जगभरातील बुद्ध धम्म

मंथल येथील या शिळेवर बुद्धप्रतिमा

आताचा पाकिस्तान देश हा एकेकाळी बौद्ध धम्माचा प्रसार झालेला मोठा प्रांत होता. इ.स. २०० वर्षापूर्वी पासून सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध धम्म येथे पसरू लागला होता. या प्रांतातील बौद्ध भिक्खू कुमारलब्ध हा अश्वघोष, नागार्जुन यांच्या सारखा विद्वान होता.

येथील स्करदू शहरा जवळील मंथल गावापाशी मोठमोठ्या शिळा आहेत. या शिळेवर बुद्धप्रतिमा कोरलेल्या आढळतात. गिलगिट बल्टिस्थान या प्रांतात इस्लाम येण्यापूर्वी बुद्ध धम्माचा प्रभाव होता. त्या काळात पर्वतरांगांमध्ये शिळेवर कोरलेली बुद्ध शिल्पे आजही आढळतात.

मंथल येथील या शिळेवर बुद्धप्रतिमा

शंभर वर्षांपूर्वी याचा कुणाला मागमूस नव्हता. १९०६ मध्ये एक स्कॉटिश महिला प्रवासी ईला ख्रिस्ती या भागातून जात असताना तीला या बुद्ध प्रतिमा दिसल्या. तिने त्यावर पुस्तक लिहिले. सरकारने तेव्हापासून हा ठेवा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

कारगाह येथील बुद्ध शिल्पांचा शोध तर १९३९ मध्ये लागला. सातव्या शतकात तेथील मूर्ती कोरली असावी असा कयास आहे. तेथील जनतेला त्यांच्या पूर्वजांचा इतिहास माहीत असला तरी इस्लामी परंपरेनुसार मूर्तींना, शिल्पांना ते नगण्य स्थान देतात. त्यामुळे म्हणावी तशी बुद्ध शिल्पांची जपणूक करण्यात आलेली नाही.