बातम्या

दीक्षाभूमीला चैत्यभूमीशी जोडणारा महामार्ग

अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले नाहीत, तर अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. – जॉन केनेडी

ज्या देशात रस्त्याचे जाळे उत्तम त्या देशाचा विकास झपाट्याने झाल्याचे दिसून आले आहे. जर्मनी, कोरिया, जपान द्रुतगती मार्गामुळे विकसित झाले आहेत. रस्ते वाहतूक चांगली असेल तर दळणवळणाला गती येते. त्या ठिकाणी असलेल्या व्यवसायाची व्रुद्धी होते आणि परिणामी त्या देशाची किंवा राज्याची आर्थिक, सामाजिक भरभराट होते. देशाच्या सकल उत्पादन देणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख असलेली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर नागपूर ही उपराजधानी आहे. राज्यातील विकासाला गती देण्यासाठी राज्यात रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, इतर जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते व शहरांतर्गत रस्ते यांचा समावेश आहे. पण या रस्ते वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी शहरातील अंतर कमी करण्यासाठी आणखी रस्ते विकास प्रकल्प राबविण्यात आले. या प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘मुंबई – पुणे एक्सप्रेस वे’. १९९८ – २००० दरम्यान ‘मुंबई – पुणे’ या देशातील पहिल्या ‘एक्स्प्रेस वे’ चे बांधकाम करण्यात आले. राज्याच्या विकासात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांचा प्रमुख वाटा आहे. हा विकास सर्व जिल्ह्यात पोहचावा, उपराजधानी असलेल्या नागपूरच्या जवळच्या भागातील विकासाला चालना मिळावी. राज्याचा विकास गतिमान व्हावा यासाठी राज्य सरकारने मा. नगरविकास मंत्री, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. एकनाथजी शिंदे ह्यांच्या नेतृत्वात ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ची निर्मिती केली आहे. कमीत कमी वेळात जास्त अंतर पार करता यावे व प्रवास करतांना अनुभव सुलभ व्हावा या धर्तीवर एक्सप्रे वेची निर्मिती केली आहे.

‘समृद्धी महामार्गा’मुळे मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतुक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना मिळणार आहे. सध्यस्थितीत मुंबई ते नागपूर हे ८१२ किलोमीटर अंतर पारकरण्यास जवळपास 16 तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे अंतर ७०१ किमी होईल व फक्त ८ तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. तसेच औरंगाबादहुन दोन्ही ठिकाणी जाणे केवळ ४ तासांमध्ये शक्य होईल. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय मानकांनूसार उभारण्यात येत आहे हे विशेष ! मुंबई येथील जवाहरलाल नेहरु बंदर हे भारतातील सर्वात व्यस्त बंदर आहे. या बंदरापासून नागपुर स्थित मिहान यांना जोडणारा हा महामार्ग आहे. बंदरातून जलद वाहतूक करुन आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहचवणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतूकीला वेळ बचतीचा फायदा होणार आहे.

वेळेची होणार बचत
महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडण्यासाठी राज्यात प्रथमच सर्वाधिक लांबीचा पहिला ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने हा द्रुतगती मार्ग भविष्यात ओळखला जाईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागपूर-मुंबई हा प्रवास १6 ऐवजी अवघ्या ८ तासात करणे शक्य होणार आहे.

राज्याची होणार समृद्धी
समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान १० जिल्ह्यातून जाणार आहे. नागपुर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे! तसेच पाच महसुल विभाग येतात. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बिड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतूकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

वन्यजीवांना मुक्तपणे संचार करता येणार
समृद्धी महामार्ग वन्यजीव क्षेत्रातून जाणार आहे. या महामार्गामुळे त्यांच्या मुक्तसंचारावर गदा येणार नाही याची खबरदारी घेतली गेली आहे. वन्यजीवांच्या हालचालीमध्ये अडथळा येणार नाही, अशा पद्धतीचे भुयारी मार्ग प्रस्तावित महामार्गावर बांधले जाणार आहेत.

वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा
समृद्धी महामार्गावर दर ४० ते ५० किमी मार्गावर दोन्ही बाजूला २१ वेसाइड ऍमेनिटीजची उभारणी करण्यात येणार असून प्रत्येक ठिकाणी विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच महामार्गावर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आय.टी.एम.एस.) ही सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून वाहनांचा वेग, लेन कटिंग, वाहन ब्रेकडाऊन होणे इत्यादींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

साडे अकरा लाख झाडे लावणार
समृध्दीसाठी ५४६ हेक्टर वनजमीन घेतली आहे, त्या बदल्यात वन विभागाला वन विकसित करण्यासाठी तेवढीच जमिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या बांधकामात २ लक्ष ३६ हजार झाडे बाधीत होत असून महामार्गाच्या दुतर्फा ११ लाख ३१ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ही संख्या तोडलेल्या झाडांच्या तुलनेत अधिक आहे.

१8 कृषी समृद्धी नगरे
समृद्धी महामार्गाच्या शेजारी रस्ते विकास महामंडळ १८ कृषी समृद्धी नगरे उभारली जाणार आहेत. भुसंचयन (लँडपुलिंग) तत्त्वावर हे काम होणार आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाची पाहणी करताना.

दृष्टिक्षेपात समृद्धी महामार्ग
एकूण लांबी -७०१ किलोमीटर
रस्त्याची रुंदी- १२० मीटर (डोंगराळ भागासाठी ९० किलोमीटर)
मार्गिका- ३ अधिक ३ (दोन्ही बाजुस ३ मीटर रुंद पेव्हड शोल्डर आणि २ मीटर रुंद मातीच्या शोल्डरसह)
वाहन वेग प्रस्तावित – ताशी १५० किलोमिटर (डोंगराळ भागासाठी ताशी १२० किलोमिटर)
प्रस्तावित इंटरचेंजेस- २४
रस्त्यालगत उभारण्यात येणारी नवनगरे- १८
मोठे पूल (लांबी ३० मीटरपेक्षा जास्त)- ३३
लहान पूल (लांबी ३० मीटरपेक्षा कमी)- २७४
बोगदा- ६
रेल्वे ओव्हर ब्रीज- ८
व्हाया डक्ट/ फ्लाय ओव्हर – ६५
कल्व्हर्ट- ६७२
वे साईड अ‍ॅमिनिटीज – २१ (दोन्ही बाजूस मिळुन)