ब्लॉग

डॉ.आंबेडकरांचे जळगाव जिल्ह्याशी होते विशेष नाते; २९ वेळा केला होता जळगाव दौरा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या जळगाव जिल्ह्याला मी नुकतीच भेट दिली. जळगावच्या बहिणाबाई चौधरी कॅम्पस् कॉलेजात मुलगी तनिष्का हिची केमिकल इंजिनीअरिंगमध्ये अॅडमिशन घेण्याकरिता गेलो होतो. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे मुलीला प्रवेश मिळाला. जळगावात फिरताना मला बाबासाहेबांच्या जामणेर, शेंदुर्णी, आसोदा, सावदा येथील सभेचे स्मरण झाले. सेनू नारायण मेढे गुरुजी, मोतीराम महिपत पाटील, धनजी बिऱ्हाडे, देविदास सोनवणे आणि भास्कर काशिनाथ बनसोडे या थोर निष्ठावंतांची नावे ओठावर आली.

बाबासाहेबांच्या भव्य-दिव्य पुतळ्यांचे दर्शन घडले. आठवणीने अंतःकरण गहिवरले. नेत्रज्योती अश्रूधारांनी ओल्याचिंब जाहल्या. जळगावच्या प्रवासाची सुरुवात आणि शेवट बाबासाहेबांच्या हृदयस्पर्शी आठवणीने व्हावा हा माझ्या आयुष्यातील विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल! बाबासाहेब पहिल्यांदा ९६ वर्षांपूर्वी अर्थात जुलै १९२६ साली जळगावला आले होते. त्यावेळी आताच्या आंबेडकर नगरात काही क्षण ते थांबले होते. तिथे त्यांनी बोंबिलची चटणी व कळणाची भाकर (ज्वारी व उडीद दाळीच्या पीठाचे मिश्रण) असे जेवण घेतले होते. जेवण आटोपल्यावर आसोदा गावी संत चोखामेळा वसतिगृहाच्या भेटीकरिता गेले. दुसऱ्या दिवशी न्यायालयीन काम आटोपून मुंबईला रवाना झाले.

मे १९२९ साली बाबासाहेबांच्या जळगावात अने सभा गाजल्या. साहित्यिक जयंत पाटील यांचे आजोबा मोतीराम महिपत पाटील, धनजी बिऱ्हाडे आणि देविदास सोनवणे यांच्या घरी बाबासाहेब तीन दिवस मुक्कामी होते, अशी आठवण सांगितली जाते. देविदास सोनवणे यांना संत कबीराचे दोहे मुखपाठ होते. त्यामुळे बाबासाहेबांना त्यांच्याबद्दल विशेष आदरभाव होता. जळगावच्या हरिविठ्ठलनगर परिसरातील स्मृतिशेष भास्कर काशिनाथ बनसोडे यांची दणकट शरीरयष्टी, पहेलवान असल्यामुळे त्यांना बाबासाहेबांचे अंगरक्षक होण्याचे सुभाग्य लाभले. चाळीसगावच्या रेल्वे प्रवासात ते बाबासाहेबांच्या पायाशीच बसले होते. त्यांच्या भारदस्त आवाजातील ध्वनीफित आजही माझ्या संग्रही आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या अविस्मरणीय आठवणी पहाडी आवाजात सादर केल्या आहेत.

बाबासाहेबांनी जळगावला आपल्या आयुष्यात जवळ जवळ २९ वेळा भेट दिली होती. समाजबांधवांसाठी त्यांचा प्रत्येक दौरा प्रेरणादायी ठरला. भेटीकरिता अनुयायी वर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. भेटीची आतुरता असे. बाबासाहेबांसाठी सावदाचा अनुभव मात्र फारच वाईट राहिला. त्यांच्या सभेवर दगडफेक करण्यात आली होती. त्यात ते जखमी झाले होते. ‘यापुढे खान्देशात येणार नाही’ अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. जळगावला मे १९२८ साली ‘महार वतन परिषद’ बाबासाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत भरली होती. ही परिषद आताच्या वल्लभदास वालजी वाचनालयाच्या प्रांगणात भरली होती. वालजी त्याकाळी प्रसिद्ध उद्योगपती होते. सभेला अध्यक्ष म्हणून माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे वडील राजमल लखीचंद जैन हेसुद्धा हजर होते. त्यांनी महार वतन विधेयकाला पाठिंबा दिला होता.

सभेत बाबासाहेबांचे भाषण सुरू असताना श्रीधर पंत टिळक यांच्या निधनाची तार त्यांना मिळाली. त्यांनी ती तार वाचून दाखविली. श्रद्धांजली वाहिली आणि टिळकांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. या सभेला जवळजवळ तीन हजार लोक उपस्थित होते. बाबासाहेबांच्या जळगाव दौऱ्याचा ऐतिहासिक विचार केला तर ‘ओबीसी समाज’ हा शब्द प्रयोग जळगाव जिल्ह्यातून सुरू झाला आणि तो बाबासाहेबांनी सुरू केला हे विशेष. बाबासाहेबांनी २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद ता. यावल येथील न्यू इंग्लिश स्कूलला भेट दिली. शाळेत अस्पृश्य विद्यार्थ्यांना मिळणारी वागणूक, आदिवासी समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती या विषयीचे सर्वेक्षण करण्यासाठी स्टार्ट कमिटीचे सभासद म्हणून ते आले होते. या समितीत एकूण नऊ सभासद होते. मात्र या विषयाच्या अभ्यासाची संपूर्ण जबाबदारी बाबासाहेबांवर सोपविण्यात आली होती. या समितीने भालोद व आजूबाजूचा परिसर निवडला होता.

स्टार्ट कमिटीतच बाबासाहेबांनी ‘ओबीसी’ शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केला आणि १९३० पासून ‘ओबीसी समाज’ असा शब्द प्रयोग जनमानसात रूढ झाला. खान्देश लक्ष्मी विलास मिल विरुद्ध ‘गड्यूएट कोल कंसर्न’ या खटल्याकरिता बाबासाहेब १९३३ साली जळगाव न्यायालयात आले होते. खान्देश मिलचे ते वकील होते. त्यांच्यासोबत डब्ल्यू. डी. प्रधान व जी. एस. गुप्ते हे दोन वकील देखील होते. सिव्हिल रिव्हिजन नं. ३९० / १९३३ अशी नोंद सदर खटल्याची असून १९३४ साली सदर खटल्याचा निकाल खान्देश मिलच्या बाजूने (बाबासाहेबांच्या युक्तिवादाने) लागला. बाबासाहेब कोर्टात जात असताना लोकांची एवढी गर्दी झाली होती की, त्यांना न्यायालयात प्रवेश करणे शक्य झाले नाही. अखेरीस नाईलाजाने पोलिसांना पाचारण करावे लागले होते..

बाबासाहेबांचा ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ जळगाव जिल्ह्यात आघाडीवर होता. १९३७ साली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी डी. जी. जाधव यांना उमेदवारी दिली होती. बाबासाहेबांनी जाधव यांच्या प्रचारार्थ जळगावात अनेक सभा घेतल्या. जामणेर येथे त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी मिरवणूक म्हणून तिचा उल्लेख केला जाऊ शकतो. या निवडणुकीत जाधव प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते.

परतीच्या प्रवासात माझी पावले जळगावच्या रेल्वे स्टेशनकडे वळली. तिथे पोहोचताच रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या भव्य-दिव्य पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन झाले. पुतळ्याला अनन्यभावे वंदन केले. जड अंतःकरणाने हळुवार पावले टाकीत रेल्वे स्टेशनच्या आत प्रवेश केला. मुंबईवरून नागपूरला जाणाऱ्या ‘सेवाग्राम एक्प्रेस मध्ये बसलो. पाच मिनिटात आगगाडी १४ नोव्हेंबरच्या रात्री बरोबर १०.३० वाजता सुटली. पाहता पाहता आगगाडीने सुसाट वेग धरला. त्याचक्षणी मनःचक्षूपुढे बाबासाहेबांच्या विचारधन स्फुरले, “बाबा म्हणायचे बंधू-भगिनींनो, शिक्षणासाठी कितीही कष्ट पडले तरी शिक्षण घ्या.

एवढेच नव्हे तर सामाजिक समता निर्माण होण्यासाठी स्वच्छ राहा, संघटित व्हा आणि अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करा, हे करताना सगळ्यांशी प्रेमाने, बंधुभावाने वागा…” बाबासाहेबांची ही मौलिक विचारधारा आगगाडीच्या वेगाप्रमाणे गतिमान झाल्यास केवळ आंबेडकरी समाजाचेच नव्हे तर समस्त भारतीयांचे कल्याण होणार आहे.

मिलिंद मानकर, नागपूर, मो. ८०८०३३५०९६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *