बुद्ध तत्वज्ञान

दोन हजार वर्षांपूर्वीच्या असंख्य बौद्ध ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञानाचा संदर्भ आढळतो

गेल्या चारशे वर्षांच्या काळात अनेक शोध लागले. असंख्य नव्या नव्या गोष्टींचा मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करू लागला. पृथ्वी, ग्रह, चंद्र, सूर्य, तारे याबाबत अनेक गोष्टी कळल्या. त्याच गोष्टींचा उल्लेख अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशात दिला होता हे पाहून आश्चर्य वाटते. दोन हजार वर्षापूर्वीच्या त्रिपिटका मधील असंख्य ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञानाचा संदर्भ आढळतो. आणि हे वाचताना वाचक अचंबित होऊन जातो. आता खालील एक सुत्त पाहू.

संयुत्त निकायमध्ये धनुग्गह सुत्तात भगवान बुद्ध म्हणतात ” भिक्खुंनो, ज्या प्रमाणे चार कुशल वीर धनुर्धारी चारही दिशांना उभे असावेत. तेव्हा एखाद्या माणसाने यावे आणि म्हणावे ‘ मी या चारांनी सोडलेल्या बाणांना पृथ्वीवर पडण्या अगोदर झेलीन. तर भिक्खुंनो तुम्हाला काय वाटते की अशी बढाई मारणारा चारही बाण पृथ्वीवर पडण्या अगोदर झेलील ? एकाने सोडलेला बाण भुईवर पडण्या अगोदर पकडताना त्याची दमछाक होईल. तर चार जणांनी एकाचवेळी सोडलेले बाण तो कसे पकडू शकेल ?

भिक्खूंनो, त्या माणसाचा बाण पकडण्यासाठी पळण्याचा जो वेग आहे, त्यापेक्षा सुद्धा अधिक वेग चंद्र-सूर्य यांचा आहे. चंद्र-सूर्य यांच्या वेगापेक्षा काही ग्रह ताऱ्यांचा वेग जास्त आहे. आणि या सर्वांपेक्षा अधिक वेगाने मानवाचे आयुष्य पळत आहे. जन्म झाल्या पासून भराभर पळे निघून जात आहेत. व आयुष्य क्षीण होत आहे. म्हणून भिक्खूंनो, प्राप्त झालेले हे आयुष्य अप्रमत्त होऊन विहार करा. असा बुद्धांचा उपदेश अवकाश विज्ञानाला धरून आहे.