मानसिक अवस्था हाताच्या व बोटांच्या स्थितीवरून व्यक्त करण्याच्या अविष्कारालाच मुद्रा असे म्हटले जाते. भगवान बुद्धांच्या काळापासून ध्यान मार्गातील विविध मुद्रेला महत्व प्राप्त झाले. आणि मग बुद्धांची मूर्ती व शिल्प घडविताना या विविध मुद्रांचा समावेश त्यात होत गेला. आजमितीस भगवान बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रा या अनेक मूर्ती आणि शिल्पाद्वारे जगभर पसरल्या आहेत. तुम्ही बौद्ध असाल आणि जर एखादी बुद्धांची मूर्ती तुम्ही पाहिली तर ती कोणत्या मुद्रेमध्ये आहे हे तुम्हास ओळखता आले पाहिजे. तरच तुमचा धम्माचा अभ्यास आहे, असे म्हणता येईल. तरी आपण बुद्धांच्या दहा विविध मुद्रांची माहिती येथे घेऊया.
१) धम्मचक्र मुद्रा :- या पृथ्वीवर जे बुद्ध अवस्था प्राप्त करतात तेच या मुद्रेमधून त्यांचा संकेत देतात. या मुद्रेत दोन्ही हात छातीशी असून डाव्या हाताच्या वर उजव्या हात घेऊन बोटांची स्थिती दर्शवली जाते. याचाच अर्थ बुद्धाने जाणवायचे जे काही आहे ते सर्वकाही जाणले आहे. व मानवजातीस उपदेश करून धम्मचक्र गतिमान केले आहे. असा या मुद्रेचा अर्थ आहे.

२) ध्यान मुद्रा :- बैठक घालून, डोळे बंद करून शांत चित्ताने ध्यानास सुरुवात केली जाते. पंचशीलाचे कसोशीने पालन झाले की समाधी मार्गाचा ( श्वासाचे आवागमन यावरील एकाग्रतेचा अभ्यास )अभ्यास केला जातो. त्यानंतरच प्रज्ञा क्षेत्रात शिरावे लागते. या अवस्थेत शरीरात होणाऱ्या सर्व संवेदनाचे तटस्थ भावनेने, समता भावनेने अवलोकन करताना ही मुद्रा योग्य ठरते. डाव्या हातावर उजवा हात ठेवून ताठ बसल्याने प्रज्ञा मार्गात यश लवकर प्राप्त होते. शाक्यमुनी बुद्ध यांची ही ध्यान अवस्थेतील मुद्रा हाच संकेत देत आहे. ही मुद्रा जगभर प्रसिद्ध आहे.

३) भूमीस्पर्श मुद्रा :- जगात जे बुद्ध होऊन गेलेत त्यांनी महापृथ्वीला साक्षी ठेवून ज्ञानप्राप्ती केलेली आहे. जगभर या मुद्रेमधील बुद्धमूर्ती प्रसिद्ध आहे. ज्ञानप्राप्तीची अवस्था या मुद्रेमधून व्यक्त झाली आहे.

४) वरद मुद्रा :- ही मुद्रा भूमीस्पर्श मुद्रेसारखी वाटत असली तरी थोडी वेगळी आहे. या मुद्रेमध्ये हाताचा तळवा दाखविण्यात आला आहे. याचाच अर्थ करुणा प्रगट करणे, उपदेश देणे, प्रामाणिकता दर्शविणे असा होतो. या मुद्रेमधील बुद्धमूर्ती कमी दिसतात.

५) करण मुद्रा :- ध्यान करताना लक्ष लागत नसेल, मन चंचल असेल आणि एकाग्रता साधली जात नसेल तर या मुद्रेचा अवलंब केला जातो. यामुळे नकारात्मक विचार, मानसिक व शारीरिक दुर्बलता आणि चंचलता नाहीशी होते. ही मुद्रा हेच दर्शवित आहे.

६) वज्र मुद्रा :- पंचस्कंधांचे आकलन करणे, त्यांना काबूत ठेवणे आणि त्यांना जाणणे या मुद्रेत व्यक्त झाले आहे. बुद्धांची ही मुद्रा साधकांनी करणे आवश्यक नाही. या मुद्रेतील बुद्धमूर्ती गांधार शिल्पकला संस्कृतीत पाहण्यात येते.

७) वितर्क मुद्रा :- या मुद्रा अवस्थेतील बुद्धमूर्ती अनेक ठिकाणी दृष्टीस पडते. याचाच अर्थ बुद्धांचा धम्मोपदेश या पृथ्वीतलावर चिरंतन राहणार आहे. व अनेक युगात सामान्यजनांना तो मार्गदर्शक ठरणार आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनी एकमेकाला जोडून बाकीची बोटे ही सरळ असतात. या मुद्रेची बुद्धमूर्ती प्रसिद्ध असून अनेक ठिकाणी पहावयास मिळते.

८) अभय मुद्रा :- सर्व विकारांपासून मुक्त झाल्यावर कशाचेच भय उरले नाही. तृष्णा कायमची नष्ट झाली म्हणून या मुद्रेचे महत्व आहे. या मुद्रा अवस्थेतील बुद्धमुर्ती अनेक ठिकाणी पहावयास मिळते. उजवा हात दुमडून तळवा सरळ दाखविला जातो. याचाच अर्थ मारापासून मुक्ती झाली आहे. आता कशाचेच भय उरले नाही.

९) उत्तरबोधी मुद्रा :- या मुद्रेचा अर्थ आहे की सर्व जग जिंकले आहे. जाणण्याचे काही बाकी राहिले नाही. बोधीची दृष्टी प्राप्त झाली आहे. या मुद्रेत दोन्ही हात छातीपाशी धरून तर्जनीचा एकमेकांना स्पर्श केलेला असतो.

१०) अंजली मुद्रा :- यास अभिवादन मुद्रा किंवा नमस्कार मुद्रा असेही म्हटले जाते. सदिच्छा व्यक्त करणे. प्रार्थना म्हणणे या मुद्रेतून व्यक्त होते. या मुद्रेतील बुद्धमूर्ती कमी ठिकाणी पाहण्यात येतात. मात्र या मुद्रेवरूनच प्राचीन काळापासून ‘नमस्ते’ हा शब्द जगभर रूढ झाला. व सध्या कोरोनारोगाच्या पार्श्वभूमीवर लांबूनच ‘नमस्ते’ म्हणून अभिवादन करणे हे जगभर प्रिय झाले. योगाच्या प्रसाराबरोबर व त्या माध्यमातून बुद्धांची ही मुद्रा सर्व देशात पसरली. आज “नमस्ते” म्हणणे म्हणजे एकमेकांच्या चित्तधारेस नमन केल्या सारखेच आहे. आणि त्याचा उदय बौद्ध संस्कृतीपासून झाला आहे, हे लक्षात ठेवावे.

अशा या बुद्धांच्या दहा मुद्रा जगभर प्रसिद्ध आहेत. त्यापैकी भूमीस्पर्श मुद्रा, अभय मुद्रा, वितर्क मुद्रा, ध्यान मुद्रा व धम्मचक्र मुद्रा या जास्त प्रसिद्ध आहेत. या जगात ज्ञानाचा अथांग सागर बुद्धांनी सांगितलेल्या धम्मात आहे. कितीही अभ्यास करा, वाचायचे थोडेतरी शिल्लक राहतेच.
संजय सावंत, नवी मुंबई (ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)