ब्लॉग

पर्यावरणस्नेही भिक्खु आनंद

भगवान बुद्धांचे थोर शिष्य भिक्खु आनंद यांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी असे होते. काटकसरीपणा हा महामानवांचा विशेष सद़्गुण असतो. आनंदही अत्यंत काटकसरी होते. गरजेशिवाय ते दानाचा स्वीकार करत नसत आणि दानात कोणी मौल्यवान वस्तू दिल्या, तर त्यास नकार देत. ‘अंगावरचं चिवर आणि हातातल्या भिक्षापात्रावरच मी संतुष्ट आहे,’ असं ते म्हणत.

वापरातल्या वस्तुंचा पुरेपुर उपयोग करण्याबाबत आनंद अत्यंत दक्ष होते. एकदा कोशांबीचा राजा उदयनच्या राण्यांनी, आनंदना ५०० चादरी भेट दिल्या. एवढ्या चादरींचं निर्मोही आनंद काय करणार, याचं राजा उदयनला नवल वाटलं. तेव्हा त्याने सहज कुतुहल म्हणून आनंदना विचारले….

उदयन : इतक्या चादरी घेऊन भंते आनंद, आपण
त्यांचं काय करणार?

आनंद : महाराज ज्या भिक्खुंची चिवरं जीर्ण झालीत
त्यांना त्या देईन.

उदयन : जीर्ण चिवरांचं भंते तुम्ही काय करणार?

आनंद : महाराज, त्यांच्या बिछान्यावर अंथरण्या-
साठीच्या चादरी करीन.

उदयन : जुन्या चादरींचं आचार्य तुम्ही काय करणार?

आनंद : महाराज, त्यांच्या गादीसाठी गवसण्या
बनविन.

उदयन : जुन्या गवसण्यांचं तुम्ही काय करणार भंते?

आनंद : महाराज, त्यांची जमीनीवर बसण्यासाठीची
बस्करं बनविन.

उदयन : भंते, जुन्या अ़थरुणांचं काय करणार?

आनंद : महाराज, त्यांचे पायपोस बनविन.

उदयन : जुन्या पायपोसांचं काय करणार?

आनंद : महाराज, ती जमीन पुसण्यासाठी वापरीन.

उदयन : जमीन पुसण्याच्या जुन्या फडक्यांचं भंते
तुम्ही काय करणार?

आनंद : महाराज, ती कुटून चिखलात मिसळून त्याचा
भिंतीला गिलावा करीन.

वसुंधरेला आणि निसर्गाला विविध गोष्टींच्या निर्मितीसाठी व त्या नष्ट करण्यासाठी पडणारे प्रयास आणि लागणारा विशिष्ट कालावधी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करुन, वस्तुंचा पुरेपूर वापर न करताच त्या फेकून देणे, हेच आमच्या आर्थिक अरिष्टाचे व पर्यावरणाच्या -हासाचं कारण होय!

आज ५ जून ‘जागतिक पर्यावरण दिनी’ राजा उदयन आणि भिक्खु आनंद यांच्यातील वरील संवाद आपणास, नक्कीच विचार करण्यास भाग पाडेल.

– सुभाषचंद्र सोनार, राजगुरुनगर.