इतिहास

पिप्राहवा स्तुपातील अस्थींचे रहस्य

पिप्राहवा हे गाव उत्तर प्रदेश मध्ये सिद्धार्थ नगर जिल्ह्यात आहे. लुंबिनी पासून हे ठिकाण बारा मैल अंतरावर आहे. या गावांमध्ये एक टेकडी होती. सन १८९८मध्ये ब्रिटिश अभियंता विल्यम पेपे यांनी येथे उत्खनन केले. वरचा मातीचा ढिगारा काढल्यावर त्यांना तेथे पक्क्या विटांचे बांधकाम केलेला स्तुप आढळला.

त्या स्तूपात काही मिळेल या अनुषंगाने त्यांनी तो खोदला असता दहा फूट खोलीवर त्यांना एक दगडी मंजुषा आढळली. ती हळुवार पणे बाहेर काढली आणि उघडली असता त्यात पाच कलश मिळाले. त्यात काही अस्थी व माणिक-रत्ने होती. एका भांड्यावर ब्राह्मी लिपीत लिहिले होते की ‘शाक्य कुळाच्या ताब्यातील भगवान बुद्धांच्या अस्थी’. हे वाचून सर्वजण चकित झाले.

त्याचवेळी सयामचा ( आता थायलंड) राजा राम-५ याचा पुतण्या ‘प्रिसदंग’ हा सिरिलंकामधून भिक्खूची उपसंपदा घेऊन पिप्राहवा येथे आला होता. त्यांनी बघितले की बुद्धअस्थी मिळाल्या आहेत. लगेच त्यांनी अर्ज केला की त्या अस्थी सयाम देशाला द्याव्यात. तो देश बौद्ध असल्याने तेथे त्या अस्थींची भक्तिभावाने पूजा होईल. तेव्हा एक मोठा समारंभ होऊन त्या पवित्र अस्थि राजा राम-५ यांना दिल्या गेल्या. पुढे त्या बँकॉक येथे नेल्यावर राजाने त्या अस्थींचे पूजन केले. आणि पुन्हा भाग करून ते म्यानमार, सिरीलंका येथील पॅगोडे व विहारांना दिले. ब्रिटिशांनी कलश व काही रत्ने कलकत्ता येथील म्युझियममध्ये ठेवली. व काही रत्ने विल्यम पेपे यालासुद्धा दिली. अशा रीतीने ही कथा येथे संपली.

दुसरी कथा १९७२ साली सुरू झाली. पुरातत्व विभागाचे अधीक्षक के एम श्रीवास्तव यांना काय वाटले कुणास ठाऊक पण विल्यम पेपे यांनी हा स्तूप पूर्णपणे खणला नाही असे त्यांचे मत होते. तेव्हा त्यांनी पुन्हा तेथे १९७२मध्ये उत्खनन चालू केले.सन १८९८ मध्ये १० फुटापर्यंत उत्खनन केले होते. त्याच्याही खाली ९ फुटांपर्यंत गेल्यावर आश्चर्याचा धक्का सर्वांना बसला. तेथे त्यांना विटांचे बांधकाम दिसले. आणि दोन कलश सापडले. या कलशातील एका भांड्यात २२ अस्थि अवशेष मिळाले. व दुसरा रिकामा होता. यामुळे १८९८ मधील विल्यम पेपे यांचे उत्खनन आणि १९७२ मधील श्रीवास्तव यांचे उत्खनन यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले.

दोघांनाही उत्खननात वेगवेगळ्या थरावर दगडी मंजुषा सापडल्या. त्यामुळेही एकाच स्तुपात दोन वेगवेगळ्या थरांवर अस्थि का ठेवल्या गेल्या हे मोठे कोडे तयार झाले. त्यानंतर झालेल्या आतापर्यंतच्या संशोधनाने खालील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.

१) भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींसाठी ज्या आठ स्तुपांची उभारणी झाली त्यापैकी एक प्रिप्राहवाचा स्तुप आहे आणि तो शाक्यकुळांचा आहे. त्यामध्ये दोन अस्थिकलश ठेवून त्यावर स्तुप उभारण्यात आला. नंतरच्या राजवटीत तो मोठा करण्यात आला.

२) सम्राट अशोक यांच्या काळात हा शाक्यांचा स्तुप उघडला. त्यातील एका कलशातील अस्थि काढल्या आणि रिकामा कलश तेथे पुन्हा ठेवला गेला. काढलेल्या अस्थींचे पुन्हा भाग करून त्याच्या अस्थीकुप्या बनवून सम्राट अशोक यांनी भारतभर स्तुप उभारण्यासाठी पाठविल्या.

३) त्यानंतर दोनशे वर्षांनी कुण्या अज्ञात राजाच्या राजवटीत पुन्हा हा शाक्यांचा स्तुप उघडून तेथे १० फुटावर दगडी मंजुशेत पवित्र अस्थींचे ५ कलश ठेवले गेले. जे विल्यम पेपे याला उत्खननात सन १८९८ मध्ये सापडले.

सध्यस्थीतीत प्राप्त झालेल्या अस्थि दिल्ली येथील संग्रहालयाच्या एका खोलीत कडीकुलपात बंदिस्त आहेत. त्यामुळे प्रिप्राहवा येथील अनेकांचे मागणे आहे की या प्रिप्राहवाच्या स्तुपातील अस्थि पुन्हा परत करून तेथील प्राचीन बुद्ध स्तुपात ठेवण्यात याव्यात. जेणेकरून निदान त्यांची पूजा तरी होईल.

आजही भारतातील अनेक स्तुपात सापडलेल्या बुद्धअस्थि परदेशात बौद्ध राष्ट्रांकडे सुरक्षित असून त्यांचे योग्य पूजन होते. मात्र भारताकडे असलेल्या अस्थि कडीकुलपात बंद असून त्यांचे कित्येक वर्षात लोकांना दर्शन नाही तसेच त्यांची यथायोग्य पूजा देखील होत नाही याचे वाईट वाटते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)