ब्लॉग

एकाग्रता करते अर्थपूर्ण सुसंवाद

मनुष्यप्राणी हा मोठा गप्पिष्ट आहे. दोन-चार लोक आजूबाजूला जमले की गप्पा चालू होतात. पुरुषांच्या गप्पांचे विषय वेगळे असतात. स्त्रियांच्या गप्पांचे विषय वेगळे असतात. सर्वसामान्य माणसांच्या गप्पा या त्यांच्या जीवनात आलेल्या बऱ्यावाईट अनुभवावर आधारित असतात. गप्पा मारताना माणूस सहजपणे अनेक वेळा खोटे बोलून जातो. काही वेळेला निरर्थक गप्पा मारतो. काही वेळेला दुसऱ्याप्रती त्यात शिवीगाळ असते तर काही वेळेला स्वतःचा उदोउदो केलेला असतो. काही वेळेला हीन विनोद असतो तर काही वेळेला मोठ्या धार्मिक गप्पा हाणतो. कधी मूर्खासारखे बडबडतो तर काही वेळेला विद्वान असल्यासारखे प्रवचन झोडतो. आपले बोलणे सर्वांनी ऐकावे व मान्य करावे हाच उद्देश त्यामागे असतो. थोडक्यात माणूस बराच असंबद्ध बडबडतो.

परंतु जो पंचशीलाचे प्रत्यक्षपणे पालन करतो आणि सकाळ-संध्याकाळ ध्यानसाधना करतो अशा माणसाचे बोलणे अर्थपुर्ण आणि मोजकेच होते. धम्माचे आकलन ज्याला झाले आहे असा साधक चित्त व शरीर यांचे प्रती जागृत राहून तो यथार्थ व कळेल असेच बोलतो. पंचशील पाळून साधनेच्याप्रती निष्ठावान राहिल्याने अनेक चांगल्या गोष्टी चित्त व शरीरधारेस बळकटी देतात. बाष्कळ बडबड बंद होते. ताणतणाव नष्ट होतात. वाणी आपोआप सुधारते. सर्वांप्रती प्रेम भावना वाढीस लागते. लोभ व द्वेष नष्ट होऊ लागतो. जे जे कार्य हाती घेतले जाते त्यात यश प्राप्त होते. आर्थिक स्तर आपोआप उंचावतो. कुटुंबांमध्ये शांती वाढीला लागते. छोटे-मोठे आजार पळून जातात. उत्साह वाढीस लागतो. बुद्धांच्या शिकवणुकीचे आकलन होत जाते. एकमेकांतील संवाद सुधारतो. अशा अनेक महत्वपूर्ण चांगल्या बाबी घडून येतात.

“शील, समाधि आणि प्रज्ञा” यामधील शील या घटकातील वाणी सुधारण्याचे काम साधनेच्या अभ्यासानेच होते. आपली वाणी खालील चार बाबींनी युक्त असावी असे पाली भाषेतील गाथांमध्ये म्हटले आहे.
सुभाषित बोलावे – दुर्भाषित बोलू नये.
धर्मच बोलावे – अधर्म बोलू नये.
प्रिय बोलावे – अप्रिय बोलू नये.
सत्यच बोलावे – असत्य बोलू नये.

साधकाने अशी वाणी बोलावी की जिच्यामुळे आपल्यावर पश्चाताप करण्याची पाळी येत नाही व इतरांनाही त्रास होत नाही. अशी वाणी हीच खरी सुभाषित वाणी होय. प्रत्येकाने आपण काय बोलतो याकडे जागृततेने लक्ष ठेवावे. निरर्थक गप्पागोष्टी, असंबद्ध बडबड नसावी. स्वतःचे शरीराप्रती होणाऱ्या संवेदनांना साक्षी राहून बोललेली वाणी ही धर्मवाणी होय. यामुळे सर्व प्राणीमात्रांचा हितचिंतक आणि त्यांच्याप्रती अनुकंपीत होऊन विहरता येते. सत्यवादी झाल्याने लोकांच्या विश्वासास पात्र होता येते. लोकांमध्ये एकीचे बळ वाढविता येते. म्हणून दुसऱ्यांना समजेल, उमजेल असे बोलावे. त्यामध्ये उपहास, निंदा, क्रोध नसावा. जी वाणी कानाला सुख देणारी आहे, प्रेमळ आहे, हृदयाला जाऊन भिडणारी आहे, सभ्य आहे, बहुजनांना मान्य आहे अशी भाषा बोलणारा निश्चितच समाधी आणि प्रज्ञेत निपुण होतो. म्हणूनच म्हटले आहे वाचाळ न होता विनयवादी व्हावे. त्यातच सौख्य सामावले आहे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *