ब्लॉग

स्मृतिदिन : चित्रकलेच्या माध्यमातून अजिंठा लेणी जगासमोर आणणारा रॉबर्ट गिल

अजिंठा लेणी जगासमोर आणणारे चित्रकार म्हणजेच रॉबर्ट गिल. चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत अजिंठा लेणी जगासमोर मांडणारा चित्रकार आणि त्याकाळात त्याला भेटलेली प्रेमिका पारो सैन्यात अधिकारी असलेल्या रॉबर्ट गिलच्या आयुष्यातील केवळ एक टप्पा आहे. त्यांचा आज (१० एप्रिल) १४१ वा स्मृतिदिन.

26 सप्टेंबर 1804 ला लंडनच्या बिशपगेट येथे जन्माला आलेला गिल वयाच्या 19 व्या वर्षी पी.पी.ग्रेलीमर यांच्या शिफारशीने जेम्स पॅटीस यांच्या आदेशानुसार मद्रास येथील इस्ट इंडिया कंपनीच्या ‘‘44 मद्रास नेटिव्ह या सैन्य दलात’’ भरती झाल्यानंतर भारतात आला. 1843 पर्यंत रॉबर्टने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले. तो लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाइड आर्टिस्ट होता. कोर्ट ऑफ द डायरेक्टर्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून 1 ऑक्टोबर 1844ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली. त्यात त्याला एक सहाय्यक ड्राफ्समन व तीन स्थानिक कुशल कारागीर ठेवण्याचे अधिकार दिले. 13 मे 1845 ला सतरा सुरक्षा जवानांसह तो अजिंठ्याला आला. येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात ते वास्तव्यास होते. या ठिकाणी आज ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहे. या समोरील प्रवेशद्वारावर असलेल्या इमारतीत रॉबर्ट गिल अनेक वर्षे राहिले. स्थानिक त्याला गिल टोक म्हणून ओळखतात.

अजिंठा येथील स्थानिक आदिवासी समाजातील पारो या भारतीय तरुणीशी त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. आज हीच प्रेम कथा जगभरात प्रसिद्ध पावली आहे. यावर’ अजिंठा नावाचा एक मराठी चित्रपटही येऊन गेला आहे. चित्रनिर्मितीच्या कामात पारो ही रॉबर्ट गिल यांना मदत करायची. ११ वर्षांच्या सहवासानंतर पारो हिचा २३ मे १८५६ ला अजिंठा येथे आकस्मिक मृत्यू झाला. आपल्या प्रेयसीबद्दल असलेल्या प्रेमापोटी रॉबर्ट यांनी अजिंठा येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात तिची कबर बनविली. ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत.

रॉबर्ट गिल यांनी अजिंठा, वेरूळ, खानदेशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, अजिंठा परिसरातील मंदिरे, मुघल वास्तुकला यांची छायाचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. ब्रिटिश शासनाकडून रॉबर्ट गिल यांच्यावर अजिंठ्याच्या फोटोग्राफीची जवाबदारी सोपवण्यात आली होती, अथक परिश्रमाने त्याने मार्च १८७० ला हे काम पूर्ण केले. १८७३ ला हा ठेवा त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला सुपूर्द केला होता.

रॉबर्ट गिलने 200 स्टेरीओग्राफिक प्रकाशचित्रांची 200 दृश्ये लंडनला पाठवली होती. या फोटोग्राफीच्या माध्यमातून अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लिम वास्तुकला यांची प्रकाशचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. त्याची नोंद ब्रिटिश लायब्ररीने घेतली आहे. आजही ब्रिटिश लायब्ररीच्या ऑनलाईन वेबसाइटवर ही प्रकाशचित्रे हजारोंच्या संख्येने उपलब्ध आहेत.

खानदेशच्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये उष्माघाताने रॉबर्ट गिल यांचे १० एप्रिल १८७९ ला निधन झाले . भुसावळ रेल्वेस्थानकाजवळील सेंट पॉल चर्चच्या दफनभूमीत त्यांच्या पार्थिवाचे दफन करण्यात आले .