ब्लॉग

महापरित्राण पाठ ; कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मन संतुलित राखणे आवश्यक

अलीकडचे वैद्यकीय शास्त्र मानते की बरेचसे ९० टक्के आजार हे मानसिक अवस्थेमुळे होतात. मनाची अवस्था जर सुदृढ असेल तर शारीरिक आजार होत नाहीत. मन खंबीर असेल तर शरीरात रोगराईला प्रतिबंध असणारी यंत्रणा कार्यरत होते. मात्र १० टक्के आजार हे बाहेरील वातावरणामुळे शरीरावर होतात.

मन ज्याप्रमाणे शरीराला आजारी पाडते त्याचप्रमाणे ते शरीराला ठीक देखील करते. एखादा चिंताग्रस्त आणि दुःखी रुग्णांपेक्षा आशावादी रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. तसेच श्रध्येद्वारे शारीरिक रोग बरे झाल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. यासंदर्भात अनेक बौद्ध देशात बुद्ध सुत्ताचें पठण व श्रवण करुन आजार व आपत्ती यांना दूर ठेवतात. तसेच त्याचा प्रभाव कमी करतात.

दुष्ट प्रवृत्ती पासून संरक्षण आणि मुक्ती मिळवणे, आरोग्य-समृद्धी- कल्याण-कुशल सुस्थिती यांची जोपासना करणे, रोगराई दूर पळविणे यासाठी रक्षण पाठाचे श्रवण करणे आवश्यक आहे असे म्हटले गेलेले आहे. अशा प्रकारची निवडक सूत्रे ज्यांचे पठण व श्रवण केले जाते त्या सूत्राच्या संग्रहाला परित्तसू्त्ते म्हणजेच रक्षणसुत्ते असे म्हणतात. ही कुठली जादूची पद्धत नाही किंवा अमर राहण्याचा मंत्र सुद्धा नाही. त्याच्यात रहस्यमय सुद्धा असे काहीच नाही. हे सदभावनांचे सामर्थ्य असलेले मंगलमय पालि शब्द आहेत. परित्तसुत्ताचे धम्मावर श्रद्धा बाळगून श्रवण केल्याने मानसिक सुस्थिती सुधारते. यामुळे जे रोगग्रस्त आहेत त्यांचे आरोग्य सुधारते. तसेच दुःख नष्ट करणारी मानसिक प्रवृत्ती तयार होते.

अशा या महापरित्राण सुत्तातील गाथा या खुद्दकनिकाय, अंगुत्तरनिकाय, संयुत्तनिकाय, मज्जीमनिकाय, दीघनिकाय व सुत्तनिपात मधून घेतल्या गेलेल्या आहेत. खणखणीत व स्पष्ट आवाजात त्या म्हटल्याने त्यातील कंपने मानसिक शांती आणि स्थिरता प्राप्त करून देतात. त्याने आरोग्यकारक प्रकृती व आध्यात्मिक प्रगती साधता येते.

‘परित्तग्रंथ’ हा सिरिलंकेतील व इतर बौद्ध देशातील सुप्रसिद्ध पालि ग्रंथ आहे. या पुस्तकाची प्रत तेथील प्रत्येक कुटुंबात आदरपूर्वक व मोठ्या काळजीने पवित्रस्थानी ठेवलेली असते. कुटुंबातील सभासद या पुस्तकातील मंगलसुत्त, रतनसुत्त, मेत्तसुत्त सारखी सूत्रे मुखोद्गत करून वारंवार त्याचे पठण व चिंतनमनन करतात.

अशा या ‘संपुर्ण परित्राण पाठ’ पुस्तकाचे संपादन डॉ. भदन्त एन. आनंद, महाथेरो, महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी, उल्हासनगर यांनी केले आहे. मराठी बौद्ध जगताने त्यास भरपूर प्रतिसाद दिला पाहिजे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर मन संतुलित राखणे आवश्यक असून अशा पुस्तकांची नितांत गरज आहे. प्रत्येक बौद्ध कुटुंबात ‘बौद्ध वंदना सुत्तसंग्रह’ असेलच. त्यातील रतनसुत्त याचे सध्यातरी सर्वांनी चिंतनमनन करावे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)