सर्व जगाला कोरोना व्हायरसचा विळखा पडलेला आहे. जगातील १६ मिलियन ( १ मिलियन= १० लाख ) लोकांना त्याची लागण झालेली आहे. ६.५० लाख मृत्युमुखी पडलेले आहेत. असे असताना मेकॉगं डेल्टा भागातील देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव बिलकुल जाणवला नाही याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.आग्नेय आशियातील मेकाँग नदी ही अशिया खंडातील सात नंबरची सर्वात लांब नदी आहे. आशियातील पाच देशांतून ती वाहते. ते बौद्ध देश म्हणजे म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाम आहेत. म्हणून त्यांना मेकाँग डेल्टा कंट्रीज असे म्हटले जाते.
या पाच देशांची एकूण लोकसंख्या २४३ मिलियन एवढी आहे. तेथे करोना व्हायरसने आतापर्यंत फक्त ७० मृत्यू झालेले आहेत. एकूण चार हजार लोकांना लागण होऊन आता फक्त पाचशे एक्टिव केसेस शिल्लक राहिल्या आहेत. या उलट भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशियात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत असून भारतातच १५ लाखाच्यावर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. व्हिएतनाममध्ये एकूण लोकसंख्या ९७ मिलियन आहे. तिथे फक्त ४१५ लोकांना कोरोनाची लागण झाली. कंबोडिया मध्ये एकूण लोकसंख्या १६ मिलियन आहे. तीथे फक्त २०२ लोकांना कोरोनाची लागण झाली आणि लाओस देशाची लोकसंख्या ७ मिलियन आहे. तेथे फक्त २० लोकांना कोरोनाची लागण झाली. वरील तिन्ही देशांमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
थायलंडमध्ये एकूण लोकसंख्या ६९ मिलियन आहे व तिथे ३२८२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५८ मृत्यू झालेले आहेत. म्यानमारमध्ये ५४ मिलियन लोकसंख्या असून तेथे फक्त ३४६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे व ६ मृत्युमुखी पडलेले आहेत. इतर देशांच्या तुलनेत या देशांत कोरोनाचे प्रमाण खूपच नगण्य आहे. हे सर्व देश आता वेगाने पूर्वपदावर येत असून थायलंडने तर परदेशी पर्यटकांना देश खुला केलेला आहे. शाळा उघडल्या आहेत. कंबोडियाने ५ देशांतील पर्यटकांना येण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये अमेरिका, स्पेन, फ्रान्स, इटली, आणि जर्मनी आहे. लाओसमध्ये शाळा, व्यापारी केंद्रे, रेस्टॉरंट, सलून आणि सार्वजनिक वाहतूक सुरूही झालेली आहे. एक जुलैपासून व्हिएतनामने सुद्धा ८० देशानां e-visa देणे चालू केले आहे.
अशा या बौद्ध देशांत कोरोनाचा प्रभाव बिलकुल दिसून येत नाही. त्यामुळे अनेक संशोधकांनी खालील प्रमाणे वेगवेगळ्या थिअरी मांडण्यास सुरुवात केलेली आहे.
१) बौध्द धर्माच्या संस्कृतीचा पगडा असल्याने covid-19 येण्यापूर्वीच तेथे मास्क वापरण्याची पद्धत रूढ होती.
२) न्यूयॉर्क टाइम्सने असे म्हटले आहे की थाई व इतर बौद्ध देशातील लोक एकमेकांना भेटल्यावर शारीरिक स्पर्श करीत नाहीत. लांबूनच कमरेत वाकून नमस्कार करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झालेला नाही.
३) थायलंड, व्हिएतनाम व इतर बौद्ध देशांत लोकांची शारीरिक व मानसिक शक्ती चांगली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमांचे चांगले पालन करतात.
४) या देशातील लोक काटक असून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे. त्याच प्रमाणे स्वच्छता आणि शिस्त सुद्धा काटेकोरपणे पाळली जाते.
५) ध्यान धारणेने मानसिक आरोग्य उत्तम रहात असल्याने शारीरिक स्कंध सुद्धा निरोगी राहतात.
वरील सर्व प्रश्नांची उकल संशोधक करीत आहेत. त्यांची उत्तरे मिळतील तेव्हा मिळतील. पण सध्या तरी बौद्ध संस्कृती असलेल्या या देशांत कोरोनाचे प्रमाण एकदम नगण्य असून ते देश पूर्वपदावर केव्हांच आलेले आहेत. आपण भारतीय त्यांच्या शिस्तबद्ध बौद्ध संस्कृतीपासून काही शिकणार काय?
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)