बातम्या

हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला… हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजगृहाचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीसांना दिले आहेत. तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मनसेने देखील या भ्याड कृत्याचा निषेध केला आहे.

मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून निषेध व्यक्त केला असून यामध्ये असे म्हटले की, हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला… हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला… ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच पण सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *