जगभरातील बुद्ध धम्म

भारताचा नागवंशी महार समुदाय आणि ब्रम्हदेश

म्यानमार देशात चार वर्षापूर्वी पर्यटनास गेलो असताना मंडाले शहरामध्ये ‘महार आँग मी बॉन सॅन’ ही मॉनेस्ट्री बघीतली. ते एक भव्यदिव्य बौद्ध विहार आहे. व त्याचा इतिहास तेथील मुख्य द्वारावरील फलकावर लिहिला होता. परंतु त्या मॉनेस्ट्रीच्या नावाच्या अगोदर ‘महार’ हा शब्द पाहून मी बुचकळ्यात पडलो. त्यानंतर यंगूनमध्ये ‘महार विजया पॅगोडा’ दृष्टीस पडला. आणि नंतर प्रसिद्ध श्वेडेगॉन पॅगोड्याच्या आवारात ‘महार बोधी टेम्पल’ बघितल्यावर उडालोच.

माझे कुतूहल चाळवले गेले. मग मी ‘महार’ शब्द कुठे कुठे दिसतो ते पाहू लागलो. आणि मग अनेक स्थळांच्या नावात ‘महार’ शब्द दिसून आला. उदा. महार उप्पत्तशांती पॅगोडा, महार कियन थितसार शिन पॅगोडा इत्यादी. हे सर्व पाहून मी गोंधळलो होतो. तेव्हा अजून आश्चर्याचा धक्का बसला. तिथल्या काही मोठ्या हॉटेलांच्या नावात सुद्धा ‘महार’ शब्द होता. उदा. टूटू महार हॉटेल, हॉटेल महार इत्यादी.

मुंबईस परत आल्यावर नेटद्वारे माहिती गोळा केली असता तिथल्या काही कंपन्यांच्या नावात सुद्धा ‘महार’ शब्द आढळला. एवढेच नाहीतर तेथे महार टीव्ही ऍप, महार मोबाईल कंपनी सुद्धा आढळली. फायनान्शियल इन्स्टिट्यूट, शाळा यांच्याही नावात ‘महार’ शब्द अनेक ठिकाणी आढळला. बरे त्याचा तेथे अर्थ काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच समजले नाही.

चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या काळात जेव्हा धम्म प्रसारासाठी अर्हतांना, भिक्खूंना इतर देशात पाठविले तेंव्हा ब्रम्हदेशात सोन व उत्तर यांचे सोबत त्यावेळचे महर समुदायाचे संरक्षक देखील गेले असावेत. तरी याबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. कारण म्यानमार मधील हे धडधडीत पुरावे ‘इतिहासाचे पुर्नलेखन करा’ हेच सांगत आहेत.

आपल्या ‘महाराष्ट्र’ नावाची उत्पत्ती ‘महार’ समुदाया वरून झाली असे वाचले होते. मराठा आणि महार हे दोन लढवय्ये नागवंशी समुदाय पूर्वी एकत्रच होते. त्याबाबत नव्याने संशोधन होत असून इतिहासाची पाने बदलावी लागणार आहेत असे संकेत आहेत. अशा या मूळच्या लढवय्या समाजाच्या काही शाखा ब्रम्हदेशाच्या मातीत रुजल्या असाव्यात.

भारतातील मूळ बौद्ध संस्कृतीचा आदर करणारा हा समाज ९ व्या शतकानंतर बौद्ध संस्कृती नष्ट होत गेल्यावर पायदळी तुडवीला गेला. जातीभेदाच्या गराड्यात तळाशी फेकला गेला. काळाच्या ओघात महर समुदायाचे उत्तर भारतात मेहेर, मेहरा असे नाव झाले. मध्यभारतात महार झाले. उत्तर भारतातील अनेक शब्दकोशात ‘महरा’ म्हणजे सरदार, मुखीया असा अर्थ दिला आहे. ब्रज भाषेत सुद्धा ‘महर’ शब्द आहे. ओरिसातील अभिलेखात महर लढवय्यांचा उल्लेख आलेला आहे.

महार हे पंजाब व राजपुतानामध्ये सुद्धा आहेत. ‘मेहेरबान’ हा शब्द त्याचेच रूप असून त्याचा अर्थ दयाळू, दयावान असा आहे. पुरीच्या जगन्नाथ विहारात धार्मिक विधी महर ज्ञातीचे लोक करीत. आसाम आणि ओरिसातील शिलालेखात ‘महर’ शब्द आढळून आला आहे.

वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करताना महाराष्ट्र हा भूप्रदेश मूळ महार नागगणांचे राष्ट्र असल्याचे दिसून आले. भारतखंडातील पसरलेल्या ‘महर’ या ज्ञातीची व्याप्ती पाहता निश्चितच हा शब्द महा, भव्य, प्रमुख अशा आदरार्थी अर्थाने सुवर्णभूमीत रुजला असल्याचे स्पष्ट दिसते. आता महाराष्ट्रातील महार समुदाय हा बौद्ध झाला असल्याने त्याचे वर्तुळ पूर्ण झाले आहे.

हा सर्व इतिहास अभ्यासतांना माझ्यातील ‘महार’ शब्दाचा पूर्वी असलेला न्यूनगंड कुठल्याकुठे पळून गेला. होय, आता आम्ही बौद्ध आहोत..! हे स्वाभिमानाने सांगताना गर्व वाटतो. कारण हजारो वर्षांपूर्वी तीच आमची मूळ संस्कृती होती. तसेच या भारतवर्षात आमचे लढवय्ये पूर्वज नागवंशी ‘महर’ हे सर्व समुदायात अग्रभागी होते याचाही अभिमान वाटतो.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)

संदर्भ : ‘शूद्र पूर्वी कोण होते’ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ‘प्राचीन भारतातील नाग’ -एच एल कोसारे यांचा शोधग्रंथ, ‘महार लोक’- रॉबर्टसन, ‘जगातील बुद्ध धम्माचा इतिहास’ – मा शं मोरे.

3 Replies to “भारताचा नागवंशी महार समुदाय आणि ब्रम्हदेश

    1. सावंत सर,
      तुम्ही तळमळीनं धम्म कार्य करत आहात याचा खुप अभिमान वाटतो
      महार हा शब्द डोक्याला शौट लावतो हे खर आहे
      उरदूमध्येही माहीर,मोहतरम..
      मराठीत महारथी, महाआर्य
      तसेत आडनांवे म्हात्रे ,महाथेरो
      माथुर महाथेर मेहेरा माहीर,मारवाड महारवाड असा संबंध ही असेल का?

Comments are closed.