बातम्या

तामीळ महाकाव्य “मणीमेक्खलाई” चे भाषांतर होणार २० भाषेत

६ एप्रिल २०२२ च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या चेन्नई आवृत्तीत बातमी आली आहे की ‘मणीमेक्खलाई’ या तामिळ पुरातन बौध्द महाकाव्याचे वीस भाषांमध्ये भाषांतर होणार आहे. हे वाचून आनंद झाला. आता लवकरच आशिया खंडातील बौद्ध देशांमधील अभ्यासक हे महाकाव्य त्यांच्या भाषेत वाचू शकतील. हे भाषांतराचे काम सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तामिल ( CICT) या संस्थेने परदेशी अभ्यासक, भाषा तज्ञ आणि नामांकित विद्यापीठे यांच्या सहकार्याने हाती घेतले आहे. ‘मणीमेक्खलाई’ या महाकाव्यात बौद्ध तत्वज्ञानाचा उहापोह केलेला आढळतो. या तामीळ महाकाव्यात एका सुंदर कथा गुंफलेली आहे. सहाव्या शतकातील दक्षिण भारतातील बौद्ध संस्कृतीचा सुवर्णकाळ या काव्यातून दिसून येतो.

या महकाव्याची थोडक्यात कथा अशी की, मणीमेक्खलाई ही सुंदरी काही संप्रदायांचा अभ्यास करत असताना तीला बुद्धांनी उपदेशिलेल्या बऱ्याच गोष्टी परखड व योग्य वाटू वाटतात. जन्मापासून मनुष्य हा दुःखी आहे आणि तो सतत त्या पासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मार्ग माहीत नसल्याने चुकीची कर्मकांडे करीत आहे. हे तिला उमगल्यावर ती बौद्ध भिक्षू अरवना अडिगल यांचे प्रवचन ऐकते. सत्य मार्ग कळल्यावर ती भिक्षुणीची उपसंपदा घेते आणि उर्वरित आयुष्य दक्षिण भारतात बौद्ध तत्वांचा प्रसार करण्यात घालवीते. अशा या काव्यात चार आर्यसत्ये, प्रतीत्यसमुत्पाद, नाम-रूप, चित्त आणि चेतासिका ( Mind & Mental states ), शील-समाधि-प्रज्ञा यांचे चांगले स्पष्टीकरण केलेले आहे.

कवीने बुद्धांचा उपदेश मानवजातीस कसा लाभकारक आहे, हे तुलना करून सत्य काय व योग्य काय हे कथेद्वारे व योग्य मीमांसा करून मांडलेले आहे. यामुळे हे काव्य मानवी जीवनावर योग्य भाष्य करते. यात एकूण ३० सर्ग (अध्याय) असून दक्षिण भारतातील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे काव्य निश्चितच अनमोल आहे. प्राचीन काळी बहरलेल्या बौद्ध संस्कृतीची खाण या काव्यातून दिसून येते. अशा या प्राचीन काव्याचा तामिळ बौद्ध कवी ‘सीथालाई सत्तनार’ आहे. आज दीड हजार वर्षानंतर त्यांच्या या कलाकृतीचे वीस भाषेत भाषांतर होत असलेले पाहून खूपच आनंद वाटतो.

प्राचीन तामिळनाडू प्रांतातून बुद्धिझमचा प्रसार श्रीलंका आणि पूर्वेकडील अनेक देशांत झाला. या देशांनी पालि भाषेतील बौद्ध तत्वज्ञान स्वीकारले. परंतु या देशांत मणीमेक्खलाई सारखे प्राचीन भारतीय बौद्ध काव्य काही गेले नाही. धर्मगुरू दलाई लामा यांनी देखील महाकाव्य मणीमेक्खलाई वाचले असून त्याचे महत्त्व विशद केले आहे. जगातील ज्या पहिल्या दहा भाषेत हे मणीमेक्खलाई महाकाव्य भाषांतरित होणार आहे त्या भाषा आहेत सिंहली, मंगोलियन, थाई, कोरियन, जपानी, मलाय, बर्मी, व्हिएतनामी, चिनी आणि मॉरिशयस क्रिओल.

मणीमेक्खलाईचे इंग्लिश भाषांतर झाले असून ते लोकप्रिय होत चालले आहे. प्रमुख देशांतील भाषेतून त्याचे भाषांतर झाल्यावर ते हिंदी आणि संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचा संस्थेचा मनोदय आहे, असे CICT संस्थेचे संचालक आर चंद्रशेखरन यांनी सांगितले. तरी बौद्ध साहित्य वाचणाऱ्या मराठी वाचकांना या सुंदर कलाकृतीचा आस्वाद घेण्यास थोडा वेळ लागेल.

‘मणीमेक्खलाई’ सारखे महाकाव्य महाराष्ट्रात निर्माण झाले नसले तरी महाराष्ट्रातील संतांच्या अभंगातून बुद्धांचा उपदेशच झिरपत होता, असे दिसून येते. इथल्या काळ्या कातळातून आकारास आलेल्या लेण्यां या मणीमेक्खलाई कलाकृतीच्या तोडीच्या आहेत याचा देखील बोध अभ्यास करताना होतो.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)