इतिहास

हरियाणा नव्हे, महायाना बौद्ध प्रदेश

उत्तर भारतातील हरियाणा राज्य १९६६ साली पंजाब प्रांतातून वेगळे झाल्यावर स्वतंत्र झाले. पण आज हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्याची राजधानी केंद्रशासित प्रदेश असलेले चंदिगड आहे. हेच हिरवेगार हरियाणा एकेकाळी महायान पंथ संस्कृतीचे मोठे केंद्र होते, हे बऱ्याच जणांना ज्ञात नाही.

शुंग आणि कुशाण राजवटीची बहरलेली शहरे येथे होती. त्यांच्या तांब्याच्या नाण्यांची टाकसाळ येथे होती. राजा हर्षवर्धन याची हरियाणात थानेसर येथे राजधानी होती.आणि मुख्य म्हणजे प्राचीन काळापासून परंपरेनुसार चालत आलेला पाच दिवसांचा एक उत्सव हरियाणात वैशाख पौर्णिमेला साजरा केला जातो. त्याचे नाव आज सरस्वती महोत्सव झाले असले तरी तो मूळ बुद्ध पौर्णिमेचा उत्सव आहे.

सातव्या शतकात ‘शिक्षासमुच्चय’ हा महायानी तत्वे एकत्रितपणे सांगणारा २७ कारीकांचा ग्रंथ सौराष्ट्रातील आचार्य शांतिदेव यांनी तयार केला होता. तो वलभी विद्यापीठात व हरियाणात खूप प्रसिद्ध होता. त्यामध्ये बौद्ध देवता सरस्वतीचे गुणगान आहे. त्यामुळे हरियाणात सरस्वती देवीचे प्रस्त खूप आहे. म्हणूनच महायान या बौद्ध पंथाची भरभराटीला आलेली अनेक स्थळें या राज्यात आहेत. त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

१) आदी बद्री : हे स्थळ हरियाणामध्ये यमुनानगर जिल्ह्यात असून शिवालिक या जंगली भागातील टेकड्यांच्या पायथ्याशी आहे. येथे असंख्य स्तूप आणि विहार यांचे अवशेष पसरले आहेत. इथेच सरस्वती व सोमा नदीच्या काठी पाच दिवसांचा मोठा महोत्सव वैशाख महिन्यात भरतो. त्यास ‘आदी बद्री आखा तिज मेला’ असेही म्हणतात. तसेच नोव्हेंबरमध्ये कार्तिक पौर्णिमेला इथे ‘बद्रि कपाल मोचन’ हा सात दिवसांचा महोत्सव भरतो. १४ एकर वनांच्या जागेवरील ३ टेकड्यांचे उत्खनन येथे झाले असून दोन हजार वर्षापूर्वीचे पक्क्या विटांचे स्तुप आढळले आहेत. तसेच उत्खननात मातीची असंख्य भांडी, पात्रे, टेराकोटा मणी, माळा, छोटी बुद्ध शिल्पे आढळून आली आहेत. भिक्खूंसाठी छोटी निवासस्थाने आणि त्यांची भिक्षापात्रे सुद्धा येथे आढळली आहे.

२) सुंघ : हे ठिकाण यमुनानगर जिल्ह्यात असून एकेकाळी प्राचीन शुंग राजवटीची ती राजधानी होती. सम्राट अशोककालीन बौद्ध संस्कृतीचे अवशेष इथे आढळले आहेत. सम्राट अशोकाने जेथेंजेथें भगवान बुद्ध गेले होते, जेथेजेथे त्यांचा निवास होता आणि जेथेजेथे त्यांनी धर्मोपदेश दिला त्या ठिकाणी स्तुप उभारले आहेत. भगवान बुद्ध संकिसा वरून चालत या सुंघ गावी आले होते. व येथे येऊन त्यांनी धर्मोपदेश दिला. म्हणून या पवित्र ठिकाणी पक्क्या विटांचा मोठा स्तूप सम्राट अशोकाने उभारलेला आहे. अलेक्झांडर कॅनिंगहम यांनी प्रथम येथे सर्व्हे करून उत्खनन चालू केले होते.

३) हर्ष का टिला : हे ठिकाण थानेसर जिल्ह्यात असून ८८-८९ मध्ये केलेल्या उत्खननात तिथे बौद्ध संस्कृतीचे पक्क्या विटांचे बांधकाम आढळले. हर्षवर्धनच्या राजवटीची नाणी सुद्धा येथे सापडली. त्याकाळात थेरवादी पंथाचा संमितीय संप्रदाय तेथे प्रमुख होता. व हर्षवर्धन राजाची बहीण राजेश्वरी ही त्या संप्रदायाची होती.

४) भुना टेकडी : फतेहाबाद जिल्ह्यात ही टेकडी असून तेथील उत्खननात कुशाण राजवटीतील ६८ तांब्याची नाणी व ठसे मिळाले.

५) नौरंगाबाद : हे ठिकाण भिवणी जिल्ह्यात असून कुशाण राजवटीतील टांकसाळीचे भरपूर अवशेष येथे आढळले आहेत.

६) खोक्राखोट : या ठिकाणी कुशाण काळातील वालुकामय दगडातील दोन दानपत्रे मिळाली असून एकावर ब्राम्ही लिपीत ‘हे दानपत्र कनिष्क राजाने दिले’ असा उल्लेख आहे व दुसऱ्यावर ‘दान देणे हाच सर्वश्रेष्ठ धर्म’ असे लिहिले आहे. येथे महायानी पंथाचे सखोल ज्ञान असलेल्या अनेक विद्वानांचे वास्तव्य होते. अनेक संघाराम इथे एकेकाळी होते.

७) हर्नोल : हे ठिकाण गुरगाव जिल्ह्यात असून शुंग आणि कुशन राजवटीतील बहरलेल्या महायान पंथाचे व संघाराम यांचे अनेक अवशेष येथील उत्खननात सापडले आहेत.

८) मूहम्मदनगर : येथेही प्राचीन काळातील बौद्ध संस्कृतीचे भरपूर अवशेष सापडले. ११ व्या शतकानंतर मोहम्मद घोरी याच्या आक्रमणाने येथील बौद्ध संस्कृती नष्ट झाली असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. अनेक बौद्ध भिक्खुंचे वास्तव्य येथील संघारामात होते.

९) चनेती बौद्ध स्तूप : पक्क्या विटांचा बांधलेला ३ ऱ्या शतकातील हा स्तुप सुस्थितीत असून चिनी प्रवासी भिक्खू ह्युएन त्संग यांनी सुद्धा त्यांच्या प्रवास वर्णनात याचा उल्लेख केलेला आहे. हा प्रसिद्ध स्तुप बघण्यास अनेक परदेशी भिक्खूं आणि हरियाणातील विद्यापीठातील विद्यार्थी वर्ग सतत इथे येतो. युट्युबर याचे व्हिडीओ आहेत.

भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर धम्माचे जरी अठरा संप्रदाय झाले होते तरी मूळ बौद्ध सिद्धांत एकच होते. आजची हरियाणात विकसित झालेली संस्कृती ही मूळ बौद्ध धर्मातील महायान पंथाची आहे. म्हणून बौद्धांच्या प्रसिद्ध तिथींवर तेथे सरस्वती महोत्सव साजरे केले जातात. यासाठी हरयाणा सरस्वती वारसा विकास महामंडळ देखील स्थापित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात सैनी समाज हा स्वतःला सम्राट अशोक यांचा वंशज समजतो. व ते आज बौद्ध होत आहेत. मात्र हरियाणातील सैनी समाजाला त्यांच्या पूर्वजांचा इतिहास माहीत असूनसुद्धा ते गप्प आहेत. हरियाणातील इतर समाज सुद्धा स्वतःची मूळ संस्कृती विसरला आहे. प्रार्थना करूया की बुद्धांचा धर्मोपदेश भारतातील सर्व जनजातीला माहीत होवो आणि त्यांचे कल्याण होवो.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)