केली बुद्धवंदना

पुढे कमलपुष्प आकारण्याची कल्पना रोमन आणि ग्रीक कलेमध्ये सुद्धा गेली. बुद्धांना जेव्हा अपोलो देवतेमध्ये अंकित केले तेव्हा कमलपुष्पांचे नक्षीकाम सुद्धा रेखाटले गेले. The lotus in all its stylistic forms is one of the most sacred and frequently used symbols in Gandhara Art. It is a unique symbol of purity and perfection used to denote the charismatic existence of Buddha and Bodhisattva in a variety of styles. तसेच भगवान बुद्ध यांची ध्यानमुद्रा पद्मासनात कोरली जाऊ लागली.

महायान पंथीय बौद्ध संस्कृतीत अवलोकितेश्वर बोधिसत्व हे देखील कमलपुष्पाबरोबर असल्याचे दिसते. त्यानां पद्मपाणी असे देखील म्हणतात. त्यांच्या डाव्या हातात कमलपुष्प आहे. मैत्रेय बुद्ध देखील कमलपुष्पासोबत कोरले असल्याचे दिसून येते. त्रिरत्न चिन्हामधील तीन धम्मचक्राच्या खाली कमलपुष्प कोरले आहे. अनेक गांधार शिल्पात पुरुष आणि स्त्रिया हातात कमलपुष्प घेऊन बुद्ध वंदनेसाठी आल्याचे चित्रित केलेले दिसते. सिलोन, म्यानमार, व्हिएतनाम,थायलँड, लाओस अशा बौद्ध देशातील विहारांमध्ये जाताना कमलपुष्प घेऊन जाण्याची प्रथा आहे. अनेक स्तूपात सापडलेल्या रक्षापात्रावर देखील कमलपुष्प नक्षीकाम केलेले आढळते.

असे हे कमलपुष्प चिन्ह बौद्ध संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. त्यातून बुद्ध व्यक्तिरेखेची शुद्धता व पवित्रता प्रगट होते.अयोध्या येथे पूर्वी व आता सापडलेल्या पुरातन अवशेषांवर देखील कमलपुष्प अंकित केल्याचे स्पष्ट दिसते. व ते हेच दर्शवीत आहेत की ही नगरी पुरातन बौद्ध संस्कृतीची साकेत नगरी आहे. त्याचा स्पष्ट उल्लेख बौद्ध साहित्यात आहे. चिनी भिक्खुंच्या प्रवास वर्णनात आहे. जे जाणकार आहेत, सुसंस्कृत आहेत त्यांना याची जाण आहे. पण डोळ्यावर पट्टी बांधून जे धर्ममार्तंड बसलेले आहेत ते जोपर्यंत सहिष्णुतावादी होऊन डोळ्यावरची पट्टी काढीत नाहीत तोपर्यंत कमलपुष्प त्यांना दिसणार नाही.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *