लेणी

लेण्यांचे नकाशे तयार करा..!

लेणी बघण्याची आवड समाजात निर्माण होत असून अनेक कुटुंब व ग्रुप तेथे बघण्यास, अभ्यास करण्यास व दीप लावण्यास जात असतात. पण बहुतेकांना त्या स्थानाची भौगोलिक माहिती ज्ञात नसते. अक्षांश व रेखांश काय आहे याची माहिती नसते. समुद्रसपाटीपासून त्या स्थळांची उंची किती हे माहीत नसते. यासाठी लेण्यांचा परिपूर्ण शास्त्रशुद्ध नकाशा जाणाऱ्या प्रत्येक ग्रुपने तयार करणे गरजेचे आहे. गड, किल्ले यावर ट्रेकिंगला जाणाऱ्या संस्थांनी त्यांचे नकाशे तयार केले आहेत. त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील डोंगरकपारीत असलेल्या सर्व लेण्यांच्या मार्गांचे नकाशे तयार केले पाहिजेत.

आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कंपास असतो. त्याचा बाण हा नेहमी उत्तर दिशा दाखवितो. त्यामुळे त्या दिशेस तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला पश्चिम, उजव्या हातास पूर्व व पाठीमागे दक्षिण दिशा येते याचे जुजबी ज्ञान असावे. तसेच कंपासमध्ये त्या स्थळाचे अक्षांश व रेखांश येतात. मुलांना ती माहिती देऊन त्या लेणीचे स्थान निश्चित करण्यास सांगावे. समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी Mean Sea Level चे कोणतेही ऍप डाउनलोड करून ठेवावे. त्यामुळे स्थळाची उंची समजते. गुगल मॅप वरून लेण्यांचे लोकेशन जरी समजले तरी इतर अवांतर माहिती मिळत नाही.

विशेष करून जेथे आडमार्गावर लेणी आहेत व जेथे जास्त वावर नाही तेथे गेला तर त्याचे स्थान निश्चित करून त्याची नोंद ठेवावी.पृथ्वीची रचना अक्षांश, रेखांश आणि उंची या त्रिमितीत दर्शविता येते. त्याचे गणित मांडता येते. या मितिच्या केवळ तीन आकड्याने एखाद्या स्थानाबाबतचे हवामान, ऋतू, दिवसाचा कालावधी याचा अंदाज बांधता येतो. रेखांश म्हणजे पूर्व-पश्चिम मापन, अक्षांश म्हणजे दक्षिण-उत्तर मापन असते. आणि त्यास्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची समजली की नकाशे बनविता येतात. तरी प्रत्यक्ष लेण्यांच्या ठिकाणी गेल्यावर याची नोंद करून ठेवावी. तसेच आजूबाजूस असलेल्या स्थळांची, गावांची, उंचवट्याची नोंद ठेवावी.

पाश्चिमात्य लोक कुठेही जाताना नकाशाचे बाड घेऊन फिरतात. आपल्या इथे हॉलिडे हायकर्स क्लबने ‘महाराष्ट्राची निसर्गलेणी’ या पुस्तकात नकाशे सादर केले आहेत. पण २८ वर्षापूर्वीचे ते नकाशे सर्वत्र उपलब्ध होत नाहीत. काही ठिकाणी जाताना स्थानिकांना विचारावे लागते. नकाशा असेल तर विचारायची गरज पडत नाही.यास्तव सर्व लेण्यांचे परिपूर्ण नकाशे तयार झाले पाहिजेत. यासाठी जनगणना कार्यालयाच्या नकाशा पुस्तकांचा किंवा तालुकाच्या नकाशाचा आधार घेऊन लेणीनिहाय नकाशे तरुण वर्गाने तयार केले पाहिजेत. ज्यात लेण्यांच्या संदर्भातील धम्माबाबतची माहिती अंतर्भूत असेल. असे नकाशे सर्वत्र प्रसिद्ध झाल्यास लेण्यांची आवड असणारे भारतीय व परदेशीय पर्यटक तिथे नक्की जाऊ शकतील.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)