बातम्या

नागपूरच्या मिलिंद मानकरांकडे बाबासाहेबांच्या दुर्मिळ साहित्याचा खजिना

नागपूर : संगणक ऑपरेटरची नोकरी करत बाबासाहेबांच्या प्रेमापोटी दुर्मिळ साहित्य संपत्ती जतन करणारा नागपूरचा एक अवलिया. नागपूर येथील गोपालनगरातील मनी लेआऊट मध्ये राहणारे मिलिंद मानकर यांच्याकडे १९४८ पासूनचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व प्रकारचे साहित्य आहे. त्यासोबतच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची दुर्मिळ माहिती सुद्धा त्यांच्याकडे असून त्यावर नेहमीच वृत्तपत्राच्या माध्यमातून लिखाण करतात.

मिलिंद मानकर यांना बाबासाहेबांचे दुर्मिळ साहित्य जतन करण्याचा वारसा/छंद त्यांचे वडील दाजीबाजी मानकर यांच्याकडून मिळाला आहे. त्यांचे वडील हे शासकीय मुद्रणालयात नोकरीला होते. त्यांना बाबासाहेबांच्या विचाराची ओढ होती. बाबासाहेबांचे ग्रंथ जपून ठेवणे, त्यांचे विचार डायरीत लिहून ठेवणे. हा त्यांचा नेहमीचाच उपक्रम होता. बाबासाहेबांचे अनुयायी बाबू आवळे यांच्यावरील पुस्तकही त्यांनी लिहिले. वडील गेले परिस्थिती जेमतेम. वडिलांकडून त्यांना मिळाला तो बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि त्यांचे साहित्य जपून ठेवण्याचा ध्यास. त्यांनी तो आजपर्यंत सुरु ठेवला आहे.

मिलिंद मानकर यांचे शिक्षण आंबेडकर विचारधारा विषयात एम.ए. झाले आहेत. दोन खोल्यांचे घर, संगणक ऑपरेटरची नोकरी असल्याने परिस्थिती जेमतेम आहे. मात्र त्यांच्याकडे बाबासाहेबांचे मौलिक साहित्य संपत्ती असल्याने आज त्यांच्याएवढी श्रीमंती कुणालाही मिळणार नाही.

डॉ.आंबेडकरांचे दुर्मिळ साहित्य
डॉ.आंबेडकरांचे ‘मूकनायक’ आणि ‘जनता’ या साप्ताहिकातील लेख ग्रंथरूपाने प्रकाशित झाले आहेत. पण त्यांचे इतर साप्ताहिकातील विचार मानकर यांच्या मूळ स्वरूपात संग्रही आहेत. बाबासाहेबांची छायाचित्रे म्हणजे मानकारांचे जीव कि प्राण. मासिके साप्ताहिके यासह त्यांची दुर्मिळ छायाचित्रे जपून ठेवली आहेत.

सातारा जिल्ह्यातील निपाणी येथे स्वतंत्र मजूर पक्षाच्या अधिवेशनासाठी तेथील डाक बंगल्याच्या आवारात ते सुटाबुटात असूनही घोड्यावर बसले. त्यावेळी त्यांचे छायाचित्र काढण्यात आले. त्याची एक प्रत मानकर यांच्या संग्रही आहे. बाबासाहेबांच्या संग्रही असलेल्या तत्वज्ञान, काव्य, कादंबऱ्या या ग्रंथाची यादी, त्यांच्या इंग्रजी व मराठी हस्ताक्षराचे नमुने मानकर यांच्याकडे आहेत.

बाबासाहेब एकदा नागपूरला आले असताना मधुमेहाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी इंजेक्शन सीताबर्डीच्या मेडिकल स्टोअर्समधून घेतले. त्याची पावती आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रेतावर वाहिलेला हार त्यांनी अजून जपून ठेवला आहे.

मानकरांना प्रकाशक मिळेना
मिलिंद मानकर हे आंबेडकरवादी समाज उत्थान चळवळ आणि बौद्ध तत्वाचे गाढे अभ्यासक आहेत. आजपर्यंत त्यांचे विविध वृत्तपत्रातून ५०० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांना लिखाणाचा छंद बालवयातच लागला होता. सध्या त्यांच्याकडे बाबासाहेबांच्या विविध विषयावर दुर्मिळ माहिती असलेले त्यांचे लिखाण आहे. त्यावर ४ ते ५ पुस्तक तयार होतील. स्वतः खर्च करून पुस्तक प्रकाशित करण्याची त्यांची परिस्थिती नाही. मानकर यांना पुस्तकं प्रकाशित करण्याची इच्छा आहे, पण प्रकाशक मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.