ब्लॉग

दंतकथा आणि त्याचा समाज जीवनावर परिणाम

आपल्या भारतात साधुसंत आणि महात्म्यांच्या बाबतीत अनेक दंतकथा तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याचे कारण असे आहे की खालच्या जातीतील लोकांना काही अलौकिक गुण असू शकतात या गोष्टीवर उच्चवर्णीयांचा अजिबात विश्वास नाही. शूद्रातिशूद्रांना प्रतिभा नसते, बौद्धिक कुवत नसते असा त्यांचा दुराग्रह आहे. ब्राह्मणांव्यतिरिक्त कुठल्याही खालच्या जातीमध्ये अलौकिक शक्ती असत नाही, असा त्यांचा भ्रम आहे. म्हणून तेच अशा कथा निर्माण करून लोकात मुद्दामून प्रस्तुत करतात. आणि त्याला सर्वसामान्य माणूस बळी पडतो.

शूद्रातिशूद्र जातीमधील प्रतिभावान आणि संत महात्म्यांच्या बाबतीत अशा बिनबुडाच्या कथा लोकांमध्ये प्रस्तुत करण्याचे कट-कारस्थान काही विशिष्ट जातीतील लोकांनी केलेले आहे. स्वतःचे श्रेष्ठत्व अभधित राहण्यासाठी खालच्या जातीमधील प्रतिभाशक्ती असलेल्या संतास ब्राम्हणाने अनुकंपा केल्याने त्यास दैवीशक्ती प्राप्त झाल्याचे अनेक ठिकाणी दाखले दिले गेले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या अंगात असे गुण असतील तर तो दैवी शक्तीचा प्रभाव आहे असे समजून काही बिनबुडाच्या कथा तयार करतात.

अशा कट-कारस्थानामुळे अनेक साधुसंतांना खूप मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. ब्राह्मण वर्गाने आपल्या समाजातील जन्माधिष्ठित श्रेष्ठत्व जपण्यासाठी या दंतकथाद्वारे खूप लांड्यालबाड्या केले आहेत. चोखामेळा सुद्धा याला अपवाद नाही. चोख्यामेळ्यामध्ये दैवी अंश होता असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे त्याचा विटाळ होईल म्हणून त्याला ‘दूर हो, दूर हो’ असे म्हणायचे, हे दुटप्पी धोरण होत नव्हते का ?

संतांच्या जन्माशी अद्भुतता चिटकवून आणि त्यांच्या साध्या सरळ आयुष्यात चमत्काराच्या गोष्टी घुसडून त्यांचे संतत्व झाकाळून टाकण्यात अशा कृत्रिम दंतकथांनी कटकारस्थानाचे काम केले आहे. अशा कथांमुळे सामान्य माणसात श्रद्धे ऐवजी अंधश्रद्धा अधिक पसरते. सामान्य माणूस आपल्याला संतासारखे जमणार नाही. कारण आपल्यामध्ये दैवीशक्ती कुठे आहे, असा विचार करू लागतो. सामान्य माणूस त्यामुळे ढिला पडतो. बेफिकीर बनतो. सामान्यात त्यामुळे आत्मविश्वास निर्माण होत नाही. अशा दंतकथा मुळे संतांच्या मूळ उद्देशावर पाणी पडते.

या देशातील बहुजन समाज नेहमीच जाणीवहिन, अडाणी आणि विखंडित राहिला तर ते उच्चवर्णीयांना फायदेशीर आहे. बहुसंख्य बहुजन समाज जर जाणीवपूर्वक संघटीत झाला, तर मूठभर असलेल्या उच्चवर्णीयांच्या सामाजिक श्रेष्ठत्वाला तडा जाईल म्हणून अशा कारवाया केल्या जातात. संतांनी बहुजन समाजाला त्यांच्या बौद्धिक गुलामगिरीची जाणीव करून देण्यासाठी चळवळ सुरू केली होती. या संतांच्या जीवनचरित्रात चमत्कार आणि अद्भुत गोष्टींची भेळमिसळ करून काही लोकांनी बहुजन समाजाचा संताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. संत म्हणजे अंगात दैवीशक्ती असलेले अलौकिक पुरुष किंवा अवतारी पुरुष असा गैरसमज पसरवण्यात अशा अद्भुत चमत्कार सांगणाऱ्या दंतकथांचा फार मोठा वाटा आहे.

आणि म्हणून वरील विवेचनावरून असा बोध घ्यायचा की या देशाचा कुठल्याही क्षेत्रातील इतिहास वाचताना बरीच सावधगिरी बाळगूनच वाचला पाहिजे. इतिहासाच्या पानापानावर अशा प्रकारच्या कटकारस्थानाचा पडताळा आल्याशिवाय रहात नाही. ही कट कारस्थाने रचण्यामागील हेतू स्पष्ट आहे. तो समजून घेतल्यावर खूपच वाईट वाटते. दुःख होते. अशा प्रकारचा भ्रम निर्माण करणारा कृत्रिम इतिहास लिहून स्वतःचे स्थान सुरक्षित ठेवून अशिक्षित बहुजन समाजाची दिशाभूल करून त्याला संभ्रमात ठेवायचा हाच अंतिम हेतू असतो. बहुजन समाजाने अशा प्रकारच्या संभ्रमात न राहता त्याने आपली चिकित्सक बुद्धी वापरण्याची गरज आहे.

(संत चोखामेळा आणि मी’ या भि.शि.शिंदे यांच्या पुस्तकावरून)

-संजय सावंत, नवी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *