जगभरातील बुद्ध धम्म

म्यानमारमधील महामुनी विहार; प्रत्यक्ष बुद्धांच्या चेहऱ्याशी साम्य असलेली मूर्ती

म्यानमारमध्यें मंडाले शहरात ‘महामुनी’ नावाचे मोठे प्रतिष्ठित आणि लोकप्रिय बुद्धविहार आहे. यामधील भूमिस्पर्श मुद्रा असलेली बुद्धमूर्ती दोन हजार वर्षांपूर्वीच्या अरक्कन राजवटीतील आहे. ही मूर्ती १.८० मी. उंच असून तिचे वजन ३.८० टन आहे. येथे सोन्याचा वर्ख असलेला कागद घेऊन फक्त पुरुष उपासक मूर्तिजवळ जाऊन मूर्तीला चिटकवून खाली येऊ शकतो. स्त्रियां खाली बसून दर्शन घेतात व प्रार्थना म्हणतात. ही बुद्धमूर्ती दागदागिने, रुबी आणि सफायर यांनी मढविलेली आहे.

येथील बौद्ध शास्त्रानुसार या विश्वात फक्त पाचच बुद्धमूर्त्या भगवान बुद्धांच्या चेहऱ्याशी जुळतात. त्यातील महामुनी विहारातील ही एक मूर्ती आहे. दोन भारतात आहेत. आणि दोन अन्य देवलोकांत आहेत. तसेच येथील दंतकथेनुसार भगवान बुद्ध आपल्या ५०० शिष्यांसोबत नालंदा-वंग प्रदेश-त्रिपुरा मार्गे ध्यानवडी येथे आले असताना अरक्कन राजाने त्यांची मूर्ती तयार करण्यासाठी शाक्य व त्यांचा सहाय्यक विश्वकर्मा याला आदेशीत केले. तेव्हा विश्वकर्माने मोठया भक्तिभावाने भगवान बुद्धांच्या ध्यानसाधनेसाठी निवासस्थान उभारले व प्रत्यक्ष बुद्धांच्या चेहऱ्याशी साम्य असलेली मूर्ती घडवली. ( यास्तव हिंदू धर्मात स्थापत्य क्षेत्रात आता विश्वकर्मा पूजा केली जाते )

भूमिस्पर्श मुद्रा असलेली बुद्धमूर्ती

गेल्या शंभर वर्षांत बर्मी भक्तजनांनी सोन्याचा वर्ख मूर्तीला लावल्यामुळे त्याची जाडी १५ से.मी. झाली आहे. बर्मी समाजात हा मोठ्या मानाचा बौद्ध विहार असल्याने नवीन उद्योगधंदा सुरू करण्यापूर्वी, सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी येथे बौद्धजनांची सतत वर्दळ असते. अशा या लोकप्रिय महामुनी विहारास माझा प्रणाम.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)