इतिहास

महाराष्ट्राचे नागवंशी सातवाहन घराणे

प्राचीन भारतातील बलाढ्य राजवटीपैकी एक अत्यंत महत्त्वाचे घराणे म्हणून सातवाहन राजघराण्याची गणना होते. इ. स.पूर्व २०० ते इ. स.२०० पर्यंतचा सातवाहन घराण्याचा काळ म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण युग. त्यावेळची सुबत्ता, भरभराट महाराष्ट्राने कधीही पाहिली नाही.

काही प्रसिद्ध इतिहास संशोधकांनी सातवाहनांच्या मुळे महाराष्ट्र प्रांताला महाराष्ट्र हे नाव मिळाले असे म्हटलेले आहे. परंतु हे चुकीचे कथन करून लढवय्या महार समुदाय आणि महाराष्ट्र नाव यांच्या संबंधावर प्रकाश टाकण्याचे टाळले आहे. भारतातील बरेच इतिहासकार इतिहासातील अनेक बाबींवर संशोधन करताना त्याचे संदर्भ पुरणातील देतात. त्याच्या नोंदी पुराणाशी ताडतात. खरेतर पुराभिलेखांचा आणि नाण्यांचा पुरावा यांची पुराणातील नोंदीशी सांगड घालता येत नाही. पुराणातील निरनिराळ्या राजांची नावे आणि त्यांचा काळ याबद्दल एकवाक्यता नाही. मत्स्य, ब्रह्मांडपुराण आणि वायुपुराणात राजांचे कालावधी वेगवेगळे आहेत. त्यामुळे नवीन पिढीने संशोधन करताना पुराणातली वांगी पुराणातच ठेवावीत.

बऱ्याच ठिकाणी पुराणातील पुराव्यावर सर्वस्वी विसंबून रहायचे म्हटल्यास राजवटींचा काळ विसंगत येतो. ज्या राजांची नाणी उत्खननात सापडली त्यांची नावेच पुराणात नाहीत. त्यामुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा होतो. म्हणून कुठल्याही भारतीय इतिहास संशोधकाने पुराणाचे दाखले देऊन संशोधन मांडले असेल तर ते उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकावे. कारण पुराणातल्या नोंदीला शास्त्रीय आधार नाही. एका विशिष्ट वर्गाने त्यांच्या फायद्यासाठी ही पुराणे लिहिली असल्यामुळे त्यात सत्यता बिलकुल नाही. आणि म्हणून जे संशोधन पुराणातील संदर्भ देऊन झाले असेल ते पूर्णपणे चुकीचे आहे असे समजावे.

सातवाहन घराण्यातील अनेक राज्यांची नावे सातकर्णी आहेत. त्यापैकी पहिल्या सातकर्णीच्या राजाचा लेख नाणेघाटात आहे. त्याची राणी नागनिका हिने त्या लेखात राज्याच्या कामगिरीचे वर्णन केले आहे. त्यांनी जिंकलेल्या लढाया, दिलेली दाने यांचा उल्लेख या लेखात आहे. नाणेघाटातील राजाराणी, राजपुत्र व नागनिकेचा पिता यांच्या मूर्ती आता पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. सातवाहन घराणे नागवंशी होते. आणि नागवंशी समुदायात लढवय्ये महर अग्रभागी होते. ( पहा एच. एल. कोसारे यांचा ‘प्राचीन भारतातील नाग’ हा शोधग्रंथ ) असा पराक्रमी नागवंशी समुदाय भारतखंडात सर्वत्र पसरला होता. व बौद्ध संस्कृतीचा तो कट्टर पुरस्कर्ता होता. आता त्याची खरी ओळख उजेडात येत असून त्या दृष्टीने अजून संशोधन झाले पाहिजे.

तर अशा या नागवंशी सातवाहन राजघराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णीचा कालखंड अत्यंत उज्वल होता. सातवाहनकालीन अनेक पुरातन अवशेष महाराष्ट्रात ठिकठिकाणी आढळलेले आहेत. त्यांच्या काळात लोखंडी नांगरांचा वापर करणे सुरू झाले. त्यामुळे लागवड मोठ्या प्रमाणात होऊन शेती भरभराटीला आली होती आणि शेतकरी खुश होते. जेव्हा समाज स्वस्थ आणि खुशाल असतो तेव्हा कलेचे विश्व विस्फारते. त्यांच्यापैकी कित्येकांनी डोंगरात लेण्या कोरण्यासाठी दान दिले.

सातवाहन काळात महाराष्ट्रात सगळीकडे छोटी-छोटी खेडी आणि शहरे यांचे जाळे निर्माण झाले. त्यापैकी मोजक्याच स्थळांचे उत्खनन आतापर्यंत झालेले आहे. तेथे सापडलेल्या पुरातन अवशेषामधून त्यावेळच्या मानवी जीवनाचे अनेक पैलू दृष्टीस पडतात. मातीची चुल, फुटके माठ, लाकडांचे ओंडके, वरवंटे-पाटे, कोरीवकाम केलेले जाते, मातीची भांडी, खेळणी, कौले व स्त्री आभूषणाच्या वस्तू अशा उत्खननात सापडलेल्या आहेत. तसेच त्याकाळच्या शिल्पाकृतीवरून व शिलालेखावरून त्याकाळच्या समृद्ध समाज जीवनाची माहिती मिळते.

या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या व सापडलेल्या पुराव्या वरूनच इतिहासाची पाने लिहिली गेली आहेत. त्याच्या नोंदी घेऊन त्या क्रमवार मांडल्या आहेत. जसजसे यापुढे अजून पुरावे सापडत जातील तसतसा इतिहास परखडपणे पुढे येत जाईल. त्याचबरोबर सापडलेले पुरावे सुरक्षित राखणे देखील आवश्यक झाले आहे. कारण धर्मांध व्यक्तीला सत्याचे काही देणेघेणे नसते. बामियान बुद्ध प्रतिमेचे तालिबान यांनी काय केले हे सर्व जगास माहीत आहे. भारतातही परिस्थिती वेगळी नाही. म्हणून समाजामध्ये तळागाळात प्राचीन अवशेषांबद्दल जागृती व प्रेम वाढले पाहिजे. त्या दृष्टीने तसे प्रयत्न झाले पाहिजेत. तरच खरा इतिहास शुद्ध स्वरूपात सुरक्षित राहील.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)