सिनसिनाती आर्ट म्युझियम (सनसनाटी म्हणा हवेतर) अमेरिकेत असून ते १८८१ साली स्थापन झाले. नुकताच तिथल्या आशिया खंडातील पुरातन सामानामध्ये अडगळीत पडलेला सोळाव्या शतकातील ब्राँझ फ्रेम असलेला एक आरसा मिळाला. संग्रहालयाचे प्रमुख डॉ. सुंग मॅडम यांनी जेव्हा हा आरसा साफ केला आणि त्याची तपासणी करताना त्यावर मोबाईलच्या टॉर्चचा फोकस मारला तेव्हा त्यांना अदभुत दृश्य दिसले. प्रकाश किरण आरशावर पडून ते परावर्तित होऊन भिंतीवर पडले होते आणि त्यात बुद्ध प्रतिमा दिसत होती. ते पाहून डॉ. सूंग मॅडम आश्चर्यचकित झाल्या.

सर्वसामान्यपणे दिसणारा व २१ से.मी. व्यास असलेल्या या आरशाच्या मागे अमिताभ बुद्धाबद्दल स्तुतीपर लिहिले आहे. प्रत्यक्षात आरशाच्या पृष्ठभागावर बुद्ध प्रतिमा बिलकुल नाही तरीही परावर्तित किरणांमध्ये बुद्ध प्रतिमा दिसते हे खरोखर अदभुत आहे. डॉ. सूंग मॅडम यांनी सांगितले की हा आरसा चीन किंवा जपान देशात तयार झाला असावा. कारण जपान व चीनमध्ये देखील असाच एक आरसा असल्याचे समजते.

परंतु आज पर्यंत तरी प्रदर्शनात ते कधीच ठेवले गेलेले नाहीत. कारण असे आरसे बनविणे खूपच कठीण आहे आणि या वस्तू खूपच दुर्मिळ देखील आहेत, असे त्या पुढे म्हणाल्या. ज्या कारागिराने मेहनत करून हा आरसा तयार केला असेल त्याची कला खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.

अशा या जादुई आरशामुळे सिनसिनाती आर्ट म्युझियमची शान वाढली असून २३ जुलैपासून तो संग्रहालयाच्या गॅलरीमध्ये दर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. परावर्तित प्रकाश किरणांमध्ये बुद्ध प्रतिमा दाखविणारा अदभुत आरसा ज्या कोणी कारागिराने तयार केला त्याला सलाम.
-संजय सावंत,नवी मुंबई (ज्येष्ठ बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)