इतिहास

मणीमेक्खलाई’ प्रसिद्ध तामिळ बौद्ध महाकाव्य; प्राचीन काळी बहरलेल्या बौद्ध संस्कृतीची खाण

तामीळ साहित्यात पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. व ती खालीलप्रमाणे आहेत.
१) सिलप्पाधीकरम
२) मणीमेक्खलाई
३) वलाईयापती
४) कुंडलकेसी
५) जिवका चिंतामणी.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महाकाव्ये एकाही हिंदू तामिळ कवीनीं लिहिलेली नाहीत.पहिली आणि शेवटची कलाकृती जैन धर्मीय कवींची असून मधली तिन्ही महाकाव्ये बौद्ध धर्मीय कवींची आहेत. यातील जैन कलाकृती अद्याप उपलब्ध असून बौद्ध कलाकृतीतील ‘मणीमेक्खलाई’ सोडून बाकीच्या कलाकृती नष्ट झालेल्या आहेत. ‘मणीमेक्खला’ या महाकाव्याबाबत पालि, संस्कृत आणि सिंहली साहित्य जरी अनभिज्ञ असले तरी बुद्ध तत्वज्ञानाचा खजिना असलेले हे तामिळ साहित्यातील लेणे एका सुंदर कथेद्वारे सांगण्यात आले आहे. सहाव्या शतकातील दक्षिण भारतातील बौद्ध संस्कृतीचा सुवर्णकाळ हे काव्य स्पष्ट करते.

मनिमेक्खलाई ही एक हिंदू कुमारिका आहे आणि ती हिंदू तत्वज्ञानाचा त्याचबरोबर इतर धर्मांचाही अभ्यास करत आहे. अभ्यास करता करता ती बौद्ध तत्त्वज्ञानाची इतर धर्मांबरोबर तुलना करू लागते आणि मग तिला धम्माच्या बऱ्याच गोष्टी परखड व सत्य वाटू वाटतात. जन्मापासून मनुष्य हा दुःखी आहे आणि तो सतत त्या पासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मार्ग माहीत नसल्याने चुकीची कर्मकांडे करीत आहे. हे तिला उमगल्यावर ती भिक्खु अरवना अडिगल यांचे प्रवचन ऐकते. सत्य मार्ग कळल्यावर ती भिक्खूणीची उपसंपदा घेते आणि उर्वरित आयुष्य दक्षिण भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात घालवीते. अशी ही मणीमेक्खला महाकाव्याची थोडक्यात कथा आहे.

अशा या महाकाव्यात चार आर्यसत्ये, प्रतीत्यसमुत्पाद, नाम-रूप, चित्त आणि चेतासिका ( Mind & Mental states ), शील-समाधि-प्रज्ञा यांचे चांगले स्पष्टीकरण केलेले आहे. या महाकाव्याच्या कवीने बौद्ध धर्माची इतर धर्माबरोबर तुलना करून सत्य काय व योग्य काय हे कथेद्वारे व योग्य मीमांसा करून मांडलेले आहे. यामुळे या काव्याचा हेतू बौद्ध धम्माचा प्रसार करणे हाच दिसून येतो. आणि तो शतप्रतिशत यशस्वी झालेला आहे.

या महाकाव्यात एकूण ३० सर्ग (अध्याय) असून दक्षिण भारतातील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे काव्य अनमोल आहे. प्राचीन काळी बहरलेल्या बौद्ध संस्कृतीची खाण या काव्यातून दिसून येते. अशा या पुरातन तामिळी साहित्यातील महाकाव्याचा बौद्ध भाट/कवी आहे ‘सीथालाई सत्तनार’. त्यांच्या या कलाकृतीस अभिवादन. एक प्रश्न पडतो की महाराष्ट्र देशी हरेक ठिकाणी, डोंगर-दऱ्यात अनेक लेण्या आहेत. एकेकाळी इथेही बौद्ध संस्कृती रुजली होती. बहरली होती. मग तामिळ साहित्यासारखे येथे ‘मणीमेक्खलाई’ महाकाव्य किंवा एखादा ग्रंथ का निर्माण झाला नाही ?

-संजय सावंत (नवी मुंबई)