बातम्या

दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज बोधगयेत ‘कठीण चीवरदान पर्व’

स्वतः कापड विणून, रंगरंगोटी करून एकाच दिवशी चीवर दान केले जाते त्याला बौद्ध धम्मात ‘कठीण चीवरदान’ म्हटले जाते. दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बोधगयेत महाबोधी वृक्षाखाली आज ३१ ऑक्टोबरला कठीण चीवरदान आणि विश्वशांतीकरिता विशेष प्रार्थनासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

इमानि मयं भन्ते कठीण चिवरानी सह परिवारानि
भिक्खु संघस्स ओनोझयाम
साधुनो भन्ते भिक्खुसंघो इमानि कठीण चिवरानी
पटीगण्हातू अम्हाकं दीघरतं हिताय सुखाय॥

अर्थात – आमचे कठीण चीवरदान सानुग्रहपूर्वक अष्टपरिस्कार भिक्खुसंघाने स्वीकार करून उपकृत करावे. आमच्या दीर्घायुष्याकरिता तसेच सुख हिताकरिता सार्थ सिद्ध होवो.

हे वर्षावास ऋतूपर्व आहे. बौद्धधम्मात भिक्खूंसाठी वर्षावास काळाचे विशेष महत्त्व आहे. विश्वशांतीदूत तथागत बुद्धानेसुद्धा तीन महिन्याच्या वर्षावास केला होता. वर्षाऋतूत एका सुंदर विहारात वास्तव्य करून ध्यानसाधना, पूजाअर्चा, अनुष्ठानात स्वतःला वाहून घ्यावे असा मोलाचा धम्मोपदेश तथागतांनी भिक्खू संघाला दिला होता. त्याच बुद्धकालीन संस्कृतीला आजही भिक्खुसंघात आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे.

बौद्ध भिक्खुना उपासक-उपासिकाद्वारे दैनंदिन उपयोगाच्या वस्तूसोबत चीवरदान करण्यालासुद्धा आत्यंतिक महत्त्व आहे. याच कारणामुळे ‘आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत जेथे जेथे तथागतांचा पदस्पर्श झाला त्या पुण्यभूमीत आणि लहान मोठ्या बिहारात देश-विदेशात ‘कठीण चीवरदान समारोह आयोजित केले जातात. बोधगयेच्या महाबोधी महाविहारात आणि इतर आंतरराष्ट्रीय बौद्ध विहारात होणारा ‘कठीण चीवरदान’ कार्यक्रम विशेष आकर्षक असतो. या कार्यक्रमात प्रत्येक उपासक – उपासिका आपल्या श्रद्धा सामर्थ्यानुसार भिक्खना दान देतात.

कठीण चीवरदानाचे महत्त्व सांगताना श्रद्धेय पूज्य भिक्खू ज्ञानज्योती म्हणतात, वर्षाऋतू संपल्यानंतर कठीण चौवरदान करण्याची बौद्धधम्मात पद्धत आहे. एकाप्रसंगी तथागत बुद्ध स्मशानभूमीत कपडे उचलून आपल्या शरीराला झाकण्याचा प्रयत्न करीत होते. ही गंधवार्ता महाप्रजापती गोतमीचा कानी पडली. तेव्हा तिने आपल्या हाताने कठोर परिश्रम करून तथागतांसाठी चीवर तयार केले. तथागताला चीवर दान करण्याची तिची तीव्र इच्छा होती. मात्र तिची ही इच्छा पूर्णत्वास जाऊ शकली नाही! तथागताने चीवर स्वतः न स्वीकारता भिक्खू संघाला देण्याची महाप्रजापतीला प्रेमपूर्वक आज्ञा दिली होती. अशा प्रकारे भिक्खू संघाला चीवर दान करून तथागतांनी संघाची मर्यादा अबाधित राखली.

भिक्खुसंघाला दिलेले दान सामूहिक दान परंपरेनुसार आपसात विभाजित केले जाऊ शकते. यामुळे बौद्ध धम्मात दानाची प्राचीन परंपरा आजही जशीच्या तशी कायम आहे. ‘बुद्ध एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष पूज्य भिक्खू विश्वबंधू म्हणतात, थायलंड भारताचे शेजारी बौद्ध राष्ट्र आहे तेथे काही काळाकरिता दहा/वीस दिवस किंवा महिन्याकरिता सर्वांना श्रामणेर भिक्खू बनावे लागते.

१९७० ची घटना आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. मी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत श्रामणेर बनण्याचे वचन दिले होते. चीवर धारण करण्यासाठी चीवर मिळत नव्हते. तेव्हा आम्ही दिल्लीत थायलंडचे पूज्य भदन्त धम्मवीरियो यांना कळकळीची विनंती केली. त्यांनी आम्हाला मंदिर मार्ग बुद्ध विहारात चीवर दान केले. (जुगुलकिशोर बिर्ला निर्मित दिल्लीतील पहिले बुद्ध विहार) चीवर ग्रहण केल्यानंतर आम्ही धम्म देशनेकरिता राजस्थानचा प्रवासाला निघालो. तेव्हा मला नाना प्रकारचे कटू अनुभव आले.

“भन्ते तुम्ही भीक का मागता?’, ‘भिक्षापात्र हाती का घेता?’, ‘आम्ही तुम्हाला पैसे देतो त्या मोबदल्यात तुम्ही चीवराचा त्याग करा!” यावर मी म्हणालो, “मी भिकारी नाही, मी बौद्ध भिक्खू आहे, बौद्ध भिक्खू भिक्षा घेतो! त्या बदल्यात तो दीक्षा देतो! भिकारी फक्त भीक घेतो दीक्षा देत नाही. यासाठी कृतज्ञभावाने श्रद्धाशीलभावाने बौद्ध भिक्खुला दान केले पाहिजे. जे बौद्ध उपासक, उपासिका आईवडिलांची कृतज्ञभावाने सेवा करतात आणि मन-वचनाने दान पारमिता अनुसरतात त्यांचे मनविहार कधीही अशांत होत नाही. कठीण चीवर दानाचे पालन करणे कठीण आहे. जे चीवर स्वतः सूत काढून कापड विणून रंगरंगोटी करून एकाच दिवशी दान केले जाते तेच ‘कठीण चीवरदान संबोधले जाते.

भिक्खुला दिलेले दान महाफलदायी असते. स्वतःला धम्मकार्याला वाहून घेणेसुद्धा पुण्यदायक असते. गृहत्याग करणाऱ्या काषायपित भिक्खूचे जीवन संपूर्णपणे लोकमंगल, लोककल्याणाला समर्पित असते. त्यामुळे भिक्खूंचा अधिकाधिक आदर केला पाहिजे. भोजनाकरिता आमंत्रित केले पाहिजे. कारण श्रद्धेय भिक्खु गृहस्थाला धम्मदानाचा सुबोध पाठ देत असतो.

शोभन्तेव न राजानो मुत्तामणिविभूसिता।
यथा सोभन्ति यातेना सोलभूसनभूसिता।।

अर्थात – मोत्यांच्या माळा किंवा तो माणिक रत्नजडीत हार घालून राजा जेवढा शोभून दिसत नाही तेवढा शीलभूषणधारी भिक्खु जगामध्ये सर्वत्र शोभून दिसतो.

जागतिक वारसा म्हणून नावारूपास आलेल्या बिहारच्या महाबोधी महाविहाराच्या प्रांगणात दोन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर बौद्ध भिक्खूंसाठी ‘कठीण चीवरदान’ आणि विश्वशांती, कोरोना मुक्तीसाठी विशेष प्रार्थनासभेचे आज ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ८ ते १० वा. पर्यंत आयोजन करण्यात आले आहे, असे महाबोधी महाविहाराचे प्रमुख धम्मदूत पूज्य चलिंदा यांनी कळविले आहे. बीएमटीचे सचिव आदरणीय दोरजे यांच्यासोबत विविध देशातील बौद्ध विहाराचे हजारो भिक्खू या कार्यक्रमासाठी सहभागी होणार आहेत.

-मिलिंद मानकर, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *