जगभरातील बुद्ध धम्म

जपानमध्ये अनोखे कॉफीशॉप; हे तर बोधिसत्वमूर्त्यांचे छोटे म्युझियमच

जपानमध्ये कागरी येथे एक अनोखे कॉफीशॉप आहे. इथे कॉफीपान करण्यासाठी ग्राहक जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा तेथे असंख्य बोधिसत्वमूर्ती पाहून तो दचकतो. आणि मग यांच्याच सानिध्यात बसून कॉफीपान करायचे आहे हे उमजून मनोमन खुश होतो. हे नुसते कॉफीशॉप नाही तर महायान पंथीय बोधिसत्वमूर्त्यांचे छोटे म्युझियमच आहे.

जपानमध्ये कांसाई प्रांतात ओसाका सिटी आहे. तेथे ‘शिन वाशी सूजी’ या बाजारपेठेत कागरी कॉफी हाऊस आहे. तिथे टेबलापाशी बसून वेगवेगळ्या कॉफीचां आस्वाद घेताना ग्राहक बोधिसत्वमूर्तीचे भांडार सुद्धा पाहू शकतो. कारण या कॉफीशॉपमध्ये प्रत्येक कोपऱ्यात, टेबलाजवळ आणि मध्यभागी महायान परंपरेतील वेगवेगळ्या मुद्रेच्या कलाकुसर केलेल्या बोधिसत्वमूर्ती स्थानापन्न केेल्या आहेत.

एखाद्याला वाटावे या कॉफीशॉपचा मालक शिल्पकार तर नाही ना..! किंवा बोधिसत्व मूर्त्यांचा विक्रेता तर नाही ना..! याबाबत मालकाला विचारले असता तो म्हणाला “या सर्व बोधिसत्वमूर्ती इथे असल्यामुळे मला एक आंतरिक समाधान मिळते. ग्राहकांना सुद्धा कॉफीपान करताना या मुर्त्या त्यांच्याकडे पहात आहेत असा त्यानां भास होतो. व त्यामुळे त्यांना सुद्धा मानसिक समाधान मिळते”.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)