इतिहास

महामहोपाध्याय डॉ. सतीश चंद्र विद्याभूषण; पालि भाषेमध्ये MA करणारे भारतातील पाहिले विद्यार्थी

सतीश चंद्र विद्याभूषण यांचा जन्म फरीदपूर, राजबारी (सध्याचे बांगलादेश) मध्ये ३० जुलै १८७० रोजी झाला. संस्कृती विषय घेऊन ते पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी संस्कृती मध्ये MA केले आणि तेथील कॉलेज मध्ये प्राध्यापक झाले. त्यांना बौद्ध साहित्याची आवड होती आणि त्यांनी पालि आणि तिबेटी विषयांचा अभ्यास अतिशय प्रयत्नपूर्वक केला.

संस्कृत भाषेमध्ये त्यांची ख्याती होतीच. श्रीलंका आणि बर्माच्या भिक्खुंकडून ते पालि भाषा शिकले आणि “बुद्धिस्ट टेक्स्ट सोसायटी” मध्ये संशोधात्मक लिखाण देखील केले. त्यांना पालि भाषे मध्ये देखील MA करायचे होते. मात्र तशी सोय भारतात कुठेच नव्हती. त्यांनी कलकत्ता विद्यापीठाला तसे लिहून कळविले. कलकत्ता विद्यापीठाने त्यांना पालि भाषेत MA करण्याची परवानगी दिली मात्र तुम्ही तुमचा अभ्यास करा, आमच्याकडे ती भाषा शिकवायला कोणी नाही हे कळविले.

पालि भाषेमधील MA ची प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आणि तपासण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाने प्रख्यात पालि भाषेचे अभ्यासक, रीज डेव्हिडस यांना विनंती केली. डेव्हिडस यांनी उत्तर दिले की तुमच्या कलकत्त्यात एक पालि भाषेचा स्कॉलर आहेत – सतीश चंद्र विद्याभूषण. त्यांना विचारून बघा. तेव्हा कलकत्ता विद्यापीठाने कळविले की सतीश चंद्रच विद्यार्थी आहेत तेव्हा रीज डेव्हिडस यांनी आनंदाने हे काम करण्यास तयार झाले.

१९०१ मध्ये सतीश चंद्र विद्याभूषण हे पालि भाषेत MA करणारे पाहिले भारतीय ठरले. पुढे त्यांनी कलकत्ता विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा आणि कॉलेज मध्ये पालि भाषेचा अभ्यासक्रम सुरू केला. यासाठी त्यांना तत्कालीन कुलगुरू यांनी खूप मदत केली. सरत चंद्र दास यांच्या बरोबर त्यांनी तिबेटी – इंग्रजी शब्दकोशावर काम केले.

१९१० मध्ये श्रीलंकेला ते बौद्ध साहित्यावर अभ्यास करण्यासाठी गेले. त्या नंतर १९१७ रोजी त्यांची कलकत्ता विद्यापीठाच्या पालि भाषा विभागप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. “बांगिया साहित्य परिषद” च्या मासिकाचे त्यांनी २२ वर्ष संपादक म्हणून काम पाहिले. पाली आणि तिबेटी भाषेतील बौद्ध साहित्यावर त्यांनी विस्तृत लेखन केले. मात्र त्यांची ओळख राहिली ती त्यांच्या पालि भाषेच्या प्रेमासाठी आणि तिच्या प्रसारासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम.

२५ एप्रिल १९२० साली, वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी महामहोपाध्याय सतीश चंद्र विद्याभूषण यांचे निधन झाले.

भारतातील सर्वात पहिले पालि भाषेत MA करणाऱ्या आणि तिचा प्रसार करणाऱ्या सतीश चंद्र विद्याभूषण यांना 100व्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली.

-अतुल भोसेकर, नाशिक (ज्येष्ट बौद्ध लेणी संशोधक आणि इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *